संपूर्ण महाराष्ट्रात आज (१ मे) महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सर्वजण आपापल्या पद्धतीने महाराष्ट्र दिन साजरा करत आहेत. सर्व मराठी बांधव एकमेकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रासाठी, मराठी भाषेसाठी नेहमी अग्रही भूमिका घेणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील वेगळ्या स्टाईलमध्ये महाराष्ट्र दिनाचा शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच महाराष्ट्र दिन कसा साजरा करायला हवा, आपल्या भाषेसाठी आणि राज्यासाठी प्रत्येकाने कशी अग्रही भूमिका घ्यायला हवी याबाबत मार्गदर्शन केलं आहे. हे मार्गदर्शन करण्यासाठी राज ठाकरे यांनी आपल्या तरुणाईचं सर्वात आवडतं आणि प्रचलित माध्यम निवडलं आहे. ते माध्यम म्हणजे इन्स्टाग्राम रील. राज ठाकरे यांनी इन्टाग्रामवरील प्रसिद्ध रीलस्टार अथर्व सुदामे याच्याबरोबर एक रील तयार केलं असून या रीलद्वारे त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या रीलमध्ये अथर्व सुदामे महाराष्ट्र दिनानिमित्त एका भाषणाची तयारी करताना दिसतोय. सुदामेच्या भाषणात महाराष्ट्रातील अनेक थोर व्यक्तींचा उल्लेख आहे. तेवढ्यात राज ठाकरे तिथे येऊन अथर्वचं ते भाषण पाहतात, त्याचं कौतुक करतात आणि म्हणतात, तुझं भाषण चांगलं आहे. अनेक थोरांचे त्यात उल्लेख आहेत. परंतु, आपण आज काय करतोय ते सांगणंदेखील गरजेचं आहे. त्या त्या पिढ्यांनी त्यांचं त्यांचं कर्तृत्व गाजवलं आणि महाराष्ट्र मोठा केला. आज आपण असं काय करणार आहोत ज्याद्वारे महाराष्ट्र आणखी पुढे जाईल. त्याचा विचार करणं जास्त गरजेचं आहे. आपण मराठी भाषा रुजवली पाहिजे. आपण आपल्या भाषेत बोललं पाहिजे. समोरचा माणूस हिंदीत बोलल्यावर आपण घरंगळत त्याच्याशी हिंदीतच बोलतो. त्याची काही आवश्यकता नाही. मराठीचा अभिमान, महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवणं गरजेचं आहे. ते करताना आपण आपला खारीचा वाटा उचलणं हे आपलं कर्तव्य आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या वर्षी अमित ठाकरे यांच्या कल्पनेतून समाजमाध्यमांवरील इन्फ्लूएन्सर्सची, कॉन्टेंट क्रिएटर्सची रीलबाज ही एक आगळीवेगळी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत इन्स्टाग्राम इन्फ्लूएन्सर अथर्व सुदामे यालादेखील पुरस्कार मिळाला होता. या पुरस्कार वितरण सोहळ्याला राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. राज ठाकरेंनी तेव्हा मंचावरून केवळ पाच मिनिटांचं संबोधन केल होतं. तेव्हा राज ठाकरे यांनी गर्दीत उभ्या असलेल्या अथर्व सुदामेला मंचावर बोलावून त्याचं कौतुक केलं होतं. तसेच राज ठाकरे म्हणाले होते की, हा माझा सर्वात लाडका रीलबाज आहे. त्याच लाडक्या रीलबाजाबरोबर राज ठाकरे यांनी त्यांचं पहिलं रील बनवलं आहे.

हे ही वाचा >> २०१७ मध्येच राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये युती होणार होती – सुनील तटकरे

‘महाराष्ट्र दिन’ १ मे रोजी का साजरा केला जातो?

१ मे रोजी महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण असते. या दिवशी लोक पारंपरिक महाराष्ट्रीय पोशाख परिधान करतात आणि महाराष्ट्रीय संस्कृतीचा गौरव करतात. कारण याच दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. साधारण ६४ वर्षांपूर्वी १९६० मध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली होती. महाराष्ट्रासह गुजरात राज्याची स्थापनादेखील १ मे रोजी करण्यात आली होती.