लोकसभा निवडणुकीतील मतदानाचे दोन टप्पे पार पडले तरी अद्याप महाराष्ट्रातील महायुतीचं जागावाटप पूर्ण झालेलं दिसत नाही. तर कल्याण, ठाणे, नाशिक, पालघरच्या जागेवरील उमेदवार निश्चित झाले नव्हते. अखेर ठाणे, कल्याण आणि नाशिकची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळाल्याचं काही वेळापूर्वी स्पष्ट झालं आहे. शिंदे गटाने दोन तासांपूर्वी ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील त्यांचे उमेदवार जाहीर केले. पाठोपाठ आता नाशिकचा उमेदवारही जाहीर केला आहे. शिंदे गटाने कल्याणमधून विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. तर ठाण्यातून शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के हे महायुतीचे (शिंदे गट) लोकसभेचे उमेदवार आहेत.

दरम्यान, नाशिकच्या जागेबाबत निर्णय घेण्यासाठी महायुतीने अनेक दिवस खलबतं केल्यानंतर ही जागा शिंदे गटाला देण्यात आली आहे. शिंदे गटाने नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा नाशिकमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. नाशकात हेमंत गोडसे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचं आव्हान असणार आहे. महायुतीने राज्यातील ४८ पैकी ४७ जागांवरील त्यांचे उमेदवार जाहीर केले असून आता केवळ पालघरच्या जागेबाबतचा निर्णय घेतलेला नाही. नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता केवळ दोनच दिवस उरले आहेत. त्यमुळे हेमंत गोडसे उद्या (२ मे) नाशकात शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरू शकतात. आज महाराष्ट्र दिनाच्या सुट्टीमुळे अर्ज भरता येणार नाही.

ठाण्याच्या जागेसाठी भाजपा इच्छुक आहे अशा चर्चा रंगल्या होत्या. तसंच कल्याणमध्येही काय घडतं त्याबाबत चर्चा होत होत्या. अखेर शिवसेनेचे दोन्ही बालेकिल्ले आपल्याकडे ठेवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट) नेते आणि राज्याचे अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छूक होते. मात्र नाशिकची जागादेखील शिंदे गटाने मिळवली आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी कुणाला द्यायची याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी काही प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत नरेश म्हस्केंच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. या बैठकीत नरेश म्हस्के, प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, मीनाक्षी शिंदे यांचा सहभाग होता. उमेदवार निवडण्याची चर्चा या बैठकीत पार पडली. त्यानंतर नरेश म्हस्केंच्या नावाबाबत एकमत झालं. या बैठकीत नाशिक लोकसभेबाबतही निर्णय घेण्यात आला.

शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या नाशिक दौऱ्यावेळी हेमंत गोडसे यांचं नाशिक लोकसभेचे उमेदवार म्हणून नाव जाहीर केलं होतं. त्यावर महायुतीतल्या इतर पक्षांनी आक्षेप घेतला होता. मात्र, श्रीकांत शिंदे यांनी जाहीर केलेल्या उमेदवाराच्या नावावर आता महायुतीने शिक्कामोर्तब केलं आहे.

हे ही वाचा >> राज ठाकरेंनी लाडक्या रीलस्टारबरोबर बनवलं पहिलं इन्स्टाग्राम रील, महाराष्ट्राला दिला खास संदेश

नाशिकसाठी सर्वाधिक इच्छुक

अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवसापासून आतापर्यंत नाशिक आणि दिंडोरी या दोन मतदारसंघातूव ११९ उमेदवारांनी २२१ अर्ज खरेदी केले आहेत. यात नाशिकसाठी सर्वाधिक ८७ इच्छुकांनी १४८ अर्ज तर, दिंडोरीत ३२ जणांनी ७३ अर्ज नेले आहेत. अर्ज नेणाऱ्यांच्या तुलनेत दाखल करणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. बुधवारी महाराष्ट्र दिनाची सुट्टी आहे. त्यानंतर तीन तारीख अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे दोन आणि तीन तारखेला अर्ज भरण्यासाठी एकच गर्दी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.