News Flash

पश्चिम बंगाल : राहुल गांधींनी प्रचारसभा घेतलेल्या सर्व मतदारसंघांमधील काँग्रेस उमेदवारांचं डिपॉझिट जप्त

पश्चिम बंगालमधून काँग्रेसचा सुपडा साफ

फाइल फोटो (सौजन्य : पीटीआय)

पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या आघाडीच्या वाटेला केवळ एक जागा आल्याचं राज्यातील विधानसभा निकालानंतर स्पष्ट झालं आहे. पश्चिम बंगालच्या जनतेनं तिसऱ्या आघाडीला पूर्णपणे नाकारल्याचं यावरुनच लक्षात घेत आहे की तिसऱ्या आघाडीने उभ्या केलेल्या उमेदवारांपैकी ८५ टक्के उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त झालीय. इतकचं नाही तर ज्या दोन मतदारासंघांसाठी राहुल गांधींनी प्रचारसभा घेतल्या त्यान दोन्ही मतदारसंघांमध्येही काँग्रेसचा पराभव झालाय.

तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांपैकी केवळ ४२ उमेदवारांना अनामत रक्कम जप्त न होण्याइतकी मतं मिळाल्याचं वृत्त न्यूज १८ने दिलं आहे. सर्वच्या सर्व २९२ जागा तिसऱ्या आघाडीने लढवल्या होत्या. तिसऱ्या आघाडीतील सदस्य पक्ष असणाऱ्या भारतीय धर्मनिरपेक्ष मोर्चाने काँग्रेस आणि डाव्या घटक पक्षांपेक्षा जास्त चांगली कामगिरी केल्याचं दिसून येत आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांना पश्चिम बंगालमध्ये एका जागेवरही विजय मिळवता आलेला नाही. राहुल गांधी यांनी करोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेत शेवटच्या काही टप्प्यांमध्ये निवडणुकीच्या प्रचारसभा न घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. देशामध्ये एप्रिलच्या मध्यानंतर करोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातल्याचं पहायला मिळालं. मात्र त्यापूर्वीच राहुल यांनी दोन ठिकाणी निवडणुकीच्या प्रचारसभा घेतल्या होत्या.

१४ एप्रिल रोजी राहुल गांधी यांनी माटीगारा-नक्सलबाडी आणि गोलपोखर या दोन मतदारसंघांमध्ये निवडणुकीच्या प्रचारसभा घेतल्या होत्या. मात्र या ठिकाणीही काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले आहेत. या मतदारसंघांमधून लढणाऱ्या उमेदवारांनाही आपली अनामत रक्कम वाचवता आली नाही. मागील एका दशकापासून माटीगारा-नक्सलबाडी मतदारसंघ काँग्रेसकडे होता. मात्र स्थानिक आमदार असणाऱ्या शंकर मालाकार यांना केवळ ९ टक्के मत यंदा मिळाली. ते तिसऱ्या स्थानि राहिले. गोलपोखरमध्येही काँग्रेच्या उमेदवाराला केवळ १२ टक्के मतं मिळवता आली. येथेही काँग्रेस तिसऱ्या स्थानीच राहिली. सन २००६ पासून २००९ पर्यंत आणि नंतर २०११ पासून २०१६ पर्यंत गोलपोखरमधून काँग्रेसचा आमदार विधानसभेत गेला होता. माटीगारा-नक्सलबाडीमधून यंदा भाजपाचे आनंदमय बर्मन हे ७८ हजार ७६४ मतांसहीत निवडून आले. तर गोलपोखरमधून तृणमूलचे गुलाम रब्बानी निवडणूक जिंकले.

तिसऱ्या आघाडीतील घटक पक्षांचे वेगवेगळं विश्लेषण केलं तर डाव्यांना १७० पैकी केवळ २१ जागांवर आपली अनामत रक्कम वाचवता आली. काँग्रेसने लढवलेल्या ९० जागांपैकी ११ जागांवर उमेदवारांना अनामत रक्कम वाचवात आली. उरलेल्या ३० पैकी १० जागांवर भारतीय धर्मनिरपेक्ष मोर्चाच्या उमेदवारांनी अनामत रक्कम वाचवली. भारतीय धर्मनिरपेक्ष मोर्चाने एक जागा जिंकली तर चार जागी त्यांचा उमेदवार दुसऱ्या स्थानी राहिला. याच चार ठिकणी भारतीय धर्मनिरपेक्ष मोर्चाला भाजपापेक्षा जास्त मतं मिळाली. यावरुन तिसऱ्या आघाडीमधील फुरफुरा शरीफचे मौलवी अब्बास सिद्दीकी यांनी स्थापन केलेल्या भारतीय धर्मनिरपेक्ष मोर्चाबद्दल लोकांना आकर्षण असल्याचं दिसून आलं.

डाव्या विचारसरणीच्या पक्ष केवळ चार जागी दुसऱ्या ठिकाणी राहिले. तर काँग्रेस जॉयपुर आणि रानीनगर या दोनच मतदारसंघांमध्ये दुसऱ्या स्थानी राहिला. तिसऱ्या मोर्चाला मिळालेल्या अपयशाचा थेट फायदा तृणमूल काँग्रेसला झाला. तृणमूलने एकूण २१३ जागांवर विजय मिळवला. एकंदरीत काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये केवळ २.९४ टक्के मतं मिळाली. तर डाव्यांना पाच टक्के लोकांनी मतदान केल्याचं मतमोजणीतून स्पष्ट झालं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 6:02 pm

Web Title: west bengal result 2021 congress lost deposits in both bengal seats where rahul gandhi held rallies scsg 91
Next Stories
1 केरळमध्ये कमळ फुलवण्याची महत्वकांशा ठेवणारे ‘मेट्रोमॅन’ श्रीधरन ३८५९ मतांनी पराभूत
2 West Bengal Election: “पराभवानंतर मोदी, शाहांनी राजीनामा द्यावा, या निकालाचा परिणाम २०२४ च्या निवडणुकीवरही होईल”
3 Bengal Elections 2021 : “संजय राऊत म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना”
Just Now!
X