उत्तर प्रदेशसह पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमधील विधानसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलचे अंदाज गुरुवारी वर्तवण्यात आले आहेत. आता सगळ्यांच्या नजरा शनिवारी जाहीर होणाऱ्या निकालांकडे लागले आहे. एक्झिट पोलच्या अंदाजामुळे भाजपसाठी ‘अच्छे दिन’ आल्याचे संकेत दिल्याने उत्तर प्रदेशातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच विजयी जल्लोष सुरू केला आहे. तर समाजवादी पक्ष-काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विजय मिळावा, यासाठी देवाचा धावा केला आहे. कार्यकर्त्यांनी यज्ञ करून विजयासाठी साकडे घातले आहे.

पाच राज्यांपैकी किमान तीन राज्यांत भाजपचा विजय होईल, असे एक्झिट पोलचे अंदाज आहेत. उत्तर प्रदेशात भाजपला मॅजिक फिगर गाठता येणार नाही, तरी क्रमांक एकचा पक्ष ठरेल, असा अंदाज आहे. गोवा आणि उत्तराखंडमध्ये भाजपची सत्ता येईल, असे भाकित आहे. पंजाबमध्ये आप आणि काँग्रेसला समान जागा मिळतील, असा अंदाज असल्याने तिथे कमालीची चुरस असेल, तर मणिपूरमध्ये काँग्रेसला सत्ता मिळू शकते, असा अंदाज आहे. पण काही वृत्तवाहिन्यांनी भाजपला बहुमत मिळेल, असेही म्हटले आहे. एक्झिट पोलचे अंदाज जाहीर होताच भाजपच्या गोटात आनंदाला भरते आले आहे. तर उत्तर प्रदेशात काँग्रेस-समाजवादी पक्षाच्या आघाडीचा विजय होईल, असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशात विजयाचे ‘कमळ’ फुलणार असल्याने तेथील कार्यकर्त्यांनी आतापासूनच फटाके फोडायला सुरुवात केली आहे. अलाहाबादमधील कार्यकर्त्यांनी तर रस्त्यावर जल्लोष सुरू केला आहे. फटाक्यांची आतषबाजी केली आहे. तर उत्तर प्रदेशात अखिलेश-राहुल यांची ‘साथ’ पसंत आहे. ११ मार्चला अखिलेश-राहुल यांचा ‘राज्याभिषेक’ असेल, असे फलक काही कार्यकर्त्यांनी घेऊन विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. कानपूरमध्ये समाजवादी पक्ष-काँग्रेस आघाडीचाच विजय व्हावा, यासाठी चक्क देवाकडे साकडे घालण्यात आले. विशेष प्रार्थनेचे आयोजन करून होम-हवनही केले. आता शनिवारी निकाल जाहीर होणार आहेत. त्यामुळे कुठे उत्सुकता, जल्लोष तर कुठे धाकधूक…असे चित्र पाहायला मिळत आहे.