यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रावर सर्वाधिक लक्ष केंद्रित केलं होतं. महाराष्ट्रात भाजपासह इतर आठ पक्षांची महायुती आहे, राज्यात महायुतीची सत्तादेखील आहे. तरीही महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी यांना महाराष्ट्राचा आतापर्यंत १९ वेळा दौरा करावा लागला आहे. तसेच त्यांनी बुधवारी (१५ मे) मुंबईत मोठा रोड शो देखील केला. मुंबई हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बालेकिल्ला आहे असं मानलं जातं. भाजपा देखील ते अमान्य करत नाही. तसेच भाजपाचे आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते असे म्हणतात की एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. हीच शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे नेत आहे. असं असूनही बाळासाहेब ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच मुंबईत महायुतीने एकनाथ शिंदेंचा रोडशो का केला नाही? त्याऐवजी त्यांना नरेंद्र मोदींचा रोडशो का करावा लागला? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरे हे देखील नेते आहेत ना? मग त्यांनी अरविंद केजरीवाल यांना का बोलावलं? त्यांनी शरद पवारांना का बोलावलं? ते नेते असूनही त्यांनी केजरीवाल आणि शरद पवारांना बोलावण्याचं कारण काय? सर्वांना माहिती आहे की या देशातील लोकांना नरेंद्र मोदी हवे आहेत. मुंबईकरांना तर नरेंद्र मोदींचं वेगळं आकर्षण आहे आणि आपण जनतेत कोणाला बोलवतो तर ज्या नेत्याचं जनतेला आकर्षण आहे त्याच नेत्याला बोलावतो. ज्यांचं जनतेला आकर्षण नाही त्या लोकांना आपण बोलवत नाही. मोदी उपलब्ध नसते तर आम्ही एकनाथ शिंदेंनाच मुंबईत फिरवलं असतं. कारण तेच आमचे नेते आहेत.” देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही ९ मराठीला नुकतीच मुलाखत दिली. यावेळी त्यांनी मोदींच्या रोड शोबद्दल मत व्यक्त केलं.”

यावेळी फडणवीसांचं उत्तर ऐकून त्यांना विचारण्यात आलं की “एकनाथ शिंदे लोकप्रिय नाहीत का? आणि ते लोकप्रिय असतील तर त्यांचा रोड शो का केला नाही?” यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “मी पुन्हा एकदा सांगतो, नरेंद्र मोदी उपलब्ध नसते तर आम्ही मुंबईत एकनाथ शिंदे यांचा रोड शो केला असता. कारण आमचे नेते हे एकनाथ शिंदेच आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईत किंवा महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या सभांना उद्धव ठाकरे यांच्या सभांपेक्षा जास्त गर्दी होत आहे. शिंदेंच्या सभांना ठाकरेंच्या सभांपेक्षा अधिक प्रतिसाद मिळत आहे.”

हे ही वाचा >> शिवसेना, राष्ट्रवादी, मनसेची ताकद, तरी मोदींना महाराष्ट्रात इतक्या सभा का घ्याव्या लागतायत? फडणवीसांनी सांगितलं कारण

उपमुख्यमंत्री म्हणाले, “यंदा लोकसभा निवडणूक सात टप्प्यांमध्ये होत असून राज्यातील मतदान पाच टप्प्यांमध्ये पार पडत आहे. यापैकी काही टप्प्यांमध्ये सात दिवसांपेक्षा अधिक अंतर होतं. त्यामुळे मोदी यांच्या अधिकाधिक सभा घेणं आम्हाला शक्य होतं. तसेच पंतप्रधानांकडून आम्हाला सभांसाठी तारखादेखील मिळाल्या. त्यामुळेच यंदा आम्ही महाराष्ट्रात त्यांच्या जास्तीत जास्त सभा आयोजित करण्याचा प्रयत्न केला.”