भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनण्यासाठी मोलाची भूमिका बजावणारे तसेच भारतातील हरितक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे वैज्ञानिक एम. एस. स्वामीनाथन यांचे गुरुवारी (२८ सप्टेंबर) निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन कृषी क्षेत्रातील संशोधनास वाहून घेतले होते. स्वामीनाथन यांच्या जाण्याने जागतिक कृषी क्षेत्राचे अपरिमित नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर गरीबांचं कल्याण व भूकमुक्ती हा ध्यास जगलेले एम. एस. स्वामीनाथन कोण होते? त्यांना हरितक्रांतीचे जनक का म्हटले जाते? हे जाणून घेऊ या….

स्वामीनाथन आयपीएस अधिकारी होते. मात्र कृषीक्षेत्रातील संशोधनाची त्यांना जास्त आवड असल्यामुळे त्यांनी राजीनामा देत कृषी संशोधाला स्वत:ला वाहून घेतले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी वेगवेगळ्या संस्थांत महत्त्वाची भूमिका बजावली. इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेसचे १९८४ ते ९० या काळात ते अध्यक्ष होते. १९८९ ते ९८ या काळात ते वर्ल्डवाइड फंड फॉर नेचर (इंडिया) चे अध्यक्ष आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (ICAR) महासंचालक होते. यासह त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या जाबदाऱ्या पार पाडल्या.

indian students attacked in kyrgyzstan
“भारतीय विद्यार्थ्यांनी घराबाहेर पडू नये”, किर्गिस्तानमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर दुतावासाकडून सतर्कतेचा इशारा!
Tushar Gandhi
“विदर्भात महात्मा गांधींच्या हत्येचा कट रचलेला, तेव्हा उद्धव ठाकरेंच्या आजोबांनी…”, तुषार गांधींना सांगितला ‘तो’ प्रसंग
Bribe from education officer to start liquor shop near school
नंदुरबार : शाळेजवळ दारु दुकान सुरु करण्यासाठी शिक्षण अधिकाऱ्याकडून लाच
Actor Kishore Kadam played the role of Karmaveer Bhaurao Patil in the movie Karmaveerayan
‘कर्मवीरायण’ येत्या शुक्रवारी रूपेरी पडद्यावर; अभिनेता किशोर कदम कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या भूमिकेत
Mihir Kotecha, Sanjay Patil,
मुंबई विकासावर चर्चा करण्याचे कोटेचा यांचे संजय पाटील यांना आव्हान
congress leader prithviraj chavan attacked modi government in public meeting in sangvi
नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रचंड मोठी लाट – पृथ्वीराज चव्हाण; सांगवीतील जाहीर सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मोदी सरकारवर प्रहार
What Ajit pawar Said?
अजित पवार यांनी शरद पवारांच्या आरोपांना दिलं उत्तर, “मी जर इतका भ्रष्टाचारी, नालायक आणि…”
Broadcaster Science Inculcation of scientific approach in India Prof R v Sowani
विज्ञान प्रसारकाची जन्मशताब्दी..

स्वामीनाथन यांचा परिचय आणि कारकीर्द

एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशनने स्वामीनाथन यांची एक मुलाखत प्रसिद्ध केली होती. या मुलाखतीत स्वामीनाथन त्यांच्या जडणघडणीबद्दल तसेच ते कृषी क्षेत्रातील संशोधनाकडे कसे वळले, याबाबत सांगितले होते. एम. एस. स्वामीनाथन यांनी डॉक्टर व्हावे असे त्यांच्या वडिलांना वाटायचे. मात्र त्यांनी कृषी क्षेत्रात संशोधन करण्याचे ठरवले. “१९४२ साली महात्मा गांधी यांनी भारत छोडो आंदोलन छेडले होते. १९४२-४३ साली बंगालमध्ये अन्नाचे दुर्भिक्ष निर्माण झाले होते. मी त्या काळात विद्यार्थी होतो. विद्यार्थीदशेत असताना आम्ही खूप आदर्शवादी होतो. गांधीजींनी भारत छोडो आंदोलन छेडल्यानंतर आम्ही भारतीय स्वातंत्र्यलढ्यात कसे योगदान देऊ शकतो, याचा विचार करायचो. बंगालमधील अन्नधान्याच्या तुटवड्याला पाहून मी कृषी क्षेत्राचा अभ्यास करण्याचे ठरवले. मी माझ्या करिअरची दिशा बदलली आणि वैद्यकीय महाविद्यालयात जाण्याऐवजी थेट कोईम्बतूर येथील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला,” असे स्वामीनाथन यांनी सांगितले होते.

ब्रिटिशांमुळे बंगालमध्ये अन्नाचे दुर्भिक्ष्य

बंगालमध्ये अन्नधान्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे तेथे साधारण २ ते ३ दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला होता. ब्रिटिशांच्या धोरणांमुळेच बंगालला अन्नधान्याच्या तुटवड्याला सामोरे जावे लागले होते. कारण दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटिश त्यांच्या सैनिकांना अन्नधान्य पुरवायचे. त्यामुळे बंगालसारख्या भागात अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली. याच कारणामुळे स्वामीनाथन यांनी कृषी क्षेत्राचा अभ्यास करून त्यात संशोधन करण्याचे ठरवले. आपल्या प्रवासाबाबतही स्वामीनाथन यांनी सविस्तर सांगितले होते. “मी कृषी क्षेत्रात संशोधन करण्याचा निर्णय घेतला. तसेच धान्याच्या वेगवेगळ्या वाणांची जनुकीय रचना, त्यांच्यातील प्रजनन यांचाही अभ्यास करण्याचे मी ठरवले. पिकाचे चांगले वाण मिळाल्यास देशातील अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो, हा विचार माझ्या डोक्यात होता. तसेच मला जनुकीय रचना, अनुवांशिकता याबाबत उत्सुकता होती,” असे स्वामीनाथन यांनी सांगितले होते.

भारताला अमेरिकेकडून अन्नधान्याची आयात करावी लागायची

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत कृषीक्षेत्रात फारच मागे होता. लोकांच्या अन्नाची गरज भागत नव्हती. त्यामुळे भारतीय हवामानात उच्च उत्पादन देऊ शकणाऱ्या पिकाचे वाण विकसित करण्याची गरज होती. ब्रिटिशांच्या राजवटीत कृषी क्षेत्राचा म्हणावा तसा विकास झाला नाही. तसेच कृषी क्षेत्राला आधुनिक बनवण्यासाठी तशी संसाधनेदखील उपलब्ध नव्हती. त्यामुळे भारताची अन्नाची गरज भागवण्यासाठी अनेकदा अमेरिकेकडून अन्नधान्याची आयात करावील लागायची. याच गरजेपोटी भारतात पुढे हरितक्रांती झाली. भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्यासाठी स्वामीनाथन यांनी मोलाचे कार्य केले. हरितक्रांतीमुळे कृषी क्षेत्रात मोठे बदल झाले. त्यांनी युरोप आणि अमेरिकेतील अनेक संशोधन संस्थांत अन्नधान्याच्या जनुकीय रचनांचा अभ्यास केला आणि १९५४ साली कटक येथील सेंट्रल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट येथे भाताच्या जापोनिका या वाणातील जनुके इंडिका वाणामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. या प्रयोगाबद्दल बोलताना ‘उच्च उत्पादन देणाऱ्या वाणाची निर्मिती करण्याचा हा पहिला प्रयत्न होता,’ असे ते म्हणाले होते.

स्वातंत्र्य भारतात वर्षाला ६ दशलक्ष टन गव्हाचे उत्पादन

हरितक्रांतीबद्दल बोलताना त्यांनी अधिक उत्पन्न देणारे वाण कसे विकसित करण्यात आले, हरियाणा, पंजाब, पश्चिम उत्तर प्रदेश या भागात उच्च उत्पादन देणारी बियाणे, पुरेशी सिंचनव्यवस्था, खतांचा वापर यामुळे कृषीक्षेत्रात कसे बदल झाले, याबाबत सांगितले होते. “१९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात वर्षाला ६ दशलक्ष टन गव्हाचे उत्पादन व्हायचे. १९६२ सालापर्यंत यात १० दशलक्ष टन एवढी वाढ झाली. मात्र १९६४ ते १९६८ या चार वर्षांच्या काळात भारताचे गव्हाचे वर्षिक उत्पादन हे १७ दशलक्ष टनापर्यंत पोहोचले. गहू उत्पादनाच्या बाबतीत ही फार मोठी प्रगती होती. म्हणूनच याला क्रांतीकारी घटना म्हटले जाते. त्या काळात भारताल अमेरिकेकडून पीएल ४८० वाणाचा गहू आयात करावा लागायचा. १९६६ साली भारतात मोठा दुष्काळ पडला होता. त्या वर्षातही भारताने अमेरिकेहून पीएल ४८० वाणाचा १० दशलक्ष टन गहू आयात केला होता,” असे स्वामीनाथन यांनी सांगितले होते.

स्वामीनाथ यांचे हरितक्रांतीत योगदान काय?

स्वामीनाथन यांनी भाताचे सुधारित वाण तयार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी तसेच इतर शास्त्रज्ञांनी गहू या पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठीही प्रयत्न केला. गहू या पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी त्यांना मेक्सिकोतील शास्त्रज्ञ नॉर्मन बोरलॉग यांच्याकडून नौरीन या खुज्या वाणाची जनुके ( Norin dwarfing genes) हवी होती. बोरलॉग हे अमेरिकेतील मोठे शास्त्रज्ञ होते. अधिक उत्पादन देणारे वाण विकसित करण्यासाठी तेदेखील प्रयत्न करत होते. पुढे १९७० साली बोरलॉग यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हरितक्रांतीच्या रुपात जगाला एक नवी आशा दिल्यामुळे त्यांना सन्मानित करण्यात आले होते. भारतातील हरितक्रांतीमध्ये अनेक शास्त्रज्ञांचे योगदान आहे. मात्र पाणी आणि वाढत्या खताला प्रतिसाद देणारे एक विकसित वाण निर्माण करण्याची कल्पना ही स्वामीनाथन यांचीच आहे.

भारतातील गहू आणि तांदळाचे वाण उंच आणि पातळ होते

भारतातील पारंपरिक गहू आणि तांदळाचे वाण हे उंच आणि पातळ होते. परिणामी वाढ झाल्यानंतर या वाणाचे पीक खाली वाकायचे. तसेच खतामुळे ओंब्या भरायच्या आणि ओझ्यामुळे रोप खाली वाकायचे. त्यामुळे स्वामीनाथन यांनी भाताच्या पिकावर संशोधन केले. त्यांनी गव्हाच्या रोपाचीही उंची कमी करण्याचा प्रयत्न केला. याबाबत ‘इंडियन एक्स्प्रेस’मधील एका वृत्तात सविस्तर सांगण्यात आलेले आहे. “स्वामीनाथन यांनी म्युटाजेनेसिस ही पद्धत वापरून मध्यम उंची ( Semi-Dwarf)असलेले गव्हाचे वाण विकसित करण्याचा प्रयत्न केला. म्युटाजेनेसिस प्रक्रियेच्या माध्यमातून गव्हाच्या जनुकात (DNA)पाहिजे तसा बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी गव्हाच्या रोपावर रासायनिक आणि किरणोत्सर्गाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या. मात्र यामध्ये त्यांना अपेक्षित यश आले नाही. या प्रक्रियेतून रोपाची उंची कमी झाली. मात्र सोबतच धान्याच्या आकारही कमी झाला,” असे इंडियन एक्स्प्रेसमध्ये सांगण्यात आले.

स्वामीनाथन यांनी ऑर्विल वोगेल यांच्याशी संपर्क साधला

पुढे आपल्या प्रयोगाचा योग्य तो परिणाम व्हावा यासाठी त्यांनी गव्हाच्या आणखी चांगल्या आणि योग्य वाणाचा शोध सुरू केला. त्यासाठी त्यांनी अमेरिकेतील शास्त्रज्ञ ऑर्विल वोगेल यांच्याशी संपर्क साधला. वोगेल यांनी गव्हाचे कमी उंचीचे (Dwarf Wheat) वाण विकसित केले होते. त्यामुळे वोगेल यांच्याकडून काही मदत मिळेल, असे स्वामीनाथन यांना वाटले होते. वोगेल यांनी विकसित केलेल्या वाणात कमी उंची असलेल्या नोरिन-१० या वाणातील जणुकाचा वापर करण्यात आला होता. वोगेल यांनी त्यांनी विकसित केलेले वाण स्वामीनाथन यांना देण्याची तयारी दाखवली, मात्र भारतीय हवामानात हे वाण वाढू शकेल का? याबाबत त्यांना शंका होती.

स्वामीनाथन यांनी बोरलॉग यांचीही मदत घेतली

त्यामुळे वोगेल यांनी स्वामीनाथन यांना नॉर्मन बोरलॉग यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. बोरलॉग यांनी मेक्सिकोमधील वातावरणात वाढू शकेल असे कमी उंची असलेले गव्हाचे वाण विकसित केले होते. स्वामीनाथन यांनी बोरलॉग यांच्याशी संपर्क साधला आणि विशेष म्हणजे बोरलॉग यांनी सहकार्य करण्यास तयारी दर्शवली.

त्यानंतर कमी उंची असलेले गव्हाचे वाण विकसित करण्यासाठी काय प्रयत्न करावे लागले, याबाबत स्वामीनाथन यांनी सांगितले आहे. “आम्ही १९६३ साली गव्हाचे कमी उंची असलेले वाण विकसित करण्यावर काम सुरू केले. विशेष म्हणजे पाच वर्षांच्या आत आम्हाला यात यश मिळाले. यालाच ‘गहू क्रांती’ म्हटले गेले. या यशाची दखल घेत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी विशेष टपाल तिकीट जारी केले होते,” असे स्वमीनाथन यांनी सांगितले.

हरितक्रांतीचे दुष्परिणाम काय?

हरितक्रांतीमुळे अन्नधान्याच्या बाबतीत भारत स्वावलंबी तर झालाच, मात्र याच संशोधनाचे काही दुष्परिणामही कालांतराने पुढे आले. भारताच्या ज्या भागात सधन शेतकरी होते, त्याच भागात दृष्टीने हरितक्रांतीच्या माध्यमातून संशोधन करण्यात आले, अशी टीका केली गेली. हरितक्रांतीच्या काही संभाव्य दुष्परिणामांवर स्वामीनाथन यांनी तेव्हाच सांगितले होते. जानेवारी १९६८ मध्ये वाराणसी येथे इंडियन सायन्स काँग्रेसला संबोधित करताना मातीच्या सुपिकतेचे संवर्धन न करता उच्च अत्पादकतेची क्षमता असलेली पिके घेणे, कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके यांचा अंधाधुंद वापर करणे, अशास्त्रीय पद्धतीने भूगर्भातील पाण्याचा वापर करणे, या समस्या त्यांनी बोलून दाखवल्या होत्या. या समस्या नंतर प्रत्यक्षात दिसू लागल्या.

१९८७ साली वर्ल्ड फूड प्राईज पुरस्काराने सन्मानित

स्वामीनाथन यांनी फक्त उच्च उत्पादकता असणारे वाण तयार करण्याचेच काम केले नाही. तर शेतमलाला मिळणारा भाव याबाबत त्यांचे वेगळे विचार होते. २००४-०६ या काळात ते शेतकरीविषयक राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष होते. यावेळी त्यांनी शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के अधिक किमान आधारभूत किंमत मिळावी, अशी भूमिका घेतली होती. कृषी क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांना १९८७ साली वर्ल्ड फूड प्राईज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी आज या जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांच्या कार्याचे महत्त्व कधीही कमी होणार नाही.