I am not a Typo Campaign: मोबाइल, लॅपटॉप इत्यादी साधनांचा वापर करून लिहिणे ही आता परवलीची गोष्ट झाली आहे. समाजमाध्यमांवर केलेले चॅटिंग असो वा एखाद्या नोकरीसाठी अर्ज करताना लिहिलेला इमेल असो, या सगळ्याच ठिकाणी आपल्याला टायपिंग करावे लागते. इंग्रजी भाषेत एखादा मजकूर लिहिला की तो व्याकरणाच्या दृष्टीने अचूक असावा, यासाठी ‘ऑटो करेक्ट’चे तंत्रज्ञान आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर असते. एखाद्या इंग्रजी शब्दाचे अचूक स्पेलिंग आपल्याला माहीत नसले तरीही ते आपला शब्द दुरुस्त करते. या सुविधेमुळे बऱ्याच लोकांची कामे सोपी होतात. मात्र, ऑटो करेक्टचे हेच तंत्रज्ञान डोकेदुखी ठरले तर? एवढेच नाही तर या ऑटो करेक्टविरोधातच एखादी लढाई पुकारली गेली तर? पण असे का केले जाईल, असा प्रश्न पडू शकतो. मात्र, युनायटेड किंगडममध्ये ऑटो करेक्टच्या या सुविधेविरोधातच एक मोहीम छेडली गेली आहे. का ते सविस्तर पाहूयात.

‘Dhruti’ (धृती) असे टाईप केले की, आपोआपच ‘Drutee’, ‘Dirty’, आणि ‘Dorito’ हे शब्द योग्य असून Dhruti नावाचा कोणताही शब्द इंग्रजी शब्दकोषामध्ये अस्तित्वात नाही, असा सल्ला ऑटो-करेक्ट सुविधेच्या माध्यमातून दिला जातो. त्यामुळे आपले नाव ‘Dhruti’ (धृती) असे असूनही धृती शाह यांना ते टाईप करताना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. धृती शाह या युनायटेड किंगडममध्ये पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे लिहिण्याशी त्यांचा नेहमी संबंध येतो. त्याखालोखाल आपले नाव लिहायची वेळ आली की, मोबाइल अथवा लॅपटॉपमधील ऑटो करेक्ट तंत्रज्ञान त्यांच्यासाठी आव्हान म्हणूनच उभे राहते. ऑटो करेक्टबाबतची आपली निराशा व्यक्त करताना धृती शाह म्हणाल्या की, “ही प्रचंड मोठी डोकेदुखी आहे. म्हणजे टॉर्टिला चिप्ससारख्या पदार्थालाही माझ्या नावापेक्षा अधिक किंमत असावी का?”

हेही वाचा : महासाथीमध्ये गरीब देशांसाठी २० टक्के सुविधा आरक्षित; WHO कोणते नवे नियम तयार करत आहे?

मात्र, या प्रकारच्या समस्येला सामोरी जाणाऱ्या त्या एकट्याच नाहीत. पाश्चिमात्त्य नावे नसलेल्या कित्येक जणांना या ऑटो-करेक्ट तंत्रज्ञानाचा फटका बसतो आहे. युनायटेड किंगडममध्ये वर्णभेदाची समस्या पूर्वापार आहे. तिथे ‘श्वेतवर्णीय’ आणि ‘कृष्णवर्णीय’ असा संघर्ष असल्यामुळे ज्यांची नावे ‘श्वेतवर्णीय’ नाहीत, त्या सर्वांनाच याचा त्रास होतो आहे. गैरश्वेतवर्णीय नावांचा सतत चुकीचा अर्थ लावणारे हे तंत्रज्ञान इतरांवर अन्याय करणारे असल्याचे अनेकांचे मत आहे.

म्हणूनच ‘आय एम नॉट अ टायपो’ (I am not a Typo) या नावाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. टायपो (Typo) याचा अर्थ टायपिंग करताना झालेली चूक! “माझे नाव हे टायपिंग करताना झालेली चूक नाही”, हे सांगण्यासाठी म्हणून ही मोहीम छेडण्यात आली आहे. टेक्नॉलॉजीमधील मोठ्या कंपन्यांना त्यांचे ऑटो-करेक्टचे तंत्रज्ञान सुधारण्याचे आणि ‘श्वेतवर्णीयांना पूरक’ असण्याऐवजी सर्वसमावेशक तंत्रज्ञानाची निर्मिती करण्याचे आवाहन करणारी ही मोहीम आहे.

ही मोहीम कशी सुरू झाली?

सावन चांदणी गंडेचा (३४) हे ब्रिटीश-भारतीय वंशांचे कंटेन्ट क्रिएटर आहेत. त्यांनाही ऑटो-करेक्टच्या या समस्येचा सामना करावा लागतो आहे. सावन म्हणाले की, “या ऑटोकरेक्टच्या सुविधेमुळे फारच त्रास झाला आहे. कारण त्यामुळे माझे ‘Savan’ हे नाव सतत दुरुस्त करण्याच्या नावाखाली बदलून ‘Savant’ अथवा ‘Satan’ असे केले जाते. हे प्रचंड चीड आणणारे आहे.” पुढे आपला उद्वेग व्यक्त करत ते म्हणाले की, “आता टेक कंपन्यांनी यामध्ये सुधारणा करण्याची वेळ आली आहे. ऑटोकरेक्टने प्रत्येक शब्दाचे ‘इंग्रजीकरण’ न करता स्वत:मध्ये सुधारणा करून लेखकाला अपेक्षित असलेली भाषा लिहिण्याची सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी”, असे मत त्यांनी ‘द गार्डियन’शी बोलताना मांडले आहे.

या मोहिमेतून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये इंग्लंड आणि वेल्समध्ये जन्मलेल्या १० जणांच्या नावांची ‘मायक्रोसॉफ्ट’च्या इंग्रजी शब्दकोषामध्ये तपासणी केली असता त्यातील किमान चार नावे तरी चुकीची ठरवली जातात अथवा ती स्वीकारलीच जात नाहीत. विशेषत: जी नावे भारतीय, आफ्रिकन, वेल्श आणि आयरिश असतात, त्यांच्याबाबत हे सर्रास घडते. मायक्रोसॉफ्ट वर्डपासून ते स्मार्टफोनवरील ऍप्सपर्यंत अनेक सॉफ्टवेअरचा वापर करताना हीच अडचण येते. या सगळ्यांमध्येच ऑटो-करेक्टचे तंत्रज्ञान असते. चुकीचे शब्दलेखन सुधारण्यासाठी आणि शुद्धलेखनासाठी या तंत्रज्ञानाची मदत व्हावी, असा त्याचा हेतू आहे. त्यानुसार काही सॉफ्टवेअर चुकीच्या शब्दांना लाल रंगाच्या रेषेने अधोरेखित करतात, तर काही वापरकर्त्याला काय लिहायचे असावे, असा स्वत:च कयास बांधून थेट शब्दच बदलूनच टाकतात. थोडक्यात, या सुविधेची मदत होण्याऐवजी त्रासच होताना दिसतो.

‘आय एम नॉट अ टायपो’ या मोहिमेला पाठिंबा देणाऱ्या धृती शाह यांनी लिहिले आहे की, “माझे नाव एवढेही मोठे नाही. त्यामध्ये फक्त सहा इंग्रजी अक्षरे आहेत, तरीही जेव्हा ते चुकीचे असल्याचे दर्शवले जाते अथवा त्याऐवजी दुसराच कोणता तरी शब्द आपोआप लिहिला जातो, तेव्हा प्रचंड राग येतो. हे सॉफ्टवेअरच सांगायला बघते की, हे तुमचे नाव नाही. जे लिहिले आहे ते चुकीचे लिहिले आहे. थोडक्यात, तुम्हीच चुकीचे आहात.”

अमेरिकेमधील नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटीमधील प्राध्यापक रश्मी दयाल-चंद यांनाही अनेकदा अशीच समस्या येते. त्यांचे नाव ऑटो-करेक्ट होऊन ‘Rush me’ अथवा ‘Sashimi’ असे लिहिले जाते. अनेकदा इमेलमध्ये चुकीचे नाव पडल्याने आपल्याला त्रास झाला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या मोहिमेला पाठिंबा व्यक्त करत त्या म्हणाल्या की, “माझ्यासारखे नाव असलेल्या लोकांना ऑटो-करेक्टची ही सुविधा अजिबात सुविधाजनक आणि उपयुक्त नाही. उलट ती त्रासदायक आहे. बरेचदा अपायकारकही आहे.” पुढे त्या म्हणाल्या की, “यामुळे श्वेतवर्णीय संस्कृतीतील नसलेली नावे चुकीची असल्याची धारणा निर्माण होते, हा एक मोठा अडथळा आहे. यामुळे गैर-अँग्लो व्यक्तींचे आणि त्यांच्या समुदायाचेही सांस्कृतिक अवमूल्यन होते.”

हेही वाचा : प्रज्ज्वल रेवण्णा डिप्लोमॅटिक पासपोर्टच्या बळावर देशातून फरार; हा पासपोर्ट कोणाला मिळतो?

टेक कंपन्यांना आवाहन

या मोहिमेत सहभागी असलेल्या लोकांनी टेक कंपन्यांना एक खुले पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी “प्रत्येकाची नावे योग्य पद्धतीने टाईप होतील, यासाठी त्यांच्या शब्दकोषाला अद्ययावत करण्याचे आवाहन केले आहे.” या पत्रामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, २०१७ ते २०२१ च्या दरम्यान, २३२८ व्यक्तींची नावे ‘Esmae’ असे ठेवण्यात आले. मात्र, Esmae असे टाईप करताना ते ऑटो-करेक्टनुसार ‘Admar’ केले जाते. जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विविध नावे आहेत. मात्र, ऑटो-करेक्टचे तंत्रज्ञान फक्त श्वेतवर्णीयांना पूरक आहे.

या पत्रात इंग्रजी नसलेल्या नावांचाही उल्लेख केला आहे. जसे की Zarah, Priti, Matei, Rafe, Ayda, Ruaridh, Eesa आणि Otillie अशी नावे ऑटो-करेक्टनुसार थेट चुकीची ठरवली जातात. कॅरेन फॉक्स यांनीही ऑटो-करेक्ट तंत्रज्ञानाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मुलांची नावे इओन आणि नियाम अशी आहेत. ते म्हणाले की, “नाव टाईप केल्यानंतर त्याखाली येणाऱ्या लाल रेषा मला त्रास देतात. मी माझ्या मुलासाठी ‘चुकीचे’ नाव निवडलेले नाही. टेक कंपन्यांना ही समस्या दूर करणे सहज शक्य आहे, त्यांनी हे लवकरात लवकर करायला हवे.”