अमोल परांजपे
७ ऑक्टोबरच्या हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने छेडलेल्या युद्धात आतापर्यंत ३४ हजारांवर पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. यात हमासचे सैनिक कमी आणि महिला-मुलांचे प्रमाणच जास्त आहे. आता तर लाखो शरणार्थी असलेल्या राफा शहरात इस्रायलने रणगाडे घुसविले आहेत. या आक्रमक हालचालीनंतर अमेरिकेलाही अधिक कठोर भूमिका घेणे भाग पडले आहे. मात्र यामुळे इस्रायल-हमास युद्ध आणि सामान्यांचा नाहक नरसंहार थांबणार का, याबाबत शंकाच आहे…

राफामध्ये इस्रायलने रणगाडे का पाठविले?

मंगळवारी पहाटेच्या वेळी राफा शहरात इस्रायलने रणगाड्यांची संपूर्ण ब्रिगेड घुसविली. गाझाच्या दक्षिणेकडे असलेल्या या शहरात सध्या युद्धग्रस्त गाझातून देशोधडीला लागलेले १० लाखांवर पॅलेस्टिनी वास्तव्यास असून इस्रायलच्या आक्रमणामुळे तेथील सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. एकीकडे अमेरिका, इजिप्त, कतार सातत्याने युद्धविरामाचे आवाहन करीत असताना आणि प्रस्ताव देत असताना इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू अधिकाधिक जहाल हल्ले चढवित आहेत. राफामध्ये रणगाडे घुसविण्याचेही त्यांनी नेहमीचेच कारण दिले आहे. हमासचे लष्कर आणि त्यांचे प्रशासन मोडून काढण्यासाठी राफावर ताबा आवश्यक असल्याचे कारण इस्रायलने पुढे केले आहे. मात्र यामुळे गाझाची जवळजवळ निम्म्या लोकसंख्येला इस्रायलने ‘टाईम बॉम्ब’वर ठेवले आहे. त्यामुळेच राफावरील आक्रमणाने जगाची झोप उडविली आहे.

हेही वाचा >>>हे खाणं ठरतंय आजारांचं मूळ; जाणून घ्या नवीन मार्गदर्शक तत्वं

इस्रायलच्या या आक्रमणाचा परिणाम काय?

इस्रायलच्या रणगाडा ब्रिगेडने इजिप्त आणि गाझामधील राफा सीमेच्या पॅलेस्टिनी बाजूवर ताबा मिळवून ही सीमा बंद करण्यास भाग पाडले आहे. यामुळे युद्धग्रस्त गाझामधील मानवतावादी मदतीला प्रचंड मोठा फटका बसला आहे. कारण, संयुक्त राष्ट्रांसह गाझामध्ये काम करणाऱ्या अन्य स्वयंसेवी संस्थांना मिळणारे इंधन केवळ राफा सीमेवरूनच गाझामध्ये पाठविता येते. संस्थांची वाहने तसेच जनरेटर सुरू ठेवण्यासाठी हे इंधन महत्त्वाचे आहे. इंधनाचे आधीच रेशनिंग सुरू असून राफा सीमा बंद झाल्याने परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी स्पष्ट केले आहे. शिवाय केवळ राफा सीमेवरूनच जखमी नागरिक, संस्थांचे कार्यकर्ते गाझातून ये-जा करू शकतात. इस्रायलने सीमेची नाकेबंदी केल्यामुळे डझनभर रुग्ण अडकून पडले असून त्यांचा जीव धोक्यात आहे. ही सीमा आणखी किती काळ बंद ठेवणार, हे इस्रायलने स्पष्ट केले नसल्याने गोंधळाची स्थिती आहे. परिणामी अमेरिकेला अधिक कडक धोरण अवलंबिण्यास भाग पाडले आहे.

अमेरिकेने दारुगोळ्यांची रसद का थांबविली?

युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलला अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा पुरविण्यात येत आहे. किंबहुना इस्रायलची बरीचशी भिस्त ही अमेरिकेवर असतानाही वॉशिंग्टनकडून दिला जाणारा सबुरीचा सल्ला ऐकण्यास नेतान्याहू तयार नाहीत. आता राफामध्ये सैन्य घुसविल्यामुळे अमेरिकेने अधिक कठोर भूमिका घेतली आहे. २ हजार पौंडांचे १,८०० बॉम्ब आणि ५०० पौंडांच्या १,७०० बॉम्बची रसद अमेरिकेने किमान दोन आठवड्यांसाठी थांबविली आहे. बोईंग कंपनीने तयार केलेली काही युद्धसामग्री पाठविणेही अमेरिकेने लांबणीवर टाकले आहे. विशेष म्हणजे, ही अलिकडे अमेरिकेच्या काँग्रेसने मंजूर केलेल्या ९५ अब्ज डॉलरमधील नसून, आधीच मंजुरी मिळालेल्या मदतीचा भाग आहे. अमेरिकेने मनाई केल्यानंतरही राफामधील इस्रायलच्या आक्रमणामुळे तेथे अडकलेल्या १० लाख पॅलिस्टिनींच्या सुरक्षेचे पुनरावलोकन करण्यात येत असल्याचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी सेनेटमध्ये बोलताना स्पष्ट केले. २ हजार टनांचे बॉम्ब दाटीवाटीने राहणाऱ्या निर्वासित वस्त्यांमध्ये मोठा संहार करू शकतात, अशी भीती असल्याने अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी स्वत: लक्ष घालून ही रसद थांबविली (किंवा किमान लांबविली) आहे.

हेही वाचा >>>स्वतःच्या मुलींच्या कौमार्याचा बाजार मांडणारं हीरामंडीचं भयाण वास्तव; कलंकित इतिहास काय सांगतो?

२००० टनांचे बॉम्ब वापरणे वैध आहे का?

हा आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने वादाचा विषय राहिला आहे. आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्यानुसार याच्या वापरावर सरसकट बंदी नसली, तरी सामान्य नागरिकांना लक्ष्य करून आणि लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या भागांत याचा वापर होऊ नये, असे संकेत आहेत. नेतान्याहू यांची आतापर्यंतची युद्धखोरी पाहता हे संकेत पाळले जातील, याची अमेरिकेलाही शाश्वती नसल्याचे स्पष्ट आहे. अमेरिकेचा तसा अनुभवही आहे. १९८२ साली इस्रायलने लेबनॉनमधील दाटीवाटीच्या लोकवस्तीत संहारक दारुगोळा वापरल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी सहा वर्षांसाठी इस्रायलची लष्करी मदत रोखली होती. २००६ साली त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनीही याच भीतीपोटी इस्रायलला क्लस्टर बॉम्ब देणे रद्द केले होते.

अमेरिकेच्या भूमिकेवर इस्रायलचे म्हणणे काय?

अमेरिकेने दारुगोळा व शस्त्रास्त्रे दिली नाहीत, तर वेळप्रसंगी आम्ही आमच्या नखांनी लढू, असे वॉशिंग्टनमधील एका वरिष्ठ इस्रायली अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. तर मित्रराष्ट्रांबरोबर काही मतभेद असतील, तर ते चर्चेने सोडविले जातील, असे इस्रायलच्या लष्करी प्रवक्त्याचे म्हणणे आहे. आपण पॅलेस्टिनी नागरिकांना लक्ष्य करीत नसून हमासचा समूळ नायनाट हेच आपले एकमेव उद्दिष्ट असल्याची मखलाशी इस्रायलने सुरूच ठेवली आहे. अनावश्यक मृत्यू टाळण्यासाठी सर्व खबरदारी घेतली जात असल्याचेही इस्रायल सांगत असला, तरी प्रत्यक्ष युद्धभूमीवरील परिस्थिती आणि आकडेवारी खरे चित्र स्पष्ट करते.

amol.paranjpe@expressindia.com