विसरण्याची सवय ही अगदी सामान्य सवय आहे. आपण दैनंदिन जीवनात एखादी गोष्ट विसरलो किंवा ठरवलेली एखादी गोष्ट करायची राहून गेली; तर यामुळे आपल्याला नक्कीच त्रास होऊ शकतो, अडचणीदेखील येऊ शकतात. पण खरं सांगायचं झालं तर हा स्मरणशक्तीचाच एक भाग आहे. यामुळे नवीन माहितीसाठी जागा तयार होते. आपल्या आठवणींना आपण फार काळ स्मरणात ठेवू शकत नाही. अलिकडेचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आपल्या भाषणात देशांची नावं विसरले होते. पण विसरण्याची सवय सामान्य आहे का? कधी पर्यंत ही सवय सामान्य मानली जाऊ शकते? गोष्टी स्मरणात राहण्यासाठी मेंदूचे कार्य कसे सुरू असते? याबद्दल जाणून घेऊ.

गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी मेंदू कसे कार्य करतो?

जेव्हा आपण एखादी गोष्ट आठवतो तेव्हा मेंदूला ती गोष्ट शिकावी लागते; ज्याला एनकोडिंग म्हणतात. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

एनकोड, स्टोअर आणि रीट्राईव्ह या तीन गोष्टींवर मेंदूचं कार्य सुरू असतं. जेव्हा आपण एखादी गोष्ट आठवतो तेव्हा मेंदूला ती गोष्ट शिकावी लागते; ज्याला एनकोडिंग म्हणतात. त्यानंतर त्या गोष्टीला सुरक्षित ठेवावं लागतं; ज्याला स्टोअर म्हणतात आणि अखेर आवश्यक असल्यास मेंदूला ती गोष्ट पुन्हा आठवावी लागते; ज्याला रीट्राईव्ह म्हणतात. या सर्व प्रक्रियेत कधीही अडथळा येऊ शकतो, ज्यामुळे आपण गोष्टी विसरू शकतो. जेव्हा एखादी माहिती मेंदूपर्यंत येते, तेव्हा आलेल्या सर्व माहितीवर ही प्रक्रिया होऊ शकत नाही. यात आपण फिल्टरचा वापर करतो; म्हणजे काय तर, केवळ ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात त्यावरच ही प्रक्रिया होते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा आपण एखाद पुस्तक वाचतो, तेव्हा त्यातल्या काही निवडक गोष्टी, शब्द, संकल्पना असतात ज्याकडे आपलं जास्त लक्ष जात. त्याच गोष्टी मेंदू एनकोड करतो.

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?

आपण एखाद्या कार्यक्रमात गेलो आणि तिथं एखाद्या व्यक्तीने त्याची ओळख करून दिली, त्याच वेळी आपलं लक्ष मात्र दुसरीकडे असेल, तेव्हा मेंदूला त्याचे नाव एनकोड करणे अशक्य होईल. ती व्यक्ती आपल्याला नंतर भेटल्यावर त्याचं नाव आपल्याला आठवणार नाही. अगदी हेच आपल्या दैनंदिन आयुष्यात रोजच्या घडामोडींमध्ये होत असतं. सवय यात मुख्य भूमिका बजावते. घरात आपल्या किल्लीची जागा ठरलेली असते, कारण आपण रोज त्याच जागेवर किल्ली ठेवतो. अशा वेळी सवयीमुळे मेंदूला एनकोडिंग किंवा रिट्राईव्ह करण्याची गरज भासत नाही.

स्मरणशक्तीसाठी उजळणीही महत्त्वाची

स्मरणशक्तीसाठी उजळणीही महत्त्वाची असते. ज्या गोष्टींना किंवा आठवणींना आपण सतत आठवतो, त्या आठवणी जास्त काळ टिकतात. सतत आठवणं किंवा एखादी गोष्ट वारंवार सांगणं यालाच उजळणी म्हणता येईल. अशा गोष्टी स्मरणशक्तीत पक्क्या बसतात. १८८० च्या दशकात जर्मन मानसशास्त्रज्ञ हर्मन एबिंगहॉस यांनी एक प्रयोग केला. यात त्यांनी लोकांना काही निरर्थक गोष्टी शिकवल्या आणि कालांतराने या गोष्टी किती लक्षात राहतात ते पाहिलं. या प्रयोगात असं लक्षात आलं की, जर उजळणी केलीच नाही तर आपली स्मरणशक्ती एक ते दोन दिवसांत गोष्टी विसरून जाते. तेच जर लोकांनी गोष्टी आठवल्या, त्याची उजळणी केली; तर या गोष्टी एक दिवसापेक्षा अधिक काळ लक्षात राहतात.

उजळणी न केल्यानंही रोजच्या आयुष्यात गोष्टींचा विसर पडू शकतो. आपण बाजारात गेलो आणि गाडी पार्किंगमध्ये पार्क केली, तेव्हा ती गाडी कुठं आहे याचे एनकोडिंग तर मेंदू करतो, पण तुम्ही बाजारात वस्तू खरेदी करू लागलात आणि तुमचे संपूर्ण लक्ष वस्तूंच्या यादीवर असेल, तर गाडी कुठं पार्क केली आहे हे सहज डोक्यातून निघून जातं. गाडीची शोधाशोध सुरू होतो. यावेळी आपल्या लक्षात येतं की, कदाचित पार्किंगमध्ये उजव्या बाजूला आपण गाडी पार्क केली असावी. तेव्हा संपूर्ण पार्किंगमध्ये गाडीचा शोध न घेता, आपल्या डोक्यात जी जागा आली तिकडे आपण गाडी शोधतो. आता यामागचं तर्कशास्त्र असं की, आपण विशिष्ट गोष्ट विसरू शकू, परंतु मेंदूने एनकोडिंगची प्रक्रिया पूर्ण केल्याने त्यातलं काही न काही आपल्याला आठवतंच.

वृद्धत्वाचा मेंदूवर होणारा प्रभाव

जसजसं वय वाढतं तसतशी लोकांना त्यांच्या स्मरणशक्तीची अधिक काळजी वाटू लागते. हे खरंय की, विसरण्यामुळे अनेक अडचणी येतात. परंतु, नेहमीच हा समस्येचा विषय नसतो. आपलं वय जितकं वाढतं, तितके आयुष्यातले आपले अनुभवही वाढतात. यात काही अनुभवांमध्ये साम्य असतं; ज्यामुळे या गोष्टी लक्षात राहणं अवघड होऊ शकतं. जर तुम्ही एकदा गोव्याला सुट्यांमध्ये गेलात, तर तिथं काय काय केलं याबद्दल तुम्हाला स्पष्टपणे आठवेल. परंतु, जर तुम्ही गोव्याला अनेकदा गेलात, तर पहिल्या सुट्यांमध्ये काय केलं, दुसर्‍या सुट्यांमध्ये काय केलं. कुठे कुठे गेलात, या गोष्टी आठवणं आव्हानात्मक होतं.

स्मृतीमधील साम्य माहिती पुनर्प्राप्त (रिट्राईव्ह) करण्याच्या मार्गात अडथळा आणू शकते. संगणकीय भाषेत सांगायचे झाले, तर एखाद्या विषयाची फाइल आहे आणि ती आपल्याला कोणत्या फोल्डरमध्ये ठेवायची हे माहीत आहे आणि त्याप्रमाणे ती आपण त्या फोल्डरमध्ये ठेवलेली असेल तर दुसर्‍यांदाही ती फाइल तिथे शोधल्यास आपल्याला सहज सापडेल. परंतु, या फाइलसारख्याच आणखी फायली येऊ लागल्या तर कोणत्या फोल्डरमध्ये कोणती फाइल ठेवायची यात अडचण येईल आणि नंतर यातील एखादी फाइल हवी असल्यास, तिला शोधणेही अवघड होईल. याचा अर्थ असा की, कालांतराने गोष्टी आठवणं कठीण होतं.

गोष्टी न विसरण्यामुळेही येतात अडचणी?

पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर हे अशा परिस्थितीचं उदाहरण आहे. या परिस्थितीत लोक गोष्टी विसरू शकत नाहीत. त्यांची स्मरणशक्ती चांगली असते. यात दु:ख किंवा वेदनादायी आठवणीही लोक विसरू शकत नाहीत; ज्यामुळे नैराश्य येऊ शकतं. त्यामुळे विसरणं एका दृष्टीनं चांगलंही असतं आणि मग एखादा निर्णय घेण्यात विसरण्यामुळे अडथळा येत नाही. जसजसं वय वाढत जातं, तसतशी ही सवय सामान्य होत जाते. जो बायडेन यांच्याप्रमाणे नावे किंवा तारखा विसरल्यानेही निर्णय घेण्यास अडथळा येत नाही. वृद्ध लोकांमध्ये असणारं सखोल ज्ञान या अडथळ्यांचा प्रतिकार करण्यास सक्षम असू शकतं.

विसरण्याची सवय मोठी समस्या कधी होते?

हेही वाचा : महाभयंकर ‘ब्यूबॉनिक प्लेग’ परततोय? हा रोग नेमका आहे तरी काय?

काही जणांच्या बाबतीत विसरभोळेपणा एखाद्या मोठ्या समस्येचं लक्षण असू शकते. यावेळी डॉक्टरांचा सल्ला फार आवश्यक असतो. यात तेच तेच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारणं गंभीर असू शकतं. अगदी परिचयाच्या गोष्टी किंवा सवयीच्या गोष्टी जर व्यक्ती विसरू लागली, तर हे अल्झायमरचं लक्षण असू शकतं. अल्झायमर हा एक मानसिक विकार आहे; ज्यात व्यक्तीची स्मरणशक्ती कमी कमी होत जाते. हा विकार बरा होणं कठीण आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर उपचार घेणं आवश्यक आहे.