भाजपा ४०० पार कसे जाणार? निवडणुकीचे आयोजन कसे केले आहे? याबाबत भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी लोकसत्ता लोकसंवाद या कार्यक्रमात बोलताना माहिती दिली. भाजपाचे सर्व राष्ट्रीय सरचिटणीस निवडणुकीच्या नियोजनात लागले आहेत असे सांगताना विनोद तावडे म्हणाले की, निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर प्रत्येक लोकसभा मतदारसंघानुसार नियोजन करण्यात आले. बिहारमध्ये मतदानादिवशी असलेल्या जत्रा, लग्न किंवा इतर अडचणी काय आहेत, याची माहिती घेतली. मतदानाच्या दिवशी ज्या ज्या लोकांनी मंगल कार्यालये बुक केली होती. त्या लोकांशी संपर्क साधून पुढचा-मागचा मुहूर्त घेण्याची विनंती केली. आमच्या विनंतीनंतर ६० ते ६५ टक्के लोकांनी मुहूर्त बदलले, अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली.

अमित शाहांनी पर्यटकांच्या टूर पुढे ढकलल्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणुकीचं नियोजन कसं केलं, याची माहिती देताना तावडे म्हणाले की, मतदानाच्या दिवशी कोणकोणत्या लोकांनी बाहेगावी पर्यटनाला जाण्याचं बुकिंग केलं आहे, याची माहिती मिळवली. त्या सर्वांचे पत्ते मिळवून भाजपाचे कार्यकर्ते त्यांच्या घरी पोहोचले आणि पर्यटकांना त्यांची टूर पुढे ढकलण्याची विनंती केली. टूर रद्द केल्यास कॅन्सलेशन चार्जेस लागणार नाही, याची हमीही दिली. ६८ हजार लोकांनी आपली टूर पुढे ढकलली, अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली.

भाजपा इतर पक्षातील नेत्यांना का फोडतं?

निवडणुकीचं अतिशय उत्तम नियोजन करून भाजपा विजय मिळवतो, तरीही त्यांना इतर पक्षातून नेते फोडण्याची गरज का लागते? असाही प्रश्न विनोद तावडे यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, नांदेडमधील अशोक चव्हाण यांना आम्ही पक्षात घेतलं. ४० वर्षात नांदेडमध्ये आमचा एकही आमदार नव्हता. मग आम्ही नांदेडमध्ये वाढायचं की नाही? तशाच प्रकारे ज्या ठिकाणी आम्ही कधीच निवडणूक जिंकलो नाही, अशा ठिकाणी इतर पक्षातील नेत्यांना संधी दिली जाते, असे विनोद तावडे म्हणाले.

“भाजपा आता स्वयंपूर्ण आहे”, RSS शी संबंधांवर जे. पी. नड्डांचं मोठं भाष्य; म्हणाले, “आधी त्यांची गरज पडायची!”

भाजपा ४०० पार कसं जाणार?

लोकसभा निवडणुकीत भाजपाने ४०० जागा जिंकू, अशी घोषणा दिली. मात्र ही घोषणा प्रत्यक्षात कशी उतरणार? याबाबतही विनोद तावडे यांनी माहिती दिली. लोकसत्ता लोकसंवादमध्ये बोलत असताना विनोद तावडे म्हणाले, “भाजपा जवळपास ३४० ते ३५५ जागांवर विजय मिळवेल. तर एनडीएमधील घटक पक्ष ७०हून अधिक ठिकाणी विजय मिळवतील.” भाजपाने यावेळी १६० जागांवर अधिक लक्ष केंद्रीत केलं आहे. या जागा यापूर्वी भाजपाने कधीही जिंकल्या नव्हत्या. या १६० पैकी जवळपास ६० ते ६५ जागांवर भाजपाचा विजय होईल, असेही विनोद तावडे म्हणाले.