उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) प्रमुख मायावती यांच्यावर निशाणा साधला आहे. मायावतींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि काशीराम यांचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मायावतींनी थेट मुसलमानांना उद्देशून महागठबंधनाला मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या वक्तव्याचाही योगी आदित्यनाथ यांनी समाचार घेतला.

मायावतींच्या वक्तव्यावर योगी आदित्यनाथ म्हणाले की, ‘मायावतींचे या प्रकाराचे वक्तव्य म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि काशीराम यांचा अपमान आहे.’

दरम्यान, सहारनपूर येथील देवबंद येथे सपा-बसपा आणि रालोदची पहिली संयुक्त प्रचारसभा वादात अडकली. या सभेत बसपा प्रमुख मायावती यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्रमक शब्दांत टीका केली होती. पण त्यांचे भाषण वादाचा विषय ठरला. प्रचारसभेत त्यांनी थेट मुसलमानांना संबोधित करत मतदानाचे अपील केले. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी याची दखल घेत स्थानिक प्रशासनाला अहवाल मागितला आहे. मायावती यांनी आपल्या भाषणात म्हटले होते की,’ मी खास मुस्लिम समाजातील लोकांना सांगू इच्छिते की तुम्ही भावनेच्या भरात, नातेसंबंधाच्या गोष्टीत अडकून मतदान करू नका. एकगठ्ठा मतदान महाआघाडीला केले पाहिजे.’