नवीन क्रेडिट कार्ड ग्राहक जोडण्यासोबतच सर्व प्रकारच्या डिजिटल व्यवसायातील नवे व्यवहार सुरू करण्यास भारतीय रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेवर तात्पुरती बंदी घातली आहे. खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या एचडीएफसीसाठी हा मोठा झटका असल्याचे मानण्यात येत आहे.

एचडीएफसीने काय म्हटलं आहे?

एचडीएफसी बँकेने मुंबई शेअर बाजाराला पत्र पाठवून सांगितले आहे की, रिझर्व्ह बँकेने दोन डिसेंबर रोजी सदर आदेश जारी केला आहे. एचडीएफसीच्या बँकेच्या इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग व पेमेंट युटिलिटीसंदर्भात व्यत्यय येण्याचे प्रकार गेल्या दोन वर्षांमध्ये काही वेळा घडले होते. यामध्ये २१ नोव्हेंबर रोजी बँकेच्या प्रायमरी डेटा सेंटरमध्ये वीजपुरवठा बंद झाल्याच्या घटनेचाही समावेश आहे, ज्यामुळे इंटरनेट बँकिंग व पेमेंट यंत्रणेत व्यत्यय आला होता.

या प्रकारांमागील त्रुटी दूर करण्यास व या घटनांची जबाबदारी कुणाची हे निश्चित करण्यासही रिझर्व्ह बँकेने सांगितल्याचे एचडीएफसी बँकेने नमूद केले आहे. आम्ही आयटी यंत्रणेवर काम करत असून लवकरात लवकर यंत्रणा ठीक करू तसेच आरबीआयच्या संपर्कात राहू अशी हमी एचडीएफसी बँकेनं दिली आहे. या निर्बंधांचा बँकेच्या एकूण व्यवसायावर विपरीत परिणाम होणार नाही असा विश्वासही एचडीएफसी बँकेने व्यक्त केला आहे.

मात्र मागील दोन वर्षांमध्ये अशाप्रकारे एखाद्या खासगी बँकेसंदर्भात अशी समस्या निर्माण होण्याची ही तिसरी घटना आहे. त्यामुळेच एचडीएफसीवर आरबीआयने लादलेल्या निर्बंधांचा ग्राहकांवर काय परिणाम होणार हे जाणून घेणं महत्वाचं आहे.

आरबीआयने काय केलं आहे?

आरबीआयने एचडीएफसीला डिजिटल २.० अंतर्गत सर्व डिजिटल बिझनेस जनरेटिंग उपक्रम ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळेच माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आयटी क्षेत्राचा वापर करुन बँकेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या सर्व व्यवहारांवर निर्बंध लागू झालेत. तसेच नवीन क्रेडिट कार्डही बँकेला जारी करता येणार नाहीत. बँकेने आरबीआयने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करुन अपेक्षित सुधारणा केल्यानंतर हे निर्बंध हटवण्यात येतील.

देशभरात एचडीएफसीच्या किती शाखा आणि किती एटीएम?

बँकेने या निर्बंधांचा बँकेच्या व्यवहारांवर काही परिणाम होणार नाही असं स्पष्ट केलं आहे. बँकेच्या क्रेडिट कार्ड आणि डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून होणाऱ्या सेवांवर या निर्णयाचा परिणाम होणार नाहीय. एचडीएफसी बँकेच्या देशाभरात दोन हजार ८४८ शाखा आहेत. देशात बँकेचे १५ हजार २९२ एटीएम आहेत. एचडीएफसी बँकेने आतापर्यंत १.४९ कोटी क्रेडिट कार्ड आणि ३.३८ कोटी डेबिट कार्ड जारी केलेत.

एचडीएफसी बँकच्या व्यवहारांमध्ये सतत का येत आहेत अडचणी?

समोर आलेल्या माहितीनुसार एचडीएफसी बँकेची सेवा खंडित होण्यामागील प्रमुख कारण प्रायमरी डेटा सेंटरमधील विजपुरवठा खंडित होणे, हे आहे. यापूर्वीही बँकेला अशा समस्यांना तोंड द्यावं लागलं आहे. त्यामुळेच आता आरबीआयला या समस्येसंदर्भातील सविस्तर माहिती बँकेने द्यावी असं अपेक्षित आहे. एटीएमच्या माध्यमातून होणारे व्यवहार, कार्ड्स आणि युपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांमध्ये अडथळा निर्माण होऊ नये आणि ग्राहाकांना भूर्दंड पडू नये म्हणून आरबीआयने ही माहिती मागवली आहे.

यापूर्वी कधी असं झालं होतं?

यापूर्वी एचडीएफसीच्या व्यवहारांमध्ये २१ नोव्हेंबर रोजी अशी अडचण निर्माण झाली होती. यानंतर आरबीआयने बँकेकडून यासंदर्भात स्पष्टीकरण मागवलं होतं. यापूर्वी मागील वर्षी डिसेंबर महिन्यात बँकेच्या व्यवहारांमध्ये मोठी समस्या निर्माण झाली होती. यासंदर्भात सोशल मीडियावरही चर्चा झाली होती. त्यावेळीस बँकेच्या लाखो ग्राहकांना दोन दिवस मोबाइल बँकिंग आणि नेट बँकिंगची सेवा मिळालेली नव्हती.

ग्राहकांवर काय परिणाम होणार?

आरबीआयने सध्या घातलेल्या निर्बंधांमुळे आता बँकेला ग्राहकांसाठी डिजिटल माध्यमांवर कोणताही नवीन सेवा निर्बंध उठवण्यात येईपर्यंत लॉन्च करता येणार नाही. तसेच हे निर्बंध आरबीआयकडून मागे घेण्यात येत नाही तोपर्यंत कोणलाही एचडीएफसीकडून नवं क्रेडिट कार्ड दिलं जाणार नाही. मात्र बँकेने इतर यापूर्वी कार्ड जारी केलेल्या ग्राहाकांना कोणतीही समस्या येणार नाही असं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे सध्या मोबाईल अॅप, नेट बँकिंगच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या व्यवहारांवरही परिणाम होणार नसल्याचं बँकेने स्पष्ट केलं आहे.