रॉकबाबा, आम्हाला वाचवा..

अनुयायांना अजून थेट ‘संदेश’ नाहीच

गुरुमित राम रहिम यांच्या पाठिंब्यासाठी अकाली दल – भाजपचा आटापिटा; अनुयायांना अजून थेट ‘संदेश’ नाहीच

प्रतिभावान लेखक, विचारवंत, संशोधक, जबरदस्त नेतृत्व, सच्चा सामाजिक सुधारक, सूर आणि स्वरांचा बादशहा, बहुभाषिक वक्ता, भ्रष्टाचारविरोधी जननायक, कृषी- व्यसनमुक्ती-जागतिक तापमानवाढ विशेतज्ज्ञ, प्रभावशाली लोकसंख्या नियंत्रक, श्रेष्ठ खेळाडू, विश्वविख्यात फॅशन डिझायनर..केवढा हा अफलातून बायोडेटा. अंगी एवढे ‘दिव्य तेज’ धारण करणारया सिरसीवाले बाबांबद्दल कुतुहल होते.  कोणत्याही अँगलने तो बाबा, संत, साधू वाटत नाही. इतर बाबा सत्संग करतात; पण अचकट-विचकट कपडे घालणारा हा बाबा सत्संगाबरोबर रॉक शोज् करतो. ते ही लाखालाखांचे. त्यात सबकुछ तोच असतो. रॉक असला तरी गाणी उडत्या चालीची नाहीत बरे. मग कसली? जातभेदाविरुद्ध, दहशतवादाविरूद्ध, स्त्रीभ्रूणहत्येविरुद्ध, सामाजिक चालीरीतींविरुद्ध. उदाहरणार्थ.. ’ना धर्म पे, ना जात पे, लढाई आंतकवाद से’ वगरे वगरे. आतापर्यंत सहा म्युझिक अल्बम प्रसिद्ध झालेत. नावे तर पहा. ‘नेटवर्क तेरे लव्ह का’, ‘लव रब से’, ‘हायवे लव चार्जर’.. सगळी ‘डबल मीिनग’ची. पण उलटी, म्हणजे सगळी ईश्वराला उद्देशून! या रॉक बाबाचे नाव गुरमीत राम रहिम सिंग. हरियाणा-पंजाब सीमेवरील सिरसा येथील ‘डेरा सच्चा सौदा’चे प्रमुख.

आतापर्यंत त्यांचे तीन चित्रपट प्रदíशत झालेत. ‘हिंद का नापाक को जवाब’ हा चवथा रांगेत. नुकताच त्याची झलक (ट्रेलर) प्रदíशत झाली. त्यातही सबकुछ बाबा. ‘हाल्रे डेव्हिडसन’वरून येणारा, जबरदस्त स्टंटमध्ये थेट ’यन्ना रास्कला’ रजनीकांतशी स्पर्धा करणारा, दणाणून सोडणारी गाणी म्हणणारा, त्यावर थिरकणारा.. तीनही चित्रपट सुपरडुपर हिट. उत्तरेत सगळीकडे करमुक्त. गंमत म्हणजे, बाबांनी आपल्या डेरयातच खास चित्रपटगृह उभारलय आणि चित्रपटनिर्मितीची अदयावत यंत्रणाही  बसवून घेतलीय.  डेरा म्हणजे आपल्याकडील मठ. पण मठासारखा नाही. मुख्य प्रवेशद्वारातून मठापर्यंत जायला किमान तीन किलोमीटरचे अंतर कापावे लागते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानेच दुकाने. सगळी डेरयाची मालमत्ता. किमान चार-पाचशे कोटींची. जत्राच भरली होती म्हणा. गर्दीने पाऊल ठेवायला जागा नव्हती.  गर्दीतून माग काढत मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोचलो. तिथे एक पोलिस भेटला. तो जम्मू- काश्मीरचा पोलिस. पण त्याची नियुक्ती डेरयाच्या सुरक्षिततेसाठी. बहुतेक पंजाबी असावा. बाबाला भेटायला आल्याचे सांगताच गर्दीतच बाबांच्या चमत्काराची किती महती सांगू, असे त्याला झाले. बाबांनी हे केले, बाबांनी ते केले. असा चमत्कार केला.. असे बरेच काही सांगत असताना तो हे ही म्हणाला,‘‘आतापर्यंत बाबांनी काही मेलेल्यांना जिवंतही केलेय.’’

एका पोलिसाच्या तोंडून एवढी बाबास्तुती ऐकून मी रामराम केला आणि आत शिरलो. अर्थात त्याच्या मदतीने. आत तर मुंगीसाठीही जागा नाही. माहिती घेतल्यावर समजले, की सायंकाळी बाबांचा ध्यानधारणा (मेडिटेशन) कार्यक्रम आहे आणि पुढील दोन दिवस सत्संग आहे. मग बाबांचे मुख्य प्रवक्ते डॉ. आदित्य इन्सान भेटले. हा माणूस परदेशात शिकलेला उच्चविद्याविभूषित. वैद्यकीय क्षेत्रातील   दिल्लीतील ‘एम्स’मधील नेत्रतज्ज्ञ. पण एकदा बाबांच्या संपर्कात आला आणि डेरयाचाच बनून राहिला. डेरयाकडून देशातील सर्वात मोठी नेत्रपेढी चालविली जाते. डॉ. आदित्य त्याचे सर्वेसर्वा. त्यांचा दावा मानल्यास बाबांनी लाखोंचे आयुष्य बदललेले आहे. बाबांच्या सांगण्यावरून अनेकांनी आपले आडनाव ’इन्सान’ असे ठेवले आहे, जेणेकरून जात समजू नये. डॉ. आदित्य यांनीही तोच कित्ता गिरवलाय.

डेराचा पाठिंबा कुणाला?

पण पंजाब निवडणुकीचा आणि या बाबाबद्दलच्या अतिमाहितीचा काय संबंध? तो ही हरियाणात डेरा घातलेल्या बाबाचा? नुसताच संबंध नाही; तर बाबाच्या राजकीय इशारयाची पंजाबमधील सगळेचजण आतुरतेने वाट पाहत आहेत.  डेरा अधिकारयांनुसार, बाबांच्या जगभरातील भक्तांची संख्या पाच कोटी. अगदी अमेरिकेपासून ते सातारा-रायगडापर्यंत त्यांचे आश्रम आहेत. बाबांच्या एका इशारयावरून भक्त जीव द्यायला तयार होतात, मग एक मत देणार नाहीत? हीच झाकली मूठ सर्वपक्षीय नेत्यांना बाबांकडे सदैव रांग लावण्यास भाग पाडते. बाबा म्हणतात, आशीर्वाद सर्वाना. ‘स्पेशल आशीर्वाद किसी को नही..’ अपवाद२०१४ मधील हरियाणा निवडणुकीचा. बाबा उघडपणे भाजपकडे गेले. मोदी लाटेबरोबर बाबांचा ‘स्पेशल आशीर्वाद’ कामी आला आणि हरियाणात कधी नव्हे, ते कमळ फुलले.

सबसे बडा खिलाडी..

या दबदब्यानेच बाबा पंजाब निवडणुकीतही ’बडा खिलाडी’ आहेत. म्हणून तर सर्वाचे लक्ष त्यांच्याकडे. मुक्तसर, भटिंडा, फजिलका, फरीदकोट, मनसा, बर्नाला, संगरूर या पंजाबच्या माळवा प्रांतात तर भक्तांची संख्या हजारोंमध्ये आणि हाच माळवा पंजाबसाठी कळीचा. ११७ पकी तब्बल ६७ जागा तिथे आहेत. आम आदमी पक्षाचा सर्वाधिक जोर तिथेच आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, ’आप’ची मदार असलेले गरीब व मागासमंडळी बाबांची भक्तगण आहेत. म्हणजे ‘आप’ला रोखायचे असेल तर बाबास्त्र सुटणे अतिनिकडीचे. त्यामुळेच तर ‘सुपर आशीर्वादा’साठी बादल आणि भाजप देव पाण्यात घालून बसलेत. मतदानाला आठ-दहा दिवस उरले असतानाही बाबा काही बोलायला तयार नाही. फक्त ‘साध संगत राजनीतिक’कडे बोट दाखवित आहेत. साध संगत ही डेरयाची राजकीय शाखा. बाबा आणि त्यांचे मुख्य प्रवक्ते डॉ. आदित्य यांच्या मते, ’राजकीय शाखा स्वायत्त आहे. बाबा त्यांना कोणताही आदेश देत नाहीत.’ मग हरियाणावेळी तुम्ही भाजपला उघड पािठबा कसा दिला?, या प्रश्नावर सारवासारव करताना ते म्हणतात, ’त्यावेळी भूिपदर हुडा सरकारला जनता कंटाळली होती. एकाच जातीची (म्हणजे जाट) एकाधिकारशाही इतरांचे शोषण करीत होती. म्हणून साध संगतने निर्णय घेतला. पंजाबबाबत काय करायचे तेच ठरवतील.’ ‘बादलांना पंजाबची जनता कंटाळल्यासारखी वाटतेय. मग तुम्ही हुडांना लावलेला नियम बादलांना का लावत नाही?,’ या थेट प्रश्नावर डॉ. आदित्य यांच्याकडे स्पष्ट उत्तर नव्हते. रागरंग असाय, की बादल सरकारविरोधातील वातावरणाची बाबांना कल्पना आलीय. हणून तर पािठब्याचा फतवा काढण्याची टाळाटाळ आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पंजाब बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gurmeet ram rahim singh