– संदीप कदम

भारताच्या पुरुष फुटबॉल संघाने यंदाच्या हंगामाची दमदार सुरुवात केली. आंतरखंडीय चषक व ‘सॅफ’ अजिंक्यपद स्पर्धा जिंकत भारताने चमक दाखवली. या कामगिरीमुळे भारतीय संघ पुन्हा जागतिक क्रमवारीत अव्वल १०० संघांमध्ये पोहोचला आहे. भारताची ही कामगिरी प्रभावी का ठरते, या यशाचे गमक काय, प्रशिक्षक इगोर स्टिमॅच यांची भूमिका महत्त्वाची कशी, तसेच संघासमोर आगामी काळात कोणती आव्हाने आहेत, याचा आढावा.

Kevin Pietersen's big statement on Sanju Samson
IPL 2024 : “जर मी निवडकर्ता असतो तर…”, इंग्लंडचा माजी दिग्गज केविन पीटरसनचे संजू सॅमसनबाबत मोठं वक्तव्य
Indian Women Badminton Team gets off to a winning start sport news
भारतीय महिला बॅडमिंटन संघाची विजयी सुरुवात
Indian men women team entered archery world cup 2024 finals
भारतीय तिरंदाजांची पदकनिश्चिती; पुरुष, महिला कम्पाऊंड संघ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत; प्रथमेश, सुरेखाची चमक 
India's Possible Squad for World Cup 2024
T20 World Cup 2024 साठी मोहम्मद कैफने निवडला संघ, अश्विन ऐवजी ‘या’ खेळाडूला दिले स्थान, पाहा संपूर्ण संघ

भारताची या हंगामातील कामगिरी कशी राहिली आहे?

भारतीय पुरुष फुटबॉल संघाने या हंगामात दोन जेतेपदे मिळवली आहेत. जून महिन्यात भारताने आंतरखंडीय चषक स्पर्धेचे जेतेपद मिळवले. भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारताने लेबनॉनवर २-० असा विजय नोंदवला. भारताला तब्बल ४६ वर्षांनंतर लेबनॉनला नमवण्यात यश आले. भारत २०१८ मध्येही या स्पर्धेचा विजेता होता. यानंतर भारताने ‘सॅफ’ अजिंक्यपद स्पर्धेचाही चषक उंचावला. निर्धारित वेळेत आणि अतिरिक्त वेळेतही अंतिम सामना १-१ असा बरोबरीत राहिल्यानंतर भारताने कुवेतला पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-४ अशा फरकाने नमवले. भारताचे हे नववे ‘सॅफ’ विजेतेपद ठरले. भारताने साखळी फेरीत कुवेतविरुद्धचा सामना बरोबरीत राखला, तर नेपाळ व पाकिस्तानविरुद्ध विजय नोंदवले. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने लेबनॉनला पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत केले. भारताला या चांगल्या कामगिरीचा फायदा ‘फिफा’ क्रमवारीत झाला व संघ पुन्हा एकदा जगातील अव्वल १०० संघात पोहोचला. भारताचे १२०४.९० गुण आहेत.

हेही वाचा : खेळ, खेळी खेळिया : भारतीय फुटबॉलवर बोलू काही..

आगामी काळात फुटबॉल संघासमोर कोणती आव्हाने आहेत?

दोन स्पर्धा जिंकल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेला भारतीय संघ ७ ते १० सप्टेंबरदरम्यान थायलंड येथे होणाऱ्या किंग्ज चषक स्पर्धेत खेळेल. भारताने १९७७ आणि २०१९ मध्ये या स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे. या स्पर्धेत इराक, लेबनॉन व थायलंड हे इतर संघ असतील. भारतीय संघासमोर इराकला नमवण्याचे आव्हान असेल. ‘फिफा’ क्रमवारीत ७२व्या स्थानी असलेल्या इराकविरुद्ध भारताला चांगला खेळ करावा लागेल. यानंतर मर्डेका चषकाचे आयोजन १४ ते १७ ऑक्टोबरदरम्यान होईल. मलेशिया येथे होणाऱ्या या स्पर्धेत भारतासह पॅलेस्टाइन, लेबनॉन आणि यजमान मलेशिया संघ सहभाग नोंदवतील. ‘फिफा’ क्रमवारीत पॅलेस्टाइन ९६व्या स्थानी आहे. भारत यानंतर ‘फिफा’ विश्वचषक पात्रता फेरीत खेळेल. १००व्या क्रमांकावर पोहोचल्याचा फायदा भारतीय संघाला होईल. पात्रता फेऱ्यांमध्ये सुरुवातीस तरी खडतर प्रतिस्पर्धी समोर येणार नाहीत.

गेल्या काही काळापासून प्रशिक्षक स्टिमॅच का चर्चेत आहेत? त्यांची भूमिका कितपत महत्त्वाची?

क्रोएशियाच्या इगोर स्टिमॅच यांनी भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळल्यापासून संघाची कामगिरी चांगली राहिली आहे. मात्र, आपल्या आक्रमक स्वभावामुळे स्टिमॅच गेल्या काही काळापासून चर्चेत आहेत. ‘सॅफ’ अजिंक्यपद स्पर्धेच्या अखेरच्या साखळी सामन्यात भारत व कुवेत यांच्यातील सामना १-१ असा बरोबरीत राहिला. सामन्यादरम्यान सामनाधिकाऱ्यांशी वाद घातल्याने स्टिमॅच यांना लाल कार्ड दाखवण्यात आले. त्यापूर्वी, पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सलामीच्या सामन्यातही त्यांना लाल कार्ड देण्यात आले होते. त्यामुळे स्टिमॅच यांना ‘सॅफ’च्या शिस्तपालन समितीने ५०० डॉलरचा दंड ठोठावला आणि त्यांच्यावर दोन सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली. त्यामुळे स्टिमॅच उपांत्य व अंतिम सामन्यासाठी संघासोबत नव्हते. असे असले तरी, स्टिमॅच हे भारतीय फुटबॉलसाठी निर्णायक ठरताना दिसत आहेत. १९९० ते २००२ दरम्यान स्टिमॅच यांनी क्रोएशियाकडून ५३ सामन्यांमध्ये भाग घेतला. १९९८ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत क्रोएशियाच्या संघातही स्टिमॅच यांचा समावेश होता. २०१९ मध्ये स्टीफन कॉन्स्टेन्टाइन पायउतार झाल्यानंतर स्टिमॅच यांना प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने २०२२ विश्वचषक पात्रता फेरीत कतारविरुद्धचा सामना बरोबरीत राखला होता. आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. स्टिमॅच यांच्या काळात भारत घरच्या मैदानावर १५ सामन्यांत अपराजित राहिला. २०२३मध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने तीन जेतेपदे मिळवली आहेत. भारतीय संघासोबत स्टिमॅच यांच्यावर २३ वर्षांखालील संघाची जबाबदारीही देण्यात आली आहे.

भारताची सर्वोत्तम ‘फिफा’ क्रमवारी कधी होती?

डिसेंबर १९९२ मध्ये पहिल्यांदा ‘फिफा’ क्रमवारीला सुरुवात झाली. तेव्हा भारताकडे आय. एम. विजयन, जो पॉल आंचेरी आणि ब्रूनो कुटिन्हो यांसारखे खेळाडू होते. भारताने १९९३ मध्ये चांगली कामगिरी केली आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. त्यामुळे वर्षाअखेरीस संघ पहिल्यांदा अव्वल १०० संघांत पोहोचला. १९९४ च्या ‘फिफा’ विश्वचषक पात्रता फेरीत भारताने हाँगकाँगवर विजय नोंदवला. यासह संघाने कॅमरून व फिनलंड यांसारख्या संघांना बरोबरीत रोखले. त्याचा फायदा भारताला क्रमवारीत झाला. यानंतर भारताला अधिक आंतरराष्ट्रीय सामने न मिळाल्याने संघाची क्रमवारी १२१वर पोहोचली. १९९५ मध्ये बायचुंग भुतिया आल्यानंतर भारतीय संघ भक्कम झाला. १९९६ मध्ये भुतिया व विजयन जोडीने भारताला आजवरच्या सर्वोत्तम ९४व्या स्थानी पोहोचवले. त्यानंतर २०१७ मध्ये भारत ९६व्या स्थानापर्यंत पोहोचला होता. सध्या भारत १००व्या स्थानी असून आगामी स्पर्धांत चांगली कामगिरी केल्यास संघाला त्याचा फायदा मिळू शकेल.

हेही वाचा : विश्लेषण: क्लब विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेतील संघांची संख्या का वाढवली? यजमानपद अमेरिकेकडे कसे?

भारताची मदार कोणत्या खेळाडूंवर?

भारतासाठी कर्णधार आणि अनुभवी आघाडीपटू सुनील छेत्री हा सर्वांत महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत १४२ सामन्यांत ९२ गोल केले आहेत. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या सक्रिय खेळाडूंमध्ये पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो व अर्जेंटिनाचा लिओनेल मेसी यांच्यानंतर छेत्री तिसऱ्या स्थानी आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘सॅफ’ अजिंक्यपद जेतेपद मिळवण्यात त्याने निर्णायक भूमिका पार पाडली होती. बचावपटू संदेश झिंगनही संघासाठी महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. बचाव फळीतील त्याचे योगदान महत्त्वाचे असते. तसेच युरोपमध्ये खेळण्याचा अनुभवही त्याच्या गाठीशी आहे. भारताचा गोलरक्षक गुरप्रीत सिंह संधूने ‘सॅफ’ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शूटआऊटमध्ये कुवेतच्या खेळाडूचा गोल रोखत संघाला जेतेपद मिळवून दिले होते. आक्रमकपटू लालिआनझुआला छांगटेनेही गेल्या काही काळात आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याने भारतासाठी खेळलेल्या २८ सामन्यांत सात गोल झळकावले आहेत. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या वतीने या वर्षीचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून त्याची निवड करण्यात आली.