रोमचा राजा असलेल्या नीरोचं नाव भारतात अनेकदा उदाहरण देताना घेतलं जातं. त्याचं नाव घेतलं की लोक लगेच म्हणतात रोम जळत होतं आणि नीरो हा राजा Fiddle (सारंगी) वाजवत बसला होता. आळशी लोकांना हे उदाहरण अनेकदा दिलं जातं. रोम शहराला आग लागली तेव्हा राजा नीरो हा आपल्या महालात बसून सारंगी वाजवत समोर आग कशी लागली ते पाहात बसला होता असं म्हटलं जातं. रोमला खरंच आग लागली होती का? ही आग नीरोनेच लावली होती का? आणि तो खरोखरच बासरी वाजवत बसला होता का? हे प्रश्नही उपस्थित होतात. नीरो १६ व्या वर्षी गादीवर बसला होता आणि ३० व्या वर्षी त्याने कट्यार गळ्यावर चालवून आत्महत्या केली. रोमच्या अत्यंत कुप्रसिद्ध शासकांमध्ये नीरोची गणना होते.
रोमचा राजा नीरो हा अत्यंत सणकी स्वभावाचा होता
इसवी सन पूर्व ८ व्या शतकात रोमचं साम्राज्य उदयाला आलं आणि ते वाढू लागलं. रोमच्या सीमा पूर्वेकडे सीरियापर्यंत आणि उत्तरेकडे ब्रिटनपर्यंत पसरल्या. जगातल्या सर्वात शक्तीशाली आणि श्रीमंत राज्यांमध्ये रोमची गणना होऊ लागली. रोमबाबत हेदेखील म्हटलं जायचं की ते शहर माणसांनी नाही तर युद्धाच्या देवतांनी वसवलं आहे. युद्धकला असो किंवा सुंदर इमारतींची निर्मिती, तसंच नृत्य, संगीत यांसारख्या कलांमध्येही रोमचं नाव घेतलं जाऊ लागलं. या रोमचा राजा नीरो हा सणकी राजा म्हणून ओळखला जातो.
रोमचं सिंहासन नीरोला त्याच्या आईमुळे मिळालं
असं सांगितलं जातं की नीरोची आई एग्रिपपिनाने अनेक कट कारस्थानं रचून नीरोला सिंहासन मिळवून दिलं. नीरो राजा झाल्यापासून त्याची आई एग्रिपपिनाच त्याची मुख्य सल्लागार झाली होती. राजमहालात लहानाचा मोठा झालेल्या नीरोने राजा होईपर्यंत अनेक कट-कारस्थानं, अनेक गोष्टी, लबाड्या सगळं काही जवळून पाहिलं होतं. त्यामुळे तो वृत्तीने क्रूर झाला होता. दुसऱ्याला दुःख झालं की नीरोला आनंद होत असे असंही त्याच्याबद्दल म्हटलं जातं. याच क्रौर्यातून नीरोने आई एग्रिपपिनाचीही हत्या केली असाही आरोप त्याच्यावर केला जातो. आज तकने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
नीरोवर आईची हत्या केल्याचा आरोप
अनेक प्राचीन इतिहासकार असं सांगतात की नीरोनेच त्याच्या आईला ठार केलं. नीरोला गादीवर बसवण्यात त्याच्या आईचा सिंहाचा वाटा होता. मात्र गादीवर बसल्यानंतरच्या पाच वर्षातच तो आपल्या आईच्या पाताळयंत्री स्वभावाला आणि कट-कारस्थानांना वैतागला. तेव्हापासूनच त्याने आईची हत्या करण्यासाठी विविध योजना केल्या होत्या असं सांगितलं जातं. सुरूवातीला त्याचे प्रयत्न फसले. पण शेवटी एका जल्लादाला त्याने आईला मारण्यासाठी सांगितलं होतं. त्या जल्लादाने नीरोच्या आईला तलवार पोटात खुपसून मारलं. इतिहासकार हेदेखील सांगतात की रोमचं साम्राज्य आपल्याला मिळावं असं नीरोच्या आईला वाटू लागलं होतं. त्यामुळे तीदेखील खूप क्रूरपणे वागू लागली होती. तिने नीरोसोबतच शरीर संबंधही प्रस्थापित केले होते. आईच्या याच वर्तनाला वैतागून नीरोने तिची हत्या घडवून आणली. मात्र काही इतिहासकार नीरोने त्याच्या आईला ठार करवलं ही बाब चुकीची आहे असंही मानतात.
नीरोने त्याच्या दोन पत्नींनांही ठार केलं?
काही इतिहासकार असं सांगतात की नीरो इतका क्रूर आणि खुनशी झाला होता की त्याने त्याच्या दोन्ही पत्नींची हत्या केली. त्याच्या दुसऱ्या पत्नीचं नाव पोपिया असं होतं. तिची हत्या केल्यानंतर मात्र नीरो अस्वस्थ राहू लागला. तो महालात त्याला हवं तसं वागत असे पण रोमच्या प्रजेकडे तो लक्ष देऊ लागला होता. सर्कस सुरू करण्याचं श्रेय रोमला जातं ते नीरोमुळेच. तसंच गीत आणि संगीत हे नीरोला खूप आवडत असे.
रोम जळताना काय घडलं होतं?
रोमला जेव्हा आग लागली होती ती इतकी भीषण होती की ती आग नियंत्रणात आणण्यासाठी नऊ दिवस गेले होते. रोमन इतिहासकार टासिटसने लिहिल्यानुसार या घटनेमुळे रोममधले ५० टक्के रहिवासी बेघर झाले होते. तसंच आगीत शेकडो लोकांचा मृत्यू झाला. एवढंच नाही तर राजा नीरोच्या महालाचा एक भलामोठा भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. नीरोने तोपर्यंत मनमानी पद्धतीने राज्य चालवलं होतं. तो वाट्टेल तसे निर्णय घेऊ लागला होता. त्याच्या विरोधकांनी रोमला आग लागल्यानंतर ही बातमी पसरवली की ही आग नीरोनेच लावली आहे. राजा नीरोला आपल्या मनाप्रमाणे राज्याची निर्मिती करायची आहे आणि जुनी घरं तोडण्यासाठी त्याच्याकडे काही उपाय राहिलेला नाही. तसंच त्याला एक भव्य राजवाडा बांधायचा आहे. त्यामुळे त्याने ही आग लावली आहे अशी अफवा त्याच्या विरोधकांनी पसरवली. यानंतरच हे म्हटलं जाऊ लागलं की रोमला आग लागली तेव्हा नीरो सारंगी वाजवत आग बघत बसला होता. ही अफवा का पसरली असेल यावर काही इतिहासकार हे मत व्यक्त करतात की नीरोला राज्य करण्यात फारसा रस कधीही नव्हता. कला आणि संगीत हे त्याचे आवडते विषय होते. त्यामुळे अनेकदा त्याने अत्यंत चुकीचे आणि अतर्क्य वाटतील असे निर्णय घेतले.
दुसऱ्या आणि तिसऱ्या शतकातल्या रोमच्या इतिहासकारांनी काय सांगितलं?
नीरो सारंगी वाजवत बसला होता ही अफवा होती असं दुसऱ्या आणि तिसऱ्या शतकातले रोमचे इतिहासकार सांगतात. कारण त्या काळात बासरीसारखं कुठलंही वाद्य किमान रोममध्ये तरी नव्हतं. चितारा नावाचं एक तंतूवाद्य तेव्हा नीरोकडे होतं. नीरो ते वाजवत असे. तसंच हे इतिहासकार पुढे असं सांगतात की जेव्हा रोमला आग लागली तेव्हा नीरो रोममध्ये नव्हता. एंटिअम या ठिकाणी नीरो उपचार घेत होता. त्याला रोमला भयंकर आग लागल्याची माहिती जेव्हा मिळाली तेव्हा त्याने जळणाऱ्या रोमला वाचवण्यासाठी, आग नियंत्रणात आणण्यासाठी अनेक प्रय़त्न केले. तसंच बेघर लोकांसाठी त्याने आपल्या महालाचा एक भागही खुला केला होता. मात्र नीरोबाबत ही अफवा सोयीस्करपणे पसरवण्यात आली की रोम जळत असताना तो सारंगी वाजवत बसला होता.
अग्निकांडानंतर नीरोची आत्महत्या
नीरो हा अत्यंत क्रूर आणि सणकी राजा म्हणून ओळखला जात होता. नीरोबाबत अनेक अफवा, चर्चा त्या अग्निकांडानंतरही झाल्या. आधी तर होत होत्याच. अशात रोमच्या आगीला चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याच्याच मंत्र्यांनी नीरोला आव्हान दिलं. एवढंच नाही तर तो जिथे दिसेल तिथे त्याला ठार करा असेही आदेश दिले.ही गोष्ट समजल्यानंतर नीरोने सुरूवातीला पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला ही बाब लक्षात आली की पळून गेलो तरीही आपण वाचणार नाही त्यानंतर नीरोने आपल्या गळ्यावर कट्यार चालवली आणि आत्महत्या केली.
मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.