– ज्ञानेश भुरे

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या ॲशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात जॉनी बेअरस्टोला बाद देण्याच्या पद्धतीने क्रिकेट विश्वाला चर्चेचा नवा मुद्दा मिळाला. इतकेच नाही, तर हा वाद थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. ऑस्ट्रेलियाची बेअरस्टोला बाद करण्याची पद्धत खिलाडू वृत्तीला धरून होती की नाही, यावर मतमतांतरे पाहायला मिळाली. त्यामुळेच ॲशेस मालिकेत या निर्णयाने वादाची वेगळी ठिणगी पडली असे म्हणता येऊ शकेल.

Gurpatwant Singh Pannu
खलिस्तानी अतिरेकी गुरपतवंतसिंग पन्नूच्या हत्येचा कट ‘RAW’ अधिकार्‍याने रचला, कोण आहेत विक्रम यादव?
Indira Gandhi 1971 fifth Lok Sabha polls Congress
काँग्रेसची शकलं, चिन्हासाठी धडपड; इंदिरा गांधींनी कशी मिळवली सत्ता?
singapore hong kong marathi news, mdh spices ban in singapore hong kong marathi news
सिंगापूर, हाँगकाँगमध्ये काही भारतीय मसाल्यांवर बंदी का? अमेरिकेचा आक्षेप काय? घातक कीटकनाशकांचे प्रमाण आढळले?
indian potholes self healing roads
रस्त्यांवरचे खड्डे आपोआप भरणार; काय आहे ‘सेल्फ हीलिंग’ तंत्रज्ञान?

जॉनी बेअरस्टोला का बाद ठरवण्यात आले?

दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३७१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव ३२७ धावांवर संपुष्टात आला. या डावात इंग्लंडला १७८ धावांची आवश्यकता असताना बेन स्टोक्सच्या साथीत खेळणाऱ्या बेअरस्टोने गोलंदाज कॅमेरुन ग्रीनचा एक उसळता चेंडू सोडला आणि चेंडू यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरीच्या हाती गेला. त्यानंतर षटक संपल्याचे वाटल्याने बेअरस्टो थेट आपली क्रीज सोडून दुसऱ्या बाजूला असलेल्या स्टोक्सशी संवाद साधण्यासाठी निघाला. मात्र, पंचांनी चेंडू ‘डेड’ झाल्याची खूण केली नव्हती. हे पाहून कॅरीने चेंडू यष्टीवर मारला आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी पंचांकडे दाद मागितली. मैदानावरील पंचांनी निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवला आणि पंच मरायस इरॅस्मस यांनी बेअरस्टोला बाद ठरवले. या निर्णयाने सगळेच चकित झाले.

बेअरस्टोला बाद देण्याचा निर्णय योग्य आणि कायदेशीर होता का?

क्रिकेटच्या नियम क्रमांक २०.१.२ नुसार बेअरस्टोला बाद ठरविण्याचा निर्णय योग्य होता. पंच जोपर्यंत चेंडू ‘डेड’ झाल्याचे जाहीर करत नाही, तोवर फलंदाजाने क्रीज सोडायची नसते. क्षेत्ररक्षण करणारे खेळाडू आणि खेळपट्टीवरील दोन्ही फलंदाज जोपर्यंत चेंडू आता खेळात नाही असे मानत नाहीत तोवर पंच चेंडू ‘डेड’ झाल्याची खूण करत नाहीत. या प्रसंगात चेंडू यष्टिरक्षक कॅरीच्या हातात जात असतानाच बेअरस्टोने क्रीज सोडल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे नियमानुसार बेअरस्टो बाद (यष्टिचीत) ठरतो. विशेष म्हणजे त्या वेळी गोलंदाजाच्या बाजूकडील दुसरा फलंदाज इंग्लंडचा कर्णधार स्टोक्स यानेही सामन्यानंतर बेअरस्टोची विकेट नियमात बसत असल्याचे मान्य केले.

हेही वाचा : विश्लेषण : विश्वचषकात नऊ ठिकाणी सामने खेळण्याचा भारतीय संघाला फटका? महत्त्वाचे सामने अहमदाबादेत का?

ऑस्ट्रेलियन खेळाडूंची कृती अखिलाडू प्रवृत्ती दाखवते का?

या प्रश्नाला अनेक कंगोरे आहेत. मुळातच ऑस्ट्रेलियन खेळाडू मैदानात नेहमीच आक्रमक असतात हे यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे. त्यातही अलीकडे खेळातील आत्मा निघून गेल्यासारखे चित्र आहे. युद्धात सर्व काही माफ असल्यासारखे विजयासाठी काहीही.. अशी वृत्ती बळावत आहे. असे प्रसंग यापूर्वी अनेकदा आणि अगदी अलिकडच्या काळातही घडले आहेत. पण, या प्रत्येक वेळेस प्रतिस्पर्धी संघाने खिलाडू वृत्तीचे दर्शन घडवले आहे.

यापूर्वीचे असे ठळक प्रसंग कुठले?

यात झटकन डोळ्यासमोर येणारा प्रसंग म्हणजे २०११ मधील इंग्लंड वि. भारत यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यातला. इंग्लंडच्या इयान बेलने अशीच चूक केली. चहापानापूर्वीच्या अखेरच्या चेंडूवर बेलने चेंडू फटकावल्यावर तीन धावा पळून काढल्या. तेव्हा चेंडू सीमापार गेल्याचे समजून बेल तिसरी धाव काढून क्रीजच्या बाहेरच थांबला. मात्र, भारताच्या प्रवीण कुमारने चेंडू अडवून थ्रो केला आणि अभिनव मुकुंदने बेलला धावबाद केले. भारतीय संघाने अपील केले आणि तिसऱ्या पंचांने बेलला धावबाद दिले. यानंतर दोन्ही संघ चहापानाला गेल्यावर भारतीय कर्णधार धोनीने खिलाडूवृत्ती दाखवून पंचांना अपील मागे घेतल्याचे सांगितले आणि इंग्लंडच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊनही हा निर्णय सांगून बेलला परत खेळण्याची संधी दिली होती. अगदी अलीकडच्या घटना म्हणजे जून २०२२ मध्ये लॉर्ड्स मैदानावरच इंग्लंडच्या ऑली पोपने न्यूझीलंडच्या कॉलिन डीग्रॅण्डहोमला अशाच पद्धतीने बाद केले होते. त्याच वेळी सध्या सुरू असलेल्या विश्वचषक पात्रता स्पर्धेत आयर्लंडच्या अँडी बालबर्नीने मोहम्मद वसिमला बाद केले होते. पण, ही दोन्ही अपील नंतर प्रतिस्पर्धी संघाने मागे घेतली.

या निर्णयाने प्रेक्षकांमध्ये काय प्रतिक्रिया उमटली?

सभ्य गृहस्थांचा खेळ अशी क्रिकेटची जुनी ओळख. इंग्लंडमध्ये अजूनही ही ओळख टिकून आहे. विशेष म्हणजे लॉर्ड्स मैदानावरील प्रेक्षकांची शिस्त काही वेगळीच असते. खेळ आणि खेळाडूंचा नेहमीच त्यांच्याकडून आदर केला जातो. पण, या वेळी हा निर्णय या सभ्यतेलाही सहन झाला नाही. स्टोक्सच्या बरोबरीने बेअरस्टोच्या खेळीत इंग्लंडला पराभवातून बाहेर काढण्याची क्षमता असल्याची खात्री या प्रेक्षकांना होती. पण, त्याला बाद दिल्यावर हे प्रेक्षक चिडले. ऑस्ट्रेलियन खेळाडू उपाहारासाठी ड्रेसिंगरुममध्ये परत असताना, येथील प्रतिष्ठेच्या लाँगरुमधील क्लब सदस्यांनीच ऑस्ट्रेलियन खेळाडूंविषयी अपशब्द वापरले. त्यांच्यात शाब्दिक युद्ध झाले आणि वाद चौकशीपर्यंत गेला.

हेही वाचा : विश्लेषण : वेस्ट इंडिजवर एकदिवसीय विश्वचषकाला मुकण्याची नामुष्की का ओढवली? दोन वेळचे विश्वविजेते अपयशाच्या गर्तेत कसे अडकले?

बेअरस्टोची विकेट ॲशेस मालिकेतील नवा वाद ठरणार का?

सध्याच्या परिस्थितीत तरी असेच चित्र दिसून येत आहे. प्रेक्षकांपर्यंत हा वाद पोहोचला आहे. अर्थात, लॉर्ड्सवरील मेरिलिबोन क्रिकेट क्लबने आपली सभ्यता सोडली नाही. त्यांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंची माफी मागितली आणि पुढे जाऊन संबंधित सदस्यांचे निलंबनही केले. आता त्यांना कधीच लाँगरुममध्ये स्थान मिळणार नाही. त्यामुळे भविष्यातील सामन्यांत आता प्रेक्षकांकडून ऑस्ट्रेलियन खेळाडूंची हुर्यो उडवली जाईल. मैदानावर इंग्लंडचे खेळाडूही अधिक पेटून उठतील आणि नव्या जोमाने ऑस्टेलियाला प्रत्युत्तर देतील. त्यामुळे या ठिणगीने ॲशेस मालिकेतील संघर्ष पेटवला असेच म्हणता येईल.