Lok Sabha Elections 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीतून तिसऱ्यांदा तर राहुल गांधी हे रायबरेतून पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. दोन्ही मतदारसंघ उत्तर प्रदेशमध्ये मोडतात. मोदींनी १४ मे रोजी वाराणसीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी त्यांच्या संपत्तीचीही माहिती दिली. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी वायनाड येथून उमेदवारी अर्ज सादर करताना संपत्तीची माहिती दिली होती. यानिमित्ताने दोन्ही नेत्यांची संपत्ती किती आहे? कोण अधिक श्रीमंत आहे? त्यांच्या मिळकतीचा स्त्रोत काय? हे जाणून घेऊ.

पंतप्रधान मोदींनी नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदी लागू केल्यानंतर त्या निर्णयावर जोरदार टीका झाली. लोकांना मनस्ताप सहन करावा लागला होता. आपल्या निर्णयाची पाठराखण करत असताना पंतप्रधान मोदींनी डिसेंबर २०१६ रोजी म्हटले की, “हम तो फकीर आदमी है, झोला ले के चल पडेंगे”. २०१४ साली जेव्हा पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढविली तेव्हा त्यांनी १.६५ कोटींची संपत्ती जाहीर केली होती. प्रथम लोकसभा लढविण्याआधी नरेंद्र मोदी सलग तीन टर्म गुजरातचे मुख्यमंत्री होते.

मागच्या दहा वर्षांत पंतप्रधान मोदींची संपत्ती १.६५ कोटींवरून २०१४ मध्ये ३.०२ कोटींपर्यंत पोहोचली आहे. तर २०१९ मध्ये पंतप्रधान मोदींनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात २.५१ कोटींची संपत्ती असल्याचे जाहीर केले होते.

ना घर, ना गाडी, कर्जही नाही

पंतप्रधान मोदी यांनी २०२४ साठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात कोणतीही स्थावर मालमत्ता नसल्याचे जाहीर केले आहे. पंतप्रधान मोदींनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये २.८५ कोटींच्या मुदत ठेवी ठेवल्या आहेत. तसेच ९.१२ लाख रुपये राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र या पोस्टाच्या योजनेत गुंतवले आहेत. त्यांच्याकडे २.७ लाखांच्या चार सोन्याच्या अंगठ्या आहेत. याशिवाय शेअर्स, म्युच्युअल फंड किंवा बाँड असे काहीही त्यांच्याकडे नाही.

पंतप्रधान मोदींकडे ५२,९२० रुपयांची रोकड आहे. याशिवाय त्यांच्या डोक्यावर कोणतेही कर्ज नाही.

राहुल गांधी मोदींपेक्षा सहापट श्रीमंत

राहुल गांधी यांनी वायनाड आणि रायबरेली मतदारसंघातून अर्ज सादर करताना २०.३४ कोटींची संपत्ती असल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे जाहीर केले आहे. यापैकी चल संपत्ती ९.२४ कोटी आणि अचल संपत्ती ११.१४ कोटींची आहे. याशिवाय त्यांच्यावर ४९.७ लाखांचे कर्जही आहे.

पंतप्रधान मोदींनी केवळ मुदत ठेवीमध्ये पैसे गुंतविले आहेत. तर राहुल गांधींनी शेअर्स, म्युच्युअल फंड अशा विविध ठिकाणी गुंतवणूक केली आहे. त्यांनी ४.३ कोटी रुपये शेअर बाजारात गुंतवले आहेत. तर म्युच्युअल फंडात ३.८१ कोटींची गुंतवणूक आहे. राहुल गांधी यांच्या बँक खात्यात २६.२५ लाख आहेत. राहुल गांधी यांच्याकडे ५५ हजारांची रोकड आणि २०२२-२३ या आर्थिक वर्षातील एकूण उत्पन्न १.०२ कोटी असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्याकडे १५.२ लाखांचे गोल्ड बॉण्ड आहेत. तसेच त्यांनी राष्ट्रीय बचत योजना (नॅशनल सेविंग्ज स्किम), पोस्ट खात्यात बचत, इन्शुरन्स पॉलिसि आणि इतर मिळून ६१.५२ लाख रुपये गुंतविले आहेत.