– अन्वय सावंत

भारतात होणाऱ्या आगामी एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आले आणि सर्वांचे लक्ष असलेल्या भारत-पाकिस्तान लढतीच्या आयोजनाचा मान अहमदाबादला मिळाला आहे. अहमदाबाद येथील १ लाख ३२ हजार आसनसंख्या असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर १५ ऑक्टोबरला पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील हा बहुप्रतीक्षित सामना खेळवला जाणार आहे. या स्पर्धेला ५ ऑक्टोबरला इंग्लंड-न्यूझीलंड लढतीने सुरुवात होणार असून भारताचा सलामीचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ ऑक्टोबरला चेन्नईत रंगणार आहे. भारताचे नऊ साखळी सामने नऊ विविध मैदानांवर खेळवले जाणार आहेत. याचा भारतीय संघाला फटका बसणार का, तसेच अहमदाबादलाच महत्त्वाच्या सामन्यांच्या आयोजनाची संधी का मिळाली आहे, याचा आढावा.

Shubman Gill Angry At Third Umpire's Decision
RR vs GT : तिसऱ्या पंचांच्या ‘त्या’ निर्णयानंतर शुबमन गिल मैदानावरील पंचांवर संतापला, VIDEO होतोय व्हायरल
Gautam Gambhir Praises MS Dhoni
IPL 2024 CSK vs KKR : चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वी गंभीरचं मोठं वक्तव्य; म्हणाला, “धोनी हा एक कुशल…”
Virat Creates History at Chinnaswamy Stadium
RCB vs LSG : विराटने चिन्नास्वामी स्टेडियमवर रचला इतिहास! अनोखं शतक झळकावणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
BCCI calls meeting of IPL team owners
IPL 2024 : स्पर्धेदरम्यान बीसीसीआयने अचानक बोलावली संघ मालकांची बैठक, महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता

भारतीय संघ कोणत्या मैदानांवर सामने खेळणार?

एकदिवसीय विश्वचषकातील साखळी सामने १० केंद्रांवर खेळवले जाणार आहेत. यात मुंबई, पुणे, अहमदाबाद, बंगळूरु, चेन्नई, दिल्ली, धरमशाला, हैदराबाद, कोलकाता आणि लखनऊ यांचा समावेश आहे. यापैकी हैदराबाद वगळता भारतीय संघ सर्वच मैदानांवर एकेक साखळी सामना खेळणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला ३४ दिवसांमध्ये तब्बल ८,४०० किलोमीटर प्रवास करावा लागणार आहे. या शिवाय भारताला अंतिम फेरी गाठण्यात यश आल्यास हे अंतर जवळपास ९,७०० किमी इतके होईल. इतक्या प्रवासाचा भारतीय संघाला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भारताचे सामने कधी आणि कोणत्या संघाविरुद्ध होणार आहेत?

भारताचे सामने अनुक्रमे ८ ऑक्टोबर (वि. ऑस्ट्रेलिया, चेन्नई), ११ ऑक्टोबर (वि. अफगाणिस्तान, दिल्ली), १५ ऑक्टोबर (वि. पाकिस्तान, अहमदाबाद), १९ ऑक्टोबर (वि. बांगलादेश, पुणे), २२ ऑक्टोबर (वि. न्यूझीलंड, धरमशाला), २९ ऑक्टोबर (वि. इंग्लंड, लखनऊ), २ नोव्हेंबर (वि. पात्रता फेरीतील संघ-२, मुंबई), ५ नोव्हेंबर (वि. दक्षिण आफ्रिका, कोलकाता), ११ नोव्हेंबर (वि. पात्रता फेरीतील संघ-१, बंगळूरु) या दिवशी होणार आहेत.

नऊ ठिकाणी सामने खेळणे किती आव्हानात्मक?

नऊ विविध मैदानांवर सामने खेळावे लागणार असल्याने भारतीय संघाला विविध खेळपट्ट्यांना समोरे जावे लागेल. तसेच वातावरणातही थोड्याफार प्रमाणात बदल असेल. मुंबई येथे लाल मातीने तयार करण्यात येणाऱ्या खेळपट्टीकडून वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल. तर अहमदाबाद येथील सपाट खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल असेल. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामन्यात मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकेल. इंग्लंडविरुद्ध लखनऊ येथे होणाऱ्या सामन्यासाठीची खेळपट्टी फिरकीपटूंना साहाय्य करण्याची शक्यता आहे. ‘आयपीएल’मध्ये लखनऊ येथे झालेल्या सामन्यांत मोठी धावसंख्या उभारणे संघांना अवघड गेले होते. त्यामुळे भारताला या विविध खेळपट्ट्यांशी जुळवून घेण्याचे आव्हान असेल.

वेळापत्रक जाहीर करण्यासाठी इतका उशीर का?

विश्वचषकासारख्या स्पर्धांचे वेळापत्रक सहा महिने ते अगदी वर्षभरापूर्वीच जाहीर केले जाते. त्यामुळे परदेशातून येणाऱ्या चाहत्यांना हॉटेल, विमान आदीची तिकिटे आधीच बुक करून ठेवण्याची संधी मिळते. २०१९चा एकदिवसीय विश्वचषक इंग्लंडमध्ये झाला होता. ३० मे २०१९ रोजी सुरू झालेल्या या विश्वचषकाचे वेळापत्रक एप्रिल २०१८मध्येच जाहीर करण्यात आले होते. यंदा मात्र पाकिस्तानच्या विश्वचषकातील सहभागाबाबत अनिश्चिता, तसेच त्यांच्याकडून सामन्यांच्या ठिकाणांबाबत घालण्यात येणाऱ्या अटी यांमुळे स्पर्धेचे वेळापत्रक केवळ १०० दिवस आधी जाहीर करण्यात आले. त्यामुळे स्टेडियममधील सुविधांमध्ये सुधारणा आणि अन्य नूतनीकरणाच्या कामासाठी राज्य क्रिकेट संघटनांना फारसा वेळ मिळणार नाही. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी महत्त्वाचे सामने होणार आहेत, तेथील हॉटेल्सचे भावही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहू इच्छिणाऱ्या चाहत्यांना करावा लागणारा खर्च वाढणार आहे.

महत्त्वाचे सामने अहमदाबादला देण्यामागे काय कारण?

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषकाचा सलामीचा (५ ऑक्टोबर) आणि अंतिम सामना (१९ नोव्हेंबर), यासह भारत-पाकिस्तान सामना (१५ ऑक्टोबर) होणार आहे. त्याचप्रमाणे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढतही (४ नोव्हेंबर) या मैदानावर खेळवली जाईल. मात्र, सर्व महत्त्वाचे सामने अहमदाबादला मिळण्याचे कारण काय? पहिले कारण म्हणजे हे जगातील सर्वांत मोठे क्रिकेट स्टेडियम असून याची आसनसंख्या १ लाख ३२ हजार इतकी आहे. त्याचप्रमाणे जय शहा यांची २०१९ मध्ये ‘बीसीसीआय’च्या सचिवपदी निवड झाल्यापासून अहमदाबाद हे भारतीय क्रिकेटचे केंद्रस्थान बनले आहे. गेल्या ‘आयपीएल’चा सलामीचा आणि अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवरच खेळवले गेले होते. तसेच या वर्षी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामनाही या मैदानावर झाला. त्यामुळे अहमदाबादमध्ये भारताविरुद्धचा सामना खेळण्यास पाकिस्तानने विरोध दर्शवल्यानंतरही ‘आयसीसी’ आणि ‘बीसीसीआय’ने याच मैदानावर या विश्वचषकातील सर्वांत महत्त्वाच्या सामन्याचे आयोजन करण्याचे ठरवले.

‘पीसीबी’च्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले का?

भारताविरुद्धचा सामना अहमदाबादऐवजी चेन्नई, बंगळूरु किंवा कोलकाता येथे खेळवण्याची पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) मागणी केली होती. तसेच अफगाणिस्तानविरुद्धचा सामना फिरकीला अनुकूल चेन्नईत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना बंगळूरु येथे न खेळवता अन्यत्र खेळवण्याचीही ‘पीसीबी’ची मागणी होती. मात्र, या मागण्यांकडे ‘आयसीसी’ आणि ‘बीसीसीआय’ने दुर्लक्ष केले. परंतु, पाकिस्तानचे सामने अहमदाबाद, बंगळूरु, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबाद या पाच केंद्रांवरच होणार आहेत.

कोणत्या केंद्रांना सर्वाधिक सामने आणि कोणत्या प्रमुख केंद्रांना डच्चू?

मुंबईतील वानखेडे स्टेडियम आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमला प्रत्येकी पाच सामन्यांच्या आयोजनाची संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे अहमदाबाद, धरमशाला, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, बंगळूरु आणि कोलकाता या केंद्रांनाही प्रत्येकी पाच, तर हैदराबादला तीन सामने मिळाले आहेत. या व्यतिरिक्त गुवाहाटी आणि थिरुवनंतपुरम येथे सराव सामने होणार आहेत. परंतु नागपूर, मोहाली, रांची यांसारख्या प्रमुख केंद्रांना एकही सामना मिळालेला नाही.

हेही वाचा : विश्लेषण : विराटनंतर रोहितही ‘आयसीसी’ जेतेपदांपासून दूर! भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीमागे कारणे काय? 

यंदाच्या विश्वचषकाचे भारतासाठी महत्त्व काय?

भारत एकूण चौथ्यांदा विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार असला, तरी संपूर्ण स्पर्धा भारतात होण्याची ही पहिलीच वेळ असेल. १९८७ मध्ये भारत आणि पाकिस्तान विश्वचषकाचे संयुक्त यजमान होते. १९९६ मध्ये भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका यांनी विश्वचषकाचे संयुक्त यजमानपद भूषवले होते. २०११ मध्ये भारत, श्रीलंका आणि बांगलादेश विश्वचषकाचे यजमान होते. तसेच भारतीय क्रिकेटला कलाटणी देणारी घटना, १९८३च्या विश्वचषक विजयाला यंदा ४० वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर, विश्वचषकाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.