लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारांना वेग आला आहे. मुंबईत पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. यानिमित्ताने आरोप प्रत्यारोपांना उत आला आहे. जाहीरनाम्यावर अवलंबून असलेली ही निवडणूक आता धर्माच्या मुद्द्यावर येऊन पोहोचली आहे. त्यामुळे अनेकजण एकमेकांवर धर्माच्या आधारावर टीका करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनीही आता उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. ते एएनआयच्या मुलाखतीत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हे पहिल्यांदा आमच्या लक्षात येत आहे की तुष्टीकरणाची नीती सुरू आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे,स्वतःला हिंदुत्त्ववादी म्हणत होते, ते ज्या प्रकारे तुष्टीकरण करत आहेत ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. एक वेळ होती, आमचे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या भाषणाची सुरुवात करायचे की माझ्या तमाम हिंदू बंधू, भगिनी आणि मातांनो असं करायचे. उद्धव ठाकरेही अशापद्धतीने सुरुवात करायचे. पण इंडिया आघाडीच्या पहिल्या सभेत त्यांना सर्व नेत्यांनी सांगितलं की हिंदू शब्द सोडून द्या त्यांनी हिंदू शब्द सोडला होता.

हेही वाचा >> शिवसेनेच्या बालेकिल्यात एकनाथ शिंदेंचा रोड शो का नाही? फडणवीस म्हणाले, “जनतेला ज्याचं…”

“तुष्टीकरणाची नीती इथपर्यंत पोहोचली आहे की त्यांच्या रॅलीत अल्लाहू अकबरचे नारे लागतात. टीपू सुलतानचे नारे लागतात. त्यांच्या रॅलीत बॉम्ब ब्लास्टमधील आरोपी सहभागी होतो. त्यांच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे नाचवले जातात. ही तुष्टीकरणाची नीती सुरू आहे. वोट जिहादची चर्चा आहे. जो मोदींना हरवू शकतो त्यांना वोट द्या. तुम्ही त्याची पार्टी पाहू नका, मोदींना हरवणं हेच त्यांची प्राथमिकता आहे”, असा दावाही त्यांनी केलाय.

उद्धव ठाकरेंवर होतेय सातत्याने टीका

देवेंद्र फडणवीसांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. तेव्हा ते म्हणाले, “तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो आहे, की निवडणूक तुम्ही पाहात आहातच. तुम्ही हेदेखील पाहात आहात मोदींच्या विकासासमोर कुणालाही मतं मागता येत नाहीयेत. भारतातली मतं संपली आहेत पाकिस्तानातून मतं मागण्याचं काम विरोधक करत आहेत. राहुल गांधींसाठी पाकिस्तानाचे मंत्री पोस्ट करत आहेत. आम्हाला वाटलं की उद्धव ठाकरे वेगळे असतील. पण मला आश्चर्य वाटतं की परवा उद्धव ठाकरेंच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकत होता. काय दुर्दैव आहे बघा, हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्राच्या रॅलीमध्ये मतांसाठी जर पाकिस्तानचा झेंडा फडकत असेल तर या ठिकाणी देशभक्त मोदींच्या पाठीशी उभे राहतील.