लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत राज्यातील काही मोजके मतदारसंघ उमेदवार जाहीर होण्याआधीपासून कायमच चर्चेत राहिले आहेत. नाशिक त्यापैकीच एक. महायुतीत शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आलेल्या या मतदारसंघात विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांच्याशी मुख्य लढत होत आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे शिंदे गटासाठी ही लढत आव्हानात्मक मानली जात असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच स्वत: मतदारसंघात लक्ष देणे भाग पडत आहे. पाच दिवसात त्यांचे दोन दौरे हे त्याचेच प्रतिबिंब.
उमेदवारीचा घोळ…
महाविकास आघाडीने माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना सर्वप्रथम उमेदवारीसाठी तयारी करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार करंजकर यांनी प्रचार दौरेही सुरू केले होते. परंतु, अचानक करंजकर यांच्याऐवजी सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे यांना ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे करंजकर यांनी शिंदे गटाची वाट धरली. शिंदे गटाकडून उमेदवारीचा घोळ घालण्यात आला. खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकच्या मेळाव्यात विद्यमान खासदार हेमंत गोडसे हेच उमेदवार राहतील, असे जाहीर केल्यानंतर त्यांच्या उमेदवारीस भाजपकडून विरोध सुरू झाला. गोडसे यांच्याविरोधात मतदारसंघात नाराजी असल्याचे सांगितले गेले. त्यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासाठी अमित शहा आग्रही असल्याचा संदेश आला. शिंदे गटातही गोडसेंऐवजी जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, विजय करंजकर हेही स्पर्धेत आले. शांतिगिरी महाराज यांनीही उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु केले. या कारणांमुळे उमेदवारीच्या पातळीवरूनच मतदारसंघ चर्चेत आला.
हेही वाचा >>> विश्लेषण : पोलिसांच्या आक्रमक कारवाईमुळे नक्षलवादी चळवळीला धक्का?
उमेदवारी जाहीर होण्यास उशीर का?
ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर होऊन त्यांनी प्रचाराच्या दोन फेऱ्या पूर्ण केल्यानंतरही शिंदे गटाची उमेदवारी जाहीर झाली नव्हती. त्यामुळे उमेदवारीसाठी इच्छुक विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची अस्वस्थता वाढली. गोडसे यांच्याविषयी मतदारसंघात नकारात्मक वातावरण असल्याचे पाहणीत आढळून आल्याचा दावा भाजपने केला होता. त्यामुळे गोडसे यांची उमेदवारी घोषित होणेही लांबले. त्यामुळे मतदारसंघावर भाजप तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटानेही हक्क सांगितल्याने गोंधळात भर पडली. हा सर्व गोंधळ निस्तरेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवातही झाली होती. अखेर, उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्यास दोन दिवसांचा अवधी बाकी असताना गोडसे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले.
शिंदे गटापुढील आव्हाने कोणती ?
गोडसे यांना उमेदवारी जाहीर होण्यास उशीर झाल्याने प्रचारासाठी त्यांना कमी अवधी मिळाल्याने प्रत्येक गावापर्यंत पोहचणे त्यांच्यासाठी आव्हान ठरले आहे. त्यातच महायुतीतील मित्रपक्ष प्रचारात सक्रिय नसल्याची ओरड सुरू झाली. उमेदवारी न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याने ते प्रचारात पुढाकार घेत नसल्याची चर्चा सुरू झाल्यावर गोडसे यांना भुजबळ फार्म गाठत त्यांची मनधरणी करणे भाग पडले. शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी केल्याने मत विभाजन होण्याचा धोका निर्माण झाल्याने त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न शिंदे गटासह भाजपच्या नेत्यांनीही करुन पाहिले. परंतु, त्यांनी उमेदवारी कायम ठेवली. अजित पवार गटाचे सिन्नरचे आमदार माणिक कोकाटे, भाजपचे महापालिकेतील माजी सभागृहनेते दिनकर पाटील यांची नाराजी, ही शिंदे गटासाठी आव्हान ठरू पाहत आहे.
हेही वाचा >>> डिजिलॉकरवर पाहता येणार दहावी-बारावीचा निकाल; डिजिलॉकरचे आणखी किती फायदे ? कितपत आहे सुरक्षित?
मुख्यमंत्री नाशिकमध्ये वारंवार का येतात?
महायुतीत नाशिक मतदारसंघ शिवसेनेकडे कायम राहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संघर्ष करावा लागला. त्यातच खासदार श्रीकांत शिंदे यांनीच हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी नाशिक मतदारसंघ प्रतिष्ठेचा झाला आहे. मित्रपक्षांकडून प्रचारात सहकार्य न मिळणे, महायुतीच्या पदाधिकारी मेळाव्यात प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती, यामुळे नाशिक मतदारसंघ अडचणीत आल्याचे दिसू लागल्याने एकनाथ शिंदे यांना स्वत:कडे सूत्रे हाती घेणे भाग पडले. आठ मे रोजी नाशिक गाठत त्यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीस भुजबळ आणि माणिक कोकाटे हे अनुपस्थित होते. या बैठकीनंतरही प्रचाराच्या पातळीवर कोणताही फरक न पडल्याने पाच दिवसात मुख्यमंत्री रविवारी दुसऱ्यांदा नाशिकमध्ये आले. यावेळी त्यांनी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद बैठक घेतली. त्यांचे म्हणणे जाणून घेत औद्योगिक, क्रीडा, धार्मिक, सांस्कृतिक अशा सर्वच विषयांशी संबंधित कामे पूर्ण करण्यात येतील, असा आश्वासनांचा पाऊस त्यांनी पाडला.