scorecardresearch

“उत्पल पर्रीकरांना तिकीट नाकारलेलं नाही, त्यांना आम्ही…”, देवेंद्र फडणवीसांनी गोव्यात दिलं स्पष्टीकरण!

मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांच्या उमेदवारीवरून राजकीय आरोप होत असताना देवेंद्र फडणवीसांनी त्यावर खुलासा केला आहे.

devendra fadnavis on utpal parrikar
उत्पल पर्रीकरांच्या उमेदवारीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप

देशातील भाजपशासित राज्यांमध्ये सर्वात कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून ख्याती राहिलेले आणि केंद्रात देखील कार्यक्षम संरक्षणमंत्री म्हणून काम पाहिलेले दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या पुत्राला अर्थात उत्पल पर्रीकर यांना भाजपानं उमेदवारी नाकारल्याचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. गोवा विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना गोव्याच्या राजकीय वर्तुळात या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर आता देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. उत्पल पर्रीकर यांना भाजपानं उमेदवारी नाकारलीच नाही, असा दावा फडणवीसांनी केला आहे.

१४ फेब्रुवारीला गोव्यात मतदान

गोव्यात येत्या १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपानं कंबर कसली असून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. मात्र, गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांच्या रुपाने भाजपाला ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा फटका बसला. पक्षानं उमेदवारी नाकारल्यामुळे उत्पल पर्रीकर यांनी भाजपाला रामराम ठोकत पक्षातून बाहेर पडण्याचा मार्ग निवडला आहे. एवढंच नसून पणजीमधून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा देखील निर्णय घेतला आहे.

“उत्पल पर्रीकर आमच्यासोबत नाहीत याचं दु:ख”

दरम्यान, उत्पल पर्रीकर यांना भाजपानं उमेदवारी नाकारली नव्हती असा दावा आता देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. “उत्पल पर्रीकरांना तिकीट नाकारलेलं नाही. त्यांना दोन मतदारसंघ आम्ही दिले होते. त्यातला एक भाजपाचा पारंपरिक मतदारसंघ होता. पण त्यांना पणजी मतदारसंघच हवा होता. त्यामुळे त्या दोन्ही मतदारसंघांना त्यांनी नकार दिला. ते आमच्यासोबत नाहीत याचं आम्हाला दु:ख आहे. पण भाजपा हा देशव्यापी पक्ष आहे. त्यामुळे तो मार्गक्रमण करतच राहणार आहे”, असं फडणवीस यावेळी म्हणाले. गोव्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

याशिवाय, पक्ष सोडून गेलेले पुन्हा परत आले, तर त्यांचं स्वागत करू, असंही ते म्हणाले. “आमची इच्छा तर ही नेहमीच असेल की आमच्या परिवारातून जर कुणी विभक्त झालं असेल तर त्यांनी परत यावं. तसे प्रयत्न नेहमीच चालतात. पण कुणी ठरवलंच असेल की आपल्याला परत यायचंच नाही, तर आमच्याही प्रयत्नांना सीमा आहे. पण अशा प्रकारे जर कुणी परत आलंच, तर आम्ही त्यांचं स्वागत करू”, असं सूचक विधान फडणवीसांनी केलं आहे.

Goa Elections :“तेव्हापण मी पक्षाचे..”; उत्पल पर्रीकरांची पणजीतून अपक्ष लढण्याची घोषणा

उत्पल यांच्याऐवजी काँग्रेसमधून आलेल्या इच्छुकाला उमेदवारी

उत्पल यांनी पणजी मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली होती. मात्र, त्यांच्याऐवजी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बाबूश मॉन्सेरात यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. उत्पल यांना भाजपाने अन्य दोन मतदारसंघांचे पर्याय दिले होते. मात्र, त्यांना ते अमान्य होते. त्यामुळे त्यांनी बंड करत अपक्ष लढण्याचा पर्याय निवडला आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२२ ( Elections ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Devendra fadnavis on utpal parrikar candidate from panjim babush monserat goa election pmw