काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नसीम खान यांनी आपल्या स्टार प्रचारक पदाचा आणि प्रचार समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे ऐन निवडणुकीत महाराष्ट्र काँग्रेसला मोठा धक्का बसला. नसीम खान यांनी काँग्रेस पक्षाने राज्यात एकही मुस्लीम उमेदवार दिला नाही म्हणून आपली नाराजी व्यक्त केली. तसेच पक्षाच्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिल्यानंतर नसीम खान यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. याचेवेळी ‘एमआयएम’ आणि ‘वंचित’कडून ऑफर असल्याच्या चर्चांवरही त्यांनी भाष्य केले.

नसीम खान काय म्हणाले?

“विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मुंबईचे संघटन, उत्तर भारतीयांचे संघटन किंवा अल्पसंख्याकांचे महाराष्ट्रातील संघटन असो. त्या सर्वांनी मला फोन करुन रोष व्यक्त केला. कारण काँग्रेसने अल्पसंख्याकांना एकही उमेदवारी का दिली नाही? असे प्रश्न मला लोक विचारत आहेत. तुम्ही काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आहात, गुजरात, तेलंगनाला प्राचार करण्यासाठी जात आहात. मग महाराष्ट्रामध्ये एकही उमेदवार अल्पसंख्याक का दिला नाही. तुमची अशी काय मजबूरी आहे? असे प्रश्न मला लोक विचारत आहेत. त्यांच्या या प्रश्नांशी मी देखील सहमत आहे”, असे नसीम खान यांनी सांगितले.

हेही वाचा : संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, “शिंदे गट आणि अजित पवार गटाचा एकही खासदार…”

“महाराष्ट्रात अनेक मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार आहेत. मग काँग्रेस किंवा महाविकास आघाडीने एकही उमेदवार का दिला नाही हा प्रश्न आहे. त्यामुळे स्टार प्रचारक पदाचा राजीनामा देण्याचा मी निर्णय घेतला. या परिस्थितीबाबत मी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला अवगत केले आहे. मी काँग्रेस पक्षाचा कर्मठ कार्यकर्ता आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली आहे. प्रश्न फक्त माझ्या नाराजीचा नाही. मी ज्या समाजाचे नेतृत्व करत आहे, त्या समाजामध्ये नाराजी आहे. मी फक्त पक्षाची काळजी म्हणून ही भूमिका मांडत आहे”, असेही नसीम खान यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीला आपला विरोध नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

‘एमआयएम’आणि ‘वंचित’च्या ऑफरवर नसीम खान काय म्हणाले?

काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना ‘एमआयएम’आणि ‘वंचित’कडून ऑफर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावर नसीम खान यांनी भाष्य केले. नसीम खान म्हणाले, “मला ‘एमआयएम’बाबत काही भाष्य करायचे नाही. त्यांनी दाखवलेल्या सहानुभूतीबाबत त्यांचे आभार”. ‘वंचित’च्या ऑफरवर ते म्हणाले, “आता मला त्याबाबत कोणत्याही प्रकारचे भाष्य करायचे नाही. मला कोणाचीही ऑफर प्रेरित करु शकत नाही.”