आयपीएलच्या धर्तीवर जगभरात सुरू झालेल्या ट्वेन्टी-२० लीगचा पसारा वाढतच चालला आहे. जवळपास प्रत्येक महिन्यात जगाच्या कानाकोपऱ्यात होत असलेल्या ट्वेन्टी२० लीगमुळे आता टेस्ट सीरिज खेळवायच्या कधी आणि कशा असा यक्षप्रश्न क्रिकेट बोर्डांना पडला आहे. काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडविरुद्धच्या दोन टेस्टसाठी संघ जाहीर झाला. दक्षिण आफ्रिकेचा एकही प्रमुख खेळाडू या मालिकेत खेळणार नाहीये. दक्षिण आफ्रिकेचा संघ पाहून अनेकांना धक्का बसला. पण लवकरच त्याचं कारण स्पष्ट झालं. दक्षिण आफ्रिकेसाठी टेस्ट क्रिकेट हे प्राधान्य राहिलेलं नाही असा सूर क्रिकेटवर्तुळात उमटला. अखेर क्रिकेट साऊथ आफ्रिकेला याप्रकरणी स्पष्टीकरण द्यावं लागलं. जगभरात नेमक्या किती ट्वेन्टी२० लीग आहेत आणि त्यांचा पसारा कसा वाढत चालला आहे ते समजून घेऊया.

आयपीएल (एप्रिल-मे)
२००८ मध्ये ललित मोदी यांनी मांडलेली इंडियन प्रीमिअर लीग ही संकल्पना प्रत्यक्षात साकारली. भारतासह जगभरातील खेळाडूंना पैसा, प्रसिद्धी मिळवून देणारं व्यासपीठ खुलं झालं. आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याची मोठीच संधी खेळाडूंना मिळाली. दरवर्षी एप्रिल-मे हे दोन महिने आयपीएलसाठी राखीव झाले. या दोन महिन्यात फक्त भारतीय नव्हे तर जगभरातले सगळे क्रिकेटपटू भारतात तळ ठोकून असतात. दोन महिने आयपीएल खेळून वर्षभराची पुंजी जमा होत असल्याने या स्पर्धेला सगळ्यांचं प्राधान्य आहे. या दोन महिन्यात बाकी संघ मोठी मालिका आयोजित करत नाहीत. आयसीसीतर्फेही या कालावधीत स्पर्धा आयोजित केली जात नाही. लिखित स्वरुपात नसलं तर हे दोन महिने आयपीएलसाठी मुक्रर केले जातात. टेलिव्हिजन राईट्स, जाहिराती यांच्या माध्यमातून कोटीच्या कोटी रुपयांची उलाढाल होते. आयपीएलला पहिल्या हंगामापासून चाहत्यांनी आपलंसं केलं. प्रत्येक संघाचा स्वतंत्र फॅनबेस आहे.

IPL 2024 CSK Themed Wedding Invitation Card Went Viral
IPL 2024: चेन्नईच्या चाहत्यांचा नाद खुळा! CSK ची थीम अन् आयपीएलच्या तिकीटासारखी लग्नपत्रिका होतेय व्हायरल
Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
Hardik Pandya Rohit Sharma
हार्दिकचे कर्णधारपद धोक्यात? क्रिकेटवर्तुळात चर्चा; माजी क्रिकेटपटूंमध्ये मतमतांतरे
Shikhar Dhawan and Shubman Gill
 IPL 2024, GT vs PBKS: पंजाबच्या फलंदाजांचा कस! आज गुजरात टायटन्सचे आव्हान; गिल, धवनकडे लक्ष

बिग बॅश- ऑस्ट्रेलिया (डिसेंबर-जानेवारी)
आयपीएलच्या यशातून प्रेरणा घेत सुरू झालेली ऑस्ट्रेलियातली स्पर्धा. चित्ताकर्षक रंगांच्या जर्सी, हेल्मेट, नवनवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, कॉमेंट्रीची अनोखी पद्धत या सगळ्यासाठी बिग बॅश स्पर्धा ओळखली जाते. ऑस्ट्रेलियातील प्रमुख शहरांचे संघ या स्पर्धेत खेळतात. भारतवगळता जगभरातले प्रमुख क्रिकेटपटू या स्पर्धेत खेळतात. ही स्पर्धा ऑस्ट्रेलियाची प्रमुख डोमेस्टिक ट्वेन्टी२० स्पर्धा असली तरी स्पर्धेवेळी ऑस्ट्रेलियाचा संघ खेळत असतो. पारंपरिक रचनेनुसार डिसेंबर मध्यापासून अनेक संघ ऑस्ट्रेलियाचा दौरा करतात. बॉक्सिंग डे टेस्ट, न्यू इयर टेस्ट यानंतर द्विपक्षीय मालिकाही असते. त्याचवेळी बिग बॅश स्पर्धेचे सामनेही सुरू असतात. त्यामुळे प्राधान्यक्रमाचा मुद्दा नेहमी उपस्थित होतो. आयपीएल स्पर्धेने भारतीय संघाला असंख्य खेळाडू दिले. दुर्देवाने बिग बॅश स्पर्धेद्वारे ऑस्ट्रेलियाला ठोस म्हणावा असे खेळाडू दिले नाहीत. या स्पर्धेत घडणाऱ्या अतरंगी गोष्टींचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. पण दर्जा आणि नव्या प्रतिभेचा शोध याबाबतीत ही स्पर्धा पिछाडीवरच राहिली आहे.

साऊथ आफ्रिका ट्वेन्टी२० (जानेवारी-फेब्रुवारी)
दक्षिण आफ्रिकेत डोमेस्टिक संघांमध्ये ट्वेन्टी२० स्पर्धा होत असे. २०१८ पासून त्यांनी प्रमुख शहरांचे संघ तयार करत फ्रँचाईज लीगला सुरुवात केली. तीन वर्ष ही स्पर्धा चालली. मात्र या लीगचा आर्थिक डोलारा डळमळीत होता. खेळाडूंना मानधन देण्यातही चालढकल झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. भारत सोडून बाकी देशातले खेळाडू लीगमध्ये सहभागी झाले मात्र लोकप्रियतेच्या बाबतीत स्पर्धा फार यशस्वी झाली नाही. कोरोना संकट आलं आणि लीगने मान टाकली. संघाचं मालकत्व घेण्यासाठी कॉर्पोरेट उद्योगपतींना गळ घालणं, टेलिव्हिजन राईट्ससाठी प्रयत्न करणं, जगभरातील जास्तीत जास्त खेळाडूंनी स्पर्धेत खेळावं यासाठी पुढाकार घेणं, मैदानावर अधिकाअधिक लोकांनी सामने पाहावेत यासाठी योजना राबवणं अशा सगळ्या पातळ्यांवर क्रिकेट साऊथ आफ्रिकेने कामं केलं. गेल्या वर्षी SA20 ही लीग सुरू झाली. योगायोग म्हणजे आयपीएल संघमालकांनीच पुढाकार घेत स्पर्धेतील सहाही संघ विकत घेतले. यातून आयपीएल स्पर्धेचा ब्रँड आणखी ठसला. सनरायझर्स इस्टर्न केप संघाने जेतेपदावर नाव कोरलं. बुधवारपासून या लीगच्या दुसऱ्या हंगामाला सुरुवात होत आहे. मात्र याच काळात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला न्यूझीलंडमध्ये खेळायचं आहे. या दौऱ्यासाठी दुय्यम दर्जाचा संघ निवडल्याने दक्षिण आफ्रिकेवर जोरदार टीका झाली. अखेरीस त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं. टेस्ट क्रिकेट हेच आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे. ट्वेन्टी२० लीग चार आठवडे चालते. न्यूझीलंडविरुद्धची मालिका पुढे किंवा आधी खेळवण्यासंदर्भात आम्ही चर्चा केली. मात्र दोन्ही संघांचं कॅलेंडर व्यग्र आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असल्याने खेळवणं अनिवार्य आहे. दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व करणं ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आता अपवादात्मक परिस्थिती आहे. ट्वेन्टी२० लीगमुळे अन्य मालिकांवर परिणाम होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ असं दक्षिण आफ्रिका बोर्डाने म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ या लीगचा कमिशनर आहे.

आयएल ट्वेन्टी२० (फेब्रुवारी)
युएई हा क्रिकेटविश्वातला अनुनभवी संघ असला तरी ट्वेन्टी२० लीगच्या आयोजनात त्यांनी बाजी मारली आहे. इंटरनॅशनल लीग अर्थात आयएल ट्वेन्टी२० या नावाने एमिरेट्स क्रिकेट बोर्डाने लीगची सुरुवात केली. स्पर्धेत सहा संघ असून, तीन संघांचे मालक आयपीएल संघचालकच आहेत. एकप्रकारे या स्पर्धेला मिनी आयपीएल म्हणता येईल. जगभरातले प्रमुख खेळाडू या लीगमध्ये खेळतात. सामने दुबई, शारजा आणि अबू धाबी इथे खेळवण्यात येतात. भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती असल्याने लीगमध्ये खेळण्यासाठी येणंजाणं सोपं आहे. पहिल्या हंगामात गल्फ जायंट्स संघाने जेतेपदावर नाव कोरलं होतं. नव्याने सुरू झालेली लीग असूनही सोशल मीडियावर स्पर्धेची चर्चा असते. भारतीय वेळेनुसार प्राईम टाईम स्लॉटमध्ये सामने दिसत असल्याने भारतात हे सामने पाहिले जातात.

कॅरेबियन प्रीमिअर लीग (ऑगस्ट-सप्टेंबर)
आयपीएलचं प्रारुप यशस्वी झाल्याने वेस्ट इंडिजच्या बहुतांश खेळाडूंनी फ्रीलान्स तत्वावर खेळण्याचा पर्याय अंगीकारला. वेस्ट इंडिज हा देश नाही. कॅरेबियन बेटांवरचे अनेक देशांचे खेळाडू वेस्ट इंडिजसाठी खेळतात. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड आणि खेळाडू यांच्यात ताळमेळ नाही. मानधनाच्या मुद्यावरून वाद सुरू आहे. बोर्डाची आर्थिक स्थिती फारशी बरी नाही. यामुळे वेस्ट इंडिजसाठी खेळणं हे खेळाडूंसाठी आर्थिकदृष्ट्या लाभदायक नाही. याची परिणती म्हणजे वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी जगभरात ट्वेन्टी२० लीग खेळायला प्राधान्य दिलं. महिना-दीड महिना खेळून चांगली कमाई होत असल्याने त्यांच्यासाठी ट्वेन्टी२० लीगमध्ये खेळणं फायदेशीर झालं. हे सगळं लक्षात घेऊन कॅरेबियन प्रीमिअर लीग सुरू झाली. भारत आणि वेस्ट इंडिज यांचे टाईमझोन निरनिराळे आहेत. वेस्ट इंडिजमध्ये डे-नाईट सामना भारतात अपरात्री प्रसारित होतो. त्यामुळे भारतात या स्पर्धेची लोकप्रियता मर्यादित आहे पण अन्य देशातले प्रमुख खेळाडू सीपीएलमध्ये खेळतात. या स्पर्धेत चांगली कामगिरी करणारे अनेक खेळाडू नंतर आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसतात. वेस्ट इंडिज बोर्डाने या लीगआधीही ट्वेन्टी२० स्पर्धा आयोजनाचे प्रयत्न केले. उद्योगपती अॅलन स्टॅनफोर्ड यांच्या संकल्पनेतून स्टॅनफोर्ड २०-२० स्पर्धा सुरू झाली पण या स्पर्धेचा आर्थिक डोलाराच कोसळला. कॅरेबियन ट्वेन्टी२० नावाने एक स्पर्धा सुरू झाली पण तीही बंद पडली. सीपीएल मात्र नियमितपणे सुरू आहे.

पाकिस्तान सुपर लीग (फेब्रुवारी-मार्च)
पाकिस्तानचे खेळाडू २००८ आयपीएल स्पर्धेत सहभागी झाले होते पण त्याचवर्षी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याचं पाकिस्तान कनेक्शन स्पष्ट झालं आणि पाकिस्तानच्या खेळाडूंचा भारतात खेळण्याचा मार्ग बंद झाला. पाकिस्तानचे खेळाडू आयपीएल स्पर्धेत खेळायला मिळत नसण्याविषयी खंत व्यक्त करतात. पाकिस्तानच्या खेळाडूंना व्यासपीठ मिळावं या विचारातून २०१६ मध्ये पीएसएल अर्थात पाकिस्तान सुपर लीग सुरू करण्यात आली. देशातील अस्थिर वातावरणामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही लीग युएईत खेळवण्यात आली. त्यानंतरचे दोन हंगाम पाकिस्तानमध्ये खेळवण्यात आले. पाकिस्तानच्या बरोबरीने अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू या लीगमध्ये खेळतात. स्पर्धेच्या माध्यमातून पाकिस्तानला अनेक गुणी खेळाडू मिळाले आहेत. सुरक्षा कारणांमुळे सुरुवातीला विदेशी खेळाडू पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी तयार नव्हते. वेस्ट इंडिजच्या डॅरेन सॅमीने याप्रकरणी पुढाकार घेतला. सॅमी पाकिस्तानमध्ये खेळला, तिथल्या चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं. पाकिस्तान सरकारने त्याला मानद नागरिकत्व दिलं आहे. या लीगचे सामने आशियाई उपखंडात मोठ्या प्रमाणावर पाहिले जातात.

लंका प्रीमिअर लीग (जुलै-ऑगस्ट)
बाकी देशांप्रमाणे श्रीलंकेनेही स्वत:ची लीग सुरू करण्याचा प्रयत्न केला. तो अयशस्वी झाला. २०२० मध्ये दुसरा प्रयत्न लंका प्रीमिअर लीगच्या रुपात सुरू झाला. तुलनेने छोटं स्वरुप असलं तरी बाकी देशातले प्रमुख खेळाडू या लीगमध्ये खेळतात. या स्पर्धेच्या माध्यमातून श्रीलंकेच्या खेळाडूंनी आपली चुणूक दाखवली आहे. श्रीलंकेच्या ट्वेन्टी२० संघाला या स्पर्धेने चांगले खेळाडू मिळवून दिले आहेत.

बांगलादेश प्रीमिअर लीग (जानेवारी-फेब्रुवारी)
वाद आणि आर्थिक सावळागोंधळ यामुळे बांगलादेश प्रीमिअर लीगचं नाव झाकोळलं जातं. पण आयपीएलमधून प्रेरणा घेत बांगलादेश क्रिकेट बोर्डाने २०१२ मध्येच या लीगची सुरुवात केली. बांगलादेशात क्रिकेट प्रचंड लोकप्रिय आहे. त्यामुळे लीगच्या सामन्यांना तुडुंब प्रतिसाद मिळतो. वाद नियमितपणे चर्चेत असले तरी जगभरातील ट्वेन्टी२० विशेषज्ञ खेळाडू या लीगमध्ये आवर्जून खेळतात. बांगलादेशमध्ये खेळपट्ट्या फिरकीला साथ देतात. लीगच्या माध्यमातून या खेळपट्यावर खेळण्याची संधी मिळते. राष्ट्रीय संघासाठी खेळताना हा अनुभव कामी येतो. कोमिला व्हिक्टोरिअन्स या संघाने चारवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. तमीम इक्बाल आणि शकीब उल हसन हे सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक विकेट्सचे मानकरी आहेत.

टी-ट्वेन्टी ब्लास्ट (मे ते जुलै)
ट्वेन्टी२० फॉरमॅटचा जन्मच मुळी इंग्लंडमधला. त्यामुळे फ्रँचाईज पद्धतीची पहिलीवहिली लीग ही इंग्लंडमध्येच २००३ मध्ये सुरू झाली. तब्बल १८ संघ स्पर्धेत खेळतात. इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेटमध्ये असंख्य विदेशी खेळाडू खेळतात. तीच परंपरा या स्पर्धेतही कायम आहे. भारतीय खेळाडूंचा अपवाद वगळता बाकी देशांचे खेळाडू या संघाचा अविभाज्य भाग आहेत. टेस्ट आणि वनडेची लोकप्रियता कमी होते आहे हे लक्षात आल्यानंतर इंग्लंडनेच हा प्रकार शोधून काढला. या प्रकारात अशी स्पर्धा खेळवण्याचं डोकंही त्यांचंच. त्यामुळे इंग्लंडच्या लीगला २० वर्ष होत आहेत. प्रायोजक बदलत असल्यामुळे स्पर्धेचं नाव बदलतं पण मूळ ढाचा कायम आहे. मे ते जुलै अशी प्रदीर्घ चालणारी स्पर्धा आहे. या काळात इंग्लंडच्या संघाचे सामनेही होत असतात. खेळाडू राष्ट्रीय संघाचं कर्तव्य निभावल्यानंतर या लीगमध्ये खेळतात. जगभर पाहिली जाणाऱ्या लीगमध्ये या स्पर्धेचं नाव घेतलं जातं.

हंड्रेड इंग्लंड (ऑगस्ट)
ट्वेन्टी२० प्रकारही वेळखाऊ वाटू लागल्याने इंग्लंडने हंड्रेड अर्थात १०० चेंडूंची स्पर्धा असा एक अतिवेगवान प्रकार विकसित केला आहे. ट्वेन्टी२० लीगप्रमाणे या स्पर्धेसाठी लिलावाद्वारे खेळाडूंची निवड होती. मानधन उत्तम असल्यामुळे जगभरातले खेळाडू त्यात खेळतात. तीन वर्ष ही स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करण्यात येत आहे.

ग्लोबल टी२० कॅनडा (जुलै-ऑगस्ट)
कॅनडात क्रिकेट म्हटलं की क्रिकेटरसिकांना टोरंटो आणि सौरव गांगुली आठवतो. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जात नसल्याने आणि पाकिस्तान भारतात येत नसल्याने ही मालिका कॅनडातल्या टोरंटो इथे खेळवण्यात आली. नव्वदच्या दशकात या सामन्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. कॅनडात स्थलांतरित भारतीयांची संख्या खूप आहे. या मालिकेत सौरव गांगुलीने बॅट आणि बॉल दोन्ही आघाड्यांवर दमदार प्रदर्शन केलं होतं. कॅनडाचा संघ लुटूपुटूचा असला तरी त्यांनी ट्वेन्टी२०लीगच्या आयोजनात आगेकूच केली आहे. सहा संघ स्पर्धेत खेळतात. करोनामुळे स्पर्धेच्या आयोजनात खंड पडला होता. पण गेल्या वर्षी ही स्पर्धा दिमाखात खेळवण्यात आली. ट्वेन्टी२० विशेषज्ञ अशी मंडळी या स्पर्धेत खेळताना दिसतात.

मेजर लीग क्रिकेट अमेरिका (जुलै)
आर्थिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेतही ट्वेन्टी२० लीगने पाय रोवले आहेत. गेल्या वर्षी पहिल्यांदाच स्पर्धेचा घाट घालण्यात आला. सहा संघांपैकी तीन संघांचे मालक आयपीएल संघचालकच आहेत. त्यामुळे आणखी एक मिनी आयपीएल स्पर्धा म्हणता येईल. स्पर्धेत अनेक मोठमोठे खेळाडू खेळल्यामुळे स्पर्धेला वलय प्राप्त झालं. टेक्सास आणि नॉर्थ कॅरोलिना या भागात सामने आयोजित करण्यात आले. अमेरिकेत भारतीयांची संख्या प्रचंड असल्याने स्पर्धेला चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. अमेरिका आणि भारत यांच्यात वेळेचं बरंच अंतर असल्याने सामने भारतात अपरात्री प्रसारित होतात. पहिला हंगाम यशस्वी झाल्याने नियमितपणे लीगचं आयोजन होईल अशी चिन्हं आहेत.

लीगमध्ये सगळे प्रमुख खेळाडू खेळणं हे प्रत्येक बोर्डासाठी इभ्रतीचा मुद्दा ठरतो. लीगच्या आक्रमणानंतर दोन टेस्टच्या सीरिज वाढल्या आहेत. याबरोबरीने चार दिवसीय टेस्टचं आयोजनही सुरू झालं आहे. लीग महिना-दीड महिना एवढाच काळ असली तरी विविध देशातील खेळाडू एकत्र येणं, त्यांच्यात समन्वय होणं यासाठी शिबीरं आयोजित केली जातात. काही लीग नियमित क्रिकेट न खेळणाऱ्या देशांमध्ये होत असल्याने तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी स्पर्धेच्या आधी आठवडाभर संघ पोहोचतात. तोही वेळ गृहित धरावा लागतो. टेस्ट सीरिजला अपेक्षित प्रेक्षक येतीलच याची खात्री नसते. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या देशांमध्ये टेस्ट मॅचेस पाहायलाही गर्दी होते पण बाकी देशात पाच दिवस रोज ८ तास प्रेक्षक असतीलच याची शाश्वती नाही.

आयपीएलविजेत्या संघाला २० कोटी रुपये बक्षीस रकमेने गौरवण्यात येतं. सर्वाधिक बक्षीस रक्कम देण्याचा मान आयपीएलकडेच आहे. नव्याने सुरू झालेल्या दक्षिण आफ्रिका ट्वेन्टी२० स्पर्धेच्या विजेत्या संघाला १५ कोटी रुपयांनी गौरवण्यात येतं. कॅरेबियन प्रीमिअर लीग विजेत्या संघाला ८.४ कोटी रुपयांनी गौरवण्यात येतं. आयपीएलच्या तुलनेत या लीगमध्ये विजेत्या संघांना मिळणारी रक्कम कमी असली तरी खेळाडूंना वैयक्तिक पातळीवर चांगलं मानधन मिळतं. दीड महिना खेळून वर्षभराची पुंजी होत असल्यामुळे अनेक खेळाडू या लीगना प्राधान्य देताना दिसत आहेत. न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी ग्रँडहोम, जेमी नीशाम या खेळाडूंनी बोर्डाने दिलेला वार्षिक करार स्वीकारला नाही. हा करार स्वीकारल्यास त्यांना न्यूझीलंडसाठी सगळ्या टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी२० खेळणं क्रमप्राप्त झालं असतं. एकदा करारबद्ध झाल्यानंतर न खेळण्याचा पर्याय त्यांच्याकडे नाही. करारातून बाहेर पडल्यामुळे हे खेळाडू जगभरात ट्वेन्टी२० लीग खेळण्यासाठी उपलब्ध आहे. जिथे चांगलं मानधन आहे, वातावरण चांगलं आहे त्या लीगमध्ये ते सहभागी होऊ शकतात. लीगसाठी ठराविक महिन्याची उपलब्धता दिल्यानंतर उर्वरित वेळ ते आपल्या कुटुंबीयांना देऊ शकतात. घर चालवण्यासाठी आवश्यक पैसे, सोयीसुविधा आणि मोजकंच खेळणं यामुळे वार्षिक करार न स्वीकारणाऱ्या खेळाडूंची संख्या वाढत चालली आहे.