भक्ती बिसुरे
कॅप्टन अभिलाषा बराक या तरुणीची भारतीय लष्कराच्या हवाई सेवेत लढाऊ वैमानिक म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली. लष्करी हवाई सेवेत लढाऊ वैमानिक म्हणून दाखल होणारी अभिलाषा ही पहिली भारतीय महिला ठरली आहे. त्यानिमित्ताने अभिलाषा आणि लष्करी हवाई सेवा या दोन्हींबाबत माहिती देणारे हे विश्लेषण.

कोण आहे कॅप्टन अभिलाषा बराक?

Goldy Brar
अमेरिकेतील गोळीबारात गोल्डी ब्रारचा मृत्यू? पोलीस म्हणाले, “मारला गेलेला व्यक्ती…”
Ban on use of drones due to Prime Minister visit to Pune print news
पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यामुळे ड्रोन वापरण्यास बंदी
Attack on Israel by terrorist groups
इराणच्या नेतृत्वात हिजबुल्ला, हुथी अन् पॅलेस्टिनी दहशतवादी गट एकत्र; इस्रायल हल्ले कसे रोखणार?
Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?

अभिलाषा बराक ही २६ वर्षीय तरुणी आता भारतीय लष्कराच्या हवाई सेवेतील पहिली लढाऊ वैमानिक ठरली आहे. २०१८ मध्ये अभिलाषाने चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमधून आपले प्रशिक्षण पूर्ण केले. लष्करी हवाई सेवेसाठी तिची निवड करण्यात आली. त्यावेळी केवळ ग्राऊंड ड्युटीसाठीच महिलांची निवड होते हे माहिती असतानाही अभिलाषाने आपल्या अर्जामध्ये हवाई उड्डाण अभ्यासक्रमाचा पर्याय निवडत आपला पसंतीक्रम नमूद केला. त्याचाच परिणाम म्हणून आज भारताच्या लष्करी हवाई सेवेतील पहिली लढाऊ वैमानिक होण्याचा मान अभिलाषाने पटकावला आहे. हरियाणातील रोहतकमध्ये तिने आपले बालपण व्यतीत केले. तिचे वडील भारतीय लष्करातून निवृत्त झाले आहेत. भाऊ लष्करी सेवेत कार्यरत आहे. अभिलाषाने इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन या विषयात बी. टेक. ही पदवी प्राप्त केली. २०१८ मध्ये तिने चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीत प्रवेश घेतला. गांधीनगरमध्ये नुकत्याच झालेल्या पदवीदान सोहळ्यात अभिलाषा बराक यांना पदवी प्रदान करण्यात आली. यापुढे नाशिक येथे आर्मी एव्हिएशन हेलिकॉप्टरची लढाऊ वैमानिक म्हणून दाखल होणार आहे.

लष्करी हवाई सेवा म्हणजे काय?

लष्करी हवाईसेवा हा भारतीय लष्कराचा एक प्रमुख विभाग आहे. १९८६ मध्ये या विभागाची स्थापना करण्यात आली. आर्मी एव्हिएशन कोअरचे वैमानिक हे प्रामुख्याने तोफखाना विभागासह तिन्ही सैन्यदलांमधून तयार केले जातात. लष्कराच्या प्रत्यक्ष  नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या हवाई विभागातर्फे एमआयएल – २४, एमआय ३५ आणि एचएएल रुद्र यासारख्या हेलिकॉप्टर्सचा वापर केला जातो. चेतक, चित्ता आणि ध्रुव सारख्या  हेलिकॉप्टर्सच्या माध्यमातून दुर्गम भागात तैनात असलेल्या भारतीय सैन्याला रसद पुरवली जाते. लष्करी हवाईसेवेमार्फत युद्धजन्य परिस्थितीत तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात कॉम्बॅट सर्च, मदत कार्य, तोफखान्याची वाहतूक, लढाऊ वाहतूक, रसदची ने-आण तसेच युद्धकैद्यांची ने-आण याबरोबरच सीमाभागातील रुग्णांना तातडीच्या उपचारांसाठी (मेडिकल इव्हॅक्युएशन) महत्त्वाची भूमिका पार पाडतात. सध्या लेफ्टनंट जनरल ए. के. सुरी हे आर्मी एव्हिएशन कोअरचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. लष्करी हवाईसेवेत दाखल होण्यासाठी नाशिक येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल येथे उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण अधिकाधिक परिणामकारक आणि सुरक्षित तसेच परवडणारे व्हावे यासाठी कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल येथे चित्ता हेलिकॉप्टर सिम्युलेटर उभारण्यात आले आहेत. त्याच्या मदतीने सर्व प्रकारच्या भूप्रदेशांवर, सर्व प्रकारच्या हवामानामध्ये आणि दिवसा- रात्री तसेच युद्धकाळात आणि नैसर्गिक आपत्ती काळातील उड्डाणाचे प्रशिक्षण दिले जाते.

लष्करी हवाई सेवेचे योगदान काय आहे?

स्थापनेनंतर त्वरित आर्मी एव्हिएशन कोअरचा वापर श्रीलंकेतील ऑपरेशन पवनमध्ये करण्यात आला होता. कारगिलमधील ऑपरेशन विजयमध्ये आर्मी एव्हिएशन कोअरने बजावलेल्या कामगिरीसाठी दोन स्क्वॉड्रन्सला चीफ ऑफ आर्मी स्टाफ सायटेशन्स, दोन वीरचक्र आणि इतर शौर्य पुरस्कारांनी गौरवण्यात आले. भारतीय सैन्य तैनात असलेल्या सर्वात उंच आणि आव्हानात्मक सियाचिन हिमनदीच्या प्रदेशात लष्करी हवाईसेवेचे योगदान अनन्यसाधारण आहे. तेथील सैन्यदलांच्या कार्यात चित्ता हेलिकॉप्टर्सचे योगदान मोलाचे आहे. तेथील सैन्यदलांसाठी रसद पुरवणे, वैद्यकीय मदत पुरवणे आणि जवान आणि अधिकाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी लष्करी हवाई सेवा अव्याहत कार्यरत असते. जम्मू काश्मीर आणि ईशान्य भारतात दहशतवादविरोधी कारवायांमध्ये आर्मी एव्हिएशन कोअरचे योगदान मोठे आहे. नैसर्गिक आपत्तींसारख्या आव्हानात्मक काळात नागरिकांचे स्थलांतर, मदत आणि बचाव कार्यात हा विभाग युद्धपातळीवर काम करतो.

bhakti.bisure@expressindia.com