– अन्वय सावंत

अपयशाच्या गर्तेत अडकलेल्या वेस्ट इंडिज क्रिकेट संघावर एकदिवसीय विश्वचषकाला मुकण्याची नामुष्की ओढवली आहे. झिम्बाम्वे येथे सुरू असलेल्या विश्वचषकाच्या पात्रता स्पर्धेत विंडीजला शनिवारी स्कॉटलंडकडून लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे प्रथमच विंडीजच्या संघाविना एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा होणार हे स्पष्ट झाले आहे. विंडीजच्या संघाने १९७५ आणि १९७९ मध्ये पहिल्या दोन विश्वचषकांचे जेतेपद मिळवले होते. १९८३मध्ये हा संघ उपविजेता होता. मात्र, दशकागणिक या संघाची कामगिरी खालावत गेली. असे का घडले आणि विंडीज क्रिकेट इतके तळाला का गेले, याचा आढावा.

Suryakumar Yadav likely to get captaincy till 2026 World Cup sport news
सूर्यकुमारकडे ट्वेन्टी-२० संघाचे नेतृत्व? २०२६ विश्वचषक स्पर्धेपर्यंत कर्णधारपद मिळण्याची शक्यता
novak djokovic into wimbledon semifinals without playing qf
नोव्हाक जोकोविच न खेळताच उपांत्य फेरीत
Rahul Dravid said Rohit Sharma stopped him from resigning after the ODI World Cup sport news
एकदिवसीय विश्वचषकानंतर रोहितने पद सोडण्यापासून रोखले – द्रविड
Why Rohit Sharma Retired from T20I
Rohit Sharma : “मला T20I क्रिकेटमधून निवृत्ती घ्यायची नव्हती पण…”, हिटमॅनचा VIDEO होतोय व्हायरल
best moment of my career says rohit sharma after winning t20 world cup
माझ्या कारकीर्दीतील सर्वोत्तम क्षण! ट्वेन्टी२० विश्वविजयानंतर कर्णधार रोहितची भावना
IND vs SA, T20 World Cup Finals Update
“रोहित शर्मा बार्बाडोसच्या समुद्रात उडीच मारेल”, माजी कर्णधाराचं IND vs SA मॅचआधी मोठं विधान; म्हणाला, “सात महिन्यांत..”
Rohit Sharma's Flying Kiss Video Viral After India's Defeat of England
IND vs ENG : आधी संघाला विजयी केले, मग जिंकले रितिकाचे मन, मैदानावर दिसले रोहित शर्माचे नवे रुप, पाहा VIDEO
Rashid Khan Emotional Post SA vs AFG
५६ धावांसह अफगाणिस्तान विश्वचषकातून बाहेर! भावूक होत कर्णधार रशीद खान म्हणाला, “चांगली कामगिरी करता आली असती..”

विंडीज संघाने गेल्या काही काळात कशी कामगिरी केली आहे?

दोन वेळा विजेत्या विंडीज संघाला गेल्या वर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या मुख्य फेरीत (अव्वल १२ संघ) स्थान मिळवण्यात अपयश आले होते. त्यापूर्वी २०१७च्या चॅम्पियन्स करंडकालाही हा संघ मुकला होता. त्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्येही कामगिरीत सातत्य राखता न आल्याने विंडीजचा संघ जागतिक क्रमवारीतील अव्वल आठ संघांतून बाहेर गेला. त्यामुळे त्यांना भारतात होणाऱ्या आगामी एकदिवसीय विश्वचषकाच्या पात्रता स्पर्धेत खेळावे लागले.

पात्रता स्पर्धेत विंडीजला कोणत्या संघांकडून पराभव पत्करावा लागला?

झिम्बाब्वे येथे सुरू असलेल्या विश्वचषकाच्या पात्रता स्पर्धेतील एकूण १० संघांपैकी केवळ दोन संघ विश्वचषकासाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे प्रत्येकच सामना महत्त्वाचा आहे. या स्पर्धेसाठी संघांना दोन गटांत विभागण्यात आले. अ-गटात समाविष्ट विंडीज संघाने साखळी फेरीत नेपाळ आणि अमेरिकेला नमवले. मात्र, त्यांना झिम्बाब्वे आणि नेदरलँड्सकडून पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेसाठीच्या नियमांनुसार, प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ ‘सुपर सिक्स’ फेरीसाठी पात्र ठरले. मात्र, या फेरीसाठी साखळी फेरीतील गुणही विचारात घेतले गेले. अ-गटातून विंडीज, झिम्बाब्वे आणि नेदरलँड्सने आगेकूच केली. मात्र, साखळी फेरीत विंडीजने अन्य दोन संघांविरुद्धचे सामने गमावल्याने ‘सुपर सिक्स’ फेरीत दाखल होताना त्यांच्या खात्यावर एकही गुण नव्हता. त्यामुळे त्यांना ब-गटातून आगेकूच केलेल्या तीनही संघांविरुद्ध सामने जिंकावे लागणार होते. मात्र, ‘सुपर सिक्स’च्या पहिल्याच सामन्यात स्कॉटलंडने विंडीजला सात गडी आणि ३९ चेंडू राखून नमवले. त्यामुळे ७०-८०च्या दशकात जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजवलेला विंडीज संघ प्रथमच एकदिवसीय विश्वचषकात खेळू शकणार नाही हे स्पष्ट झाले.

कोणत्या विभागात सर्वांत निराशाजनक कामगिरी?

विंडीजने पात्रता स्पर्धेत खेळताना फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही विभागांत निराशा केली. मात्र, सर्वाधिक चुका त्यांनी क्षेत्ररक्षणात केल्या आणि याचा त्यांना चांगलाच फटका बसला. विंडीजने साखळी फेरीतील चार सामन्यांत तब्बल १० झेल सोडले. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात विंडीजने पाच झेल सोडले. विंडीजच्या क्षेत्ररक्षकांनी झिम्बाब्वेचा प्रमुख फलंदाज सिकंदर रझाला १ आणि ३ धावांवर जीवदान दिले. याचा फायदा घेताना रझाने ६८ धावांची खेळी करताना रायन बर्लसह ८७ धावांची भागीदारी रचत झिम्बाब्वेला विजय मिळवून दिला. बर्लचाही एक झेल सोडण्यात आला होता.

अनुभवी खेळाडूंच्या अपयशाचा फटका बसला का?

विंडीजच्या संघातील सर्वांत अनुभवी खेळाडू जेसन होल्डरने नेदरलँड्सविरुद्ध निराशा केली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ३७४ धावा करूनही विंडीजला हार पत्करावी लागली. आधी नेदरलँड्सला ३७४ धावा करून दिल्याने सामन्याचा निकाल ‘सुपर ओव्हर’मध्ये लावला गेला. यात होल्डरच्या गोलंदाजीवर लोगन वॅन बीकने तब्बल ३० धावा फटकावल्या. याचा पाठलाग करताना विंडीजला ८ धावाच करता आल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला. या वर्षाच्या सुरुवातीला शे होपची एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी, तर रोव्हमन पॉवेलची उपकर्णधारपदी निवड झाली होती. होप एकदिवसीय क्रिकेटमध्ये विंडीजचा सर्वोत्तम फलंदाज मानला जातो. मात्र, कर्णधार झाल्यापासून फलंदाजीत त्याला फारसे योगदान देता आलेले नाही. तसेच त्याने स्वतःच्या फलंदाजी क्रमातही सतत बदल केला आहे. याचा विंडीजला नक्कीच फटका बसला आहे. तसेच अखेरच्या षटकांत हाणामारीची जबाबदारी असलेला पॉवेलही सपशेल अपयशी ठरला. पात्रता स्पर्धेत त्याला केवळ एकदा दुहेरी धावसंख्या गाठता आली. त्यामुळे चौथ्या साखळी सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध त्याला संघातून वगळण्यात आले.

पात्रता स्पर्धेपूर्वी पुरेशी तयारी केलेली का?

विश्वचषक पात्रता स्पर्धेपूर्वी माजी कर्णधार डेरेन सॅमीची विंडीजच्या एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली. त्यानंतर या स्पर्धेच्या तयारीसाठी विंडीजचा संघ संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध खेळला. मात्र, पात्रता स्पर्धेसाठी निवड झालेले १५ पैकी ६ खेळाडू अमिरातीविरुद्ध खेळले नाहीत. काएल मेयर्स, होल्डर, पॉवेल, अल्झारी जोसेफ, रोमारियो शेफर्ड आणि अकील हुसेन यांना आयपीएलमध्ये खेळल्याने काही काळ विश्रांती देण्यात आली. त्यामुळे विंडीज संघाच्या तयारीत नक्कीच अडथळा आला. नवनियुक्त प्रशिक्षक सॅमी संघाची मोट बांधण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही.

हेही वाचा : विश्लेषण : विश्वचषकात नऊ ठिकाणी सामने खेळण्याचा भारतीय संघाला फटका? महत्त्वाचे सामने अहमदाबादेत का?

विंडीज क्रिकेट इतके तळाला कसे गेले?

अंतर्गत राजकारण, क्रिकेट मंडळ आणि खेळाडूंमधील वाद, अपुरे मानधन आणि त्यामुळे खेळाडूंची देशासाठी खेळण्यापेक्षा विविध ट्वेन्टी-२० लीगमध्ये खेळण्यास पसंती. या आणि अशा अन्य काही कारणांमुळे वेस्ट इंडिज क्रिकेट मागे पडत चालले आहे. पोलार्ड आणि गेल यांसारख्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली, पण ते ट्वेन्टी-२० लीगमध्ये अजूनही खेळत आहेत. तसेच शिमरॉन हेटमायर, आंद्रे रसेल आणि सुनील नरेन यांसारखे खेळाडू राष्ट्रीय संघाकडून खेळण्यास सहजासहजी तयार होत नाहीत. विंडीजमधील देशांतर्गत क्रिकेटचा दर्जाही फारसा चांगला नाही. त्यामुळे पूर्वी एकामागोमाग एक दिग्गज खेळाडू तयार करणाऱ्या विंडीजला आता लवकर नवे खेळाडूही मिळत नाहीत. संघातील स्थानांसाठी फारशी स्पर्धा नसल्याने आधीपासून संघात असलेल्या खेळाडूंवर प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी दडपण नसते. या सर्व गोष्टींमुळेच वेस्ट इंडिज क्रिकेट इतके तळाला गेले आहे. विंडीज क्रिकेट मंडळाने या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. अन्यथा वेस्ट इंडिजमधील क्रिकेटचे भविष्य धोक्यात येण्याची भीती आहे.