सिद्धार्थ खांडेकर
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील २० जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-इ-इन्साफ (पीटीआय) या पक्षाने १५ जागा जिंकून सत्तारूढ पाकिस्तान मुस्लीम लीग – नवाझ (पीएमएल-एन) पक्षाला मोठा हादरा दिला. पंजाब हे पाकिस्तानातील सर्वात मोठे आणि राजकीयदृष्टय़ा प्रभावशाली राज्य. त्यामुळे या पोटनिवडणुकीचे पडसाद राष्ट्रीय राजकारणावर उमटणार हे निश्चित. शिवाय या पराभवामुळे पंजाब प्रांतिक कायदेमंडळात (प्रोव्हिन्शियल असेम्ब्ली) पीएमएल-एन पक्ष अल्पमतात आला असून, पीटीआयला सत्तास्थापनेची संधी प्राप्त होणार आहे. 

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

पोटनिवडणुकीचा निकाल काय लागला?

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील २० जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा अधिकृत निकाल जाहीर झालेला नसला, तरी विविध मतदानोत्तर चाचण्यांचे इम्रान यांच्या पक्षाला किमान १५ जागांवर विजय मिळणार, याविषयी एकमत आहे. पीएमएल-एन पक्षाला केवळ चारच जागा जिंकता आल्या, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला. या निकालामुळे पंजाब कायदेमंडळात पक्षीय बलाबल बदलले आहे. पीटीआय आणि त्यांचा सहकारी पक्ष असलेल्या ‘पाकिस्तान मुस्लीम लीग- कुरेशी गट (पीएमएल- क्यू)’ पक्षाकडे मिळून १८८ (१७८ +  १०) जागा आहेत. तर पीएमएल-एन आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) यांच्या आघाडीकडे १७४ (१६७ + ७) जागा आहेत. ३७१ सदस्यीय प्रांतिक मंडळात दोन जागा रिक्त आहेत. त्यामुळे ३६९ सदस्यांच्या  सभागृहात सत्तारूढ आघाडीच अल्पमतात आली असून, पीटीआय-पीएमएल-क्यू बहुमतात आली आहे. येत्या २२ तारखेला पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी निवडणूक होत असून, ती विद्यमान प्रांतिक मंडळ सदस्यांतून होते. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांचे पुत्र हमझा शाहबाझ हे पंजाबचे मुख्यमंत्री असून, अल्पमतात गेल्यामुळे त्यांचे पद डळमळीत झाले आहे. 

पोटनिवडणूक का घ्यावी लागली?

इम्रान खान यांच्या विरोधात मार्च महिन्यात नॅशनल असेम्ब्लीत विरोधी पक्षीयांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला, तसाच तो पंजाब प्रोव्हिन्शियल असेम्ब्लीतही दाखल करण्यात आला. पंजाबचे त्या वेळचे पीटीआय पक्षाचे  मुख्यमंत्री उस्मान बझदर यांच्या विरोधात तो आणण्यात आला. त्या वेळी झालेल्या मतदानावेळी पीटीआयच्या २५ सदस्यांनी पक्षादेश झुगारून प्रस्तावाच्या बाजूने (म्हणजे सरकारविरोधात) मतदान केले. या सगळय़ांचे सदस्यत्व रद्द करावे अशी याचिका पीटीआयच्या वतीने न्यायालयात दाखल करण्यात आली. कायदेविषयक चर्चाची अनेक आवर्तने झाल्यानंतर २५ पैकी ५ सदस्य अल्पसंख्याक आणि महिलांसाठी राखीव असलेल्या जागांवर नामनिर्देशित केले गेले. उर्वरित २० जणांचे सदस्यत्व मात्र पाकिस्तानी निवडणूक आयोगाने रद्द ठरवल्यामुळे या जागांवर पोटनिवडणूक घ्यावी लागली. लाहोर उच्च न्यायालय आणि पाकिस्तानचे सर्वोच्च न्यायालय यांनीही यासंदर्भात वेळोवेळी महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली होती.

पंजाबचे मुख्यमंत्री हमझा शाहबाझ राजीनामा देणार का?

लाहोर उच्च न्यायालयाने, मूळ ठरावाच्या बाजूने पीटीआयच्या २५ सदस्यांनी पंजाबच्या प्रांतिक मंडळात केलेले मतदान रद्द ठरवले. त्याच वेळी हमझा यांच्या आघाडीचे बहुमत संपुष्टात आले होते. त्यामुळे हमझा यांना पुन्हा निवडणुकीस सामोरे जावे लागेल, असेही लाहोर उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. या दुसऱ्या वेळी विरोधी आघाडीला बहुमताचीही गरज नाही. केवळ हमझा यांच्या विरोधातील उमेदवाराला त्यांच्यापेक्षा अधिक मते मिळाली, तरीही पुरेसे ठरणार आहे. पोटनिवडणुकांनंतर पीटीआय आघाडीचे संख्याबळ बहुमताचा आकडा ओलांडून गेले आहे. त्यामुळे येत्या २२ जुलै रोजी होणाऱ्या मुख्यमंत्रीपदाच्या निवडणुकीत हमझा यांचा पराभव निश्चित आहे.

सत्तारूढ पक्षाच्या पराभवाची कारणे काय?

इम्रान खान हेच त्यांच्या पराभवाचे प्रमुख कारण मानावे लागेल. केंद्रातील सत्ता गेल्यानंतरही इम्रान हताश झाले नाहीत वा स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी मतदारांशी गाठीभेटी घेणे सुरूच ठेवले. पंजाब प्रांतात आपल्या काही पक्ष सदस्यांनी पक्षाशी दगाफटका करून गद्दारी केली, अशी भावना मतदारांमध्ये रुजवण्यात ते यशस्वी ठरले. त्यामुळे मतदारांची सहानुभूती त्यांना मोठय़ा प्रमाणात मिळाली. याशिवाय शाहबाझ शरीफ सरकारची काही धोरणे मतदारांना नाराज करणारी ठरल्याचे विश्लेषक सांगतात. पाकिस्तानात चलनवाढ २० टक्क्यांवर गेली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेताना काही अटीशर्ती पाळाव्या लागल्यामुळे सरकारला खर्चकपात करावी लागली. याविषयी जनतेचा रोष सरकारला ओढवून घ्यावा लागला. इम्रान यांना सत्ताभ्रष्ट केल्यानंतर आर्थिक आघाडीवर काही सुधारणा होतील अशा अपेक्षा जनतेकडून व्यक्त झाल्या होत्या. त्यांची पूर्तता झाली नाही आणि भाववाढ, बेरोजगारी या समस्या अधिक उग्र बनल्या, असे सांगितले जाते.

एका पोटनिवडणुकीला इतके महत्त्व का?

या निकालातून काही बाबी स्पष्ट होतात. इम्रान खान यांचा प्रभाव अजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. इम्रान यांच्या विरोधात सध्या पाकिस्तानचे दोन जुने राष्ट्रीय पक्ष एकवटले आहेत – पीएमएल-एन आणि पीपीपी. या दोघांच्या एकत्रित ताकदीशी टक्कर घेण्याची क्षमता इम्रान खान यांनी दाखवून दिली हे २०२३मधील सार्वत्रिक निवडुणकांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. पंजाबच्या बालेकिल्ल्यात पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांच्या पुत्राचा पराभव व्हावा ही नामुष्की त्या पक्षाच्या भवितव्याच्या दृष्टीने निर्णायक ठरू शकते. पंजाबमध्ये शरीफ कुटुंबीय म्हणजे सर्व काही, हे समीकरणही या निकालाने विस्कटून टाकले. भावनिक आवाहनांच्या आधारावर मते खेचण्याची इम्रान खान यांची क्षमता शाबूत असल्याची प्रचीती यानिमित्ताने आली.

siddharth.khandekar@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained why by elections in pakistan are important print exp 0722 zws
First published on: 19-07-2022 at 05:13 IST