News Flash

“बंगालच्या लोकांची ताकद…”; ममतांचा रुग्णालयातील फोटो पोस्ट करत भाच्याकडून भाजपाला इशारा

राज्यपाल जगदीप धनखड यांनी रात्री रुग्णालयात जाऊन ममता यांची विचारपूस केली

(फोटो सौजन्य: twitter/abhishekaitc)

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये हल्ला झाल्याचा दावा करण्यात येत आहे. निवडणूक प्रचारादरम्यान बुधवारी ४-५ जणांनी आपल्याला धक्काबुक्की करून ढकलल्यामुळे आपल्या पायाला जखम झाली, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. रेयापारानजीक एका स्थानिक मंदिरात प्रार्थना केल्यानंतर ममता तेथून निघण्याच्या तयारीत असताना सायंकाळी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. असं असतानाच आता ममता यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी ममतांचा रुग्णालयामधील फोटो ट्विट करत भाजपाला इशारा दिलाय.

नक्की वाचा >> Opinion Poll म्हणतो, बंगालमध्ये ‘फिर एक बार ममता सरकार’; आसाममध्ये कमळ फुलणार तर दक्षिणेत भाजपा निष्प्रभ ठरणार

अभिषेक यांनी ममतांचा रुग्णलयामधील फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये ममता रुग्णालयातील बेडवर असून त्यांच्या डाव्या पायाला प्लॅस्टर केल्याचं दिसत आहे. हा फोटो ट्विट करताना अभिषेक यांनी, “भाजपाने तयार रहावे. रविवारी २ मे रोजी त्यांना बंगालच्या लोकांची ताकद दिसणार आहे. तयार राहा,” असं म्हटलं आहे. २ मे रोजी बंगालच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल असून मतपेटीमधून बंगालचे लोकं भाजपाविरुद्धचा राग व्यक्त करतील असे संकेत अभिषेक यांनी आपल्या ट्विटमधून दिलेत.

नक्की वाचा >> ममता बॅनर्जी कशा झाल्या जखमी?, नंदीग्राममध्ये नेमकं काय घडलं?

माझ्यावर हल्ला झालाय, असा दावा ममतांनी बुधवारी केला. ‘मी माझ्या गाडीबाहेर उभी होते व गाडीचे दार उघडे होते. मी मोटारीत बसत असताना ४-५ लोकांनी दार ढकलले, ते माझ्या पायावर आपटले. याने झालेल्या जखमेमुळे माझा पाय सुजला असून मला तापासारखे वाटत आहे’, असे ममता म्हणाल्या. त्यांना नंतर सरकारी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. हे नक्कीच ‘कारस्थान’ असल्याचा आरोप ममता यांनी केला. त्यांना झेड प्लस सुरक्षाकवच असल्यामुळे, त्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. दरम्यान, ममतांवरील या कथित हल्ल्याबाबत निवडणूक आयोगाने राज्य पोलिसांकडून अहवाल मागवला आहे. राज्यपाल जगदीप धनखड यांनी रात्री रुग्णालयात जाऊन ममता यांची विचारपूस केली.

नक्की वाचा >> नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी उपऱ्याच!

असं होणार मतदान…

पश्चिम बंगालमध्ये आठ तर आसाममध्ये तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान २७ मार्च रोजी होणार आहे. पश्चिम बंगालमधील मतदान हे जवळजवळ एक महिना सुरु राहणार असून आठव्या टप्प्यातील मतदान २९ एप्रिल रोजी होणार आहे. पश्चिम बंगालबरोबरच आसाम, केरळ आणि तामिळनाडूबरोबरच पुद्दुचेरीच्या विधानसभा निवडणुकींचे निकाल २ मे रोजी लागणार आहेत. पाचही राज्यांमधील एकूण ८२४ जागांसाठी मतदान होणार आहेत. यामध्ये २.७ लाख मतदानकेंद्रांमध्ये १८ कोटी ६० लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजवतील. यापैकी पश्चिम बंगालमध्येच एक लाखांहून अधिक मतदान केंद्र आहेत. या सर्व राज्यांपैकी बंगालची सर्वाधिक चर्चा आहे. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा भाजपाने थेट आव्हान दिलं असून राज्यात सत्ता मिळवण्याचा भाजपाने सर्व जोर लावण्याची तयारी केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: बंगालमधील निवडणुकीमध्ये प्रचारासाठी उतरल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्रीमंडळातील अनेक नेत्यांसहीत भाजपाने येथे सारा जोर लावलाय. तर दुसरीकडे ममता बॅनर्जी एकट्या तृणमूलसाठी प्रचार करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 11, 2021 8:11 am

Web Title: tmc mp abhishek banerjee tweets west bengal cm mamata banerjee picture admitted in hospital scsg 91
Next Stories
1 “पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारात उसळलेल्या गर्दीत करोना चिरडून मेला काय?”
2 केरळ : CPIM चा मोठा निर्णय… तरुणांना राजकारणामध्ये संधी देण्यासाठी दिग्गजांना तिकीटं नाकारली
3 मी कोब्रा आहे असं का म्हटलं?; मिथुन चक्रवर्तीने सांगितलं यामागचं कारण
Just Now!
X