मुंबई / ठाणे : अखेर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी भाजपने नारायण राणे यांची उमेदवारी गुरुवारी जाहीर केली. त्यामुळे यवतमाळ-वाशीम, हिंगोली आणि रामटेक येथे उमेदवार बदलायला लावल्यानंतर शिंदे गटाकडून एक जागा भाजपने बळकाविल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र यामुळे आता ठाण्याची जागा शिंदे गटाकडेच राहण्याची शक्यता बळावली आहे. नाशिक, दक्षिण मुंबई, पालघरचा तिढा मात्र अद्याप अद्याप कायम आहे.

भिवंडीचा अपवाद वगळता कोकणातील सर्व जागा मित्रपक्षांकडे आहेत. त्यामुळे आणखी एक मतदारसंघ मिळाला पाहिजे, अशी भाजपची आग्रही मागणी होती. त्यातही ठाणे मतदारसंघावर भाजपचा दावा होता. मात्र आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग भाजपकडे गेल्यामुळे ठाणे मतदारसंघ शिवसेनेला मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी ही दिलासादायक बाब आहे.

हेही वाचा >>> वंचितसह बीएसपीची उमेदवारी दाखल, आजवर १५ उमेदवारांनी १७ अर्ज केले दाखल

पालघरचा तिढा कायम

पालघरमध्ये राजेंद्र गावित शिंदे गटाचे खासदार असले तरी त्यांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचे वेध लागले आहेत. दक्षिण मुंबईत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रचार सुरू केला असला तरी शिंदे गट मतदारसंघ सोडण्यास तयार नाही. तर नाशिक मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेकडेच ठेवावा अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांच्यासह स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे. परंतु भाजपने छगन भुजबळ यांना उमेदवारी द्यावी, अशी सूचना केली आहे. या तिन्ही मतदारसंघांमध्ये पाचव्या टप्प्यात मतदान असल्याने लगेचच निर्णय होण्याची शक्यता नाही.

राणेंचा उमेदवारी अर्ज आज

सावंतवाडी : केंद्रीय मंत्री नारायण राणे हे अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी आज, शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी आपले मूळ गाव वरवडे येथील ग्रामदैवत श्री देव भैरवनाथचे सपत्निक दर्शन घेतले. निवडणुकीत विकास हा मुद्दा आहे. आत्मनिर्भर भारत आणि आपल्या भागाचा सर्वांगीण विकास हे मुद्दे घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जात असल्याचे ते यावेळी म्हणाले.

तीन नावे चर्चेत

शिंदे सेनेकडून माजी महापौर नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक आणि आमदार प्रताप सरनाईक यांची नावे चर्चेत आहेत. सरनाईक यांनी ठाणे, मीरा भाईंदर आणि नवी मुंबई पोलिसांना पत्र पाठवून आपल्यावरील गुन्ह्यांची माहिती मागविली आहे. हे पत्र समाज माध्यमांवर पसरल्यानंतर त्यांना उमेदवारी निश्चित झाल्याची शहरात चर्चा असली, तरी अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.