अंतराळवीर जीन सर्नन आणि हॅरिसन श्मिट यांनी १९७२ साली तोरस लिट्रो व्हॅली (taurus-littrow valley) येथून ११०.५ किलोग्रॅम (२४३.६ पौंड) वजनाचे चंद्रावरील खडक आणि माती गोळा केली. त्यांनी एकूण ७४१ नमुने गोळा केले होते. यामध्ये प्रामुख्याने तीन प्रकारच्या खडकांचा समावेश होता – बसाल्ट, ब्रेशिया आणि क्रिस्टल खडक. अपोलो १७ ज्या ठिकाणी चंद्रावर उतरले होते, ते ठिकाण म्हणजे तोरस लिट्रो व्हॅली होय.
चंद्राचे वय किती ?
प्रस्तुत नमुन्यांवर केलेल्या संशोधनानंतर चंद्राचे वय ४० दशलक्ष वर्षांहून अधिक असल्याच्या निष्कर्षाप्रत संशोधक आता पोहोचले आहेत. सूर्यमालेच्या निर्मितीनंतर सुरुवातीच्या ११० दशलक्ष वर्षांमध्ये म्हणजेच सुमारे ४.४६ अब्ज वर्षांपूर्वी चंद्राची निर्मिती झाली असावी, असे हे संशोधन सांगते. प्रस्तुत नमुने हे तब्बल ५१ वर्षांपूर्वी गोळा करण्यात आलेले आहेत. त्याही वेळेस त्यांचा अभ्यास तत्कालीन संशोधकांनी केला होता. मात्र सध्या उपलब्ध असलेले अॅटोम प्रोब टोमोग्राफी तंत्रज्ञान त्यावेळेस अस्तित्वातच नव्हते. याखेपेस याच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. हे संशोधन अलीकडेच २३ ऑक्टोबर २०२३ रोजी ‘जिओकेमिकल पर्स्पेक्टिव्ह लेटर्स ‘ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले.
हेही वाचा : हमास-इस्रायल युद्ध: पॅलेस्टाईनच्या समर्थनासाठी समाजमाध्यमांवर ‘कलिंगड’ का वापरण्यात आले?
“जे नमुने ५० वर्षांपूर्वी गोळा केले होते त्याच्यावर अॅटोम प्रोब टोमोग्राफी तंत्रज्ञानाद्वारे संशोधन आता करण्यात येत आहे. त्याकाळात कदाचित शास्त्रज्ञांना याची कल्पनाही नसेल की, भविष्यात या नमुन्यांवर अशा प्रकारचे संशोधन केले जाईल. अॅटोम प्रोब टोमोग्राफी हे आधुनिक तंत्रज्ञान आहे,” असे ज्येष्ठ संशोधक फिलिप हेक यांनी ‘रॉयटर्स’ला सांगितले.
चंद्राचे वय कसे शोधले ?
चंद्राचे वय शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी १९७२ मध्ये आणलेल्या ‘७२२५५’ या नमुन्याच्या क्रिस्टल्सचे पुनर्विश्लेषण केले. यामधील झिरकॉनची निर्मिती ही तब्बल ४.२ अब्ज वर्षांपूर्वीची होती. झिरकॉन हे खनिज आतापर्यंत पृथ्वीवर आढळलेल्या सर्वाधिक जुन्या खनिजांपैकी एक आहे. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, या खनिजाच्या अस्तित्वातून पृथ्वीची निर्मिती आणि त्यावरील जीवसृष्टीबद्दलची अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकते.
नवीन संशोधन करताना शास्त्रज्ञांनी नॅनोस्केल स्पॅटिअल रिझोल्यूशन असलेल्या अॅटोम प्रोब टोमोग्राफी तंत्रज्ञानाचा वापर केला. त्याद्वारे त्यांनी नमुन्यांमधील शिशाच्या एकत्र येण्याच्या प्रक्रियेचा शोध घेतला. शिशाचे प्रमाण त्या नमुन्यात कशाप्रकारे विखुरलेले आहे, यावरून त्या खडकातील झिरकॉन किती जुने असावे, याचे मापन केले जाते.
झिरकॉन आणि चंद्राचे वय
शास्त्रज्ञांनी मांडलेल्या ‘जायंट इम्पॅक्ट हायपोथिसिस’ नुसार मंगळ ग्रहाच्या आकाराएवढी मोठी खगोलीय वस्तू पृथ्वीच्या निर्मितीच्या काळातच येऊन तिच्यावर आदळली. त्या महाआघातानंतर पृथ्वीच्या बाह्यभागातून जो मोठा तुकडा बाहेर पडला, त्यालाच आज आपण चंद्र म्हणून ओळखतो, असे सांगणारे हे गृहितक आहे. याच खगोलीय घटनांचे वर्णन संशोधकांनी लुनार मॅग्मा ओशन या सिद्धांतामध्ये केले आहे. चंद्राच्या या निर्मितीदरम्यानच चंद्राच्या पृष्ठभागावर सातत्याने अनेक खगोलीय गोष्टी येऊन आदळत गेल्या. त्यातूनच सध्या दिसत असलेल्या चंद्राच्या पृष्ठभागाची निर्मिती झाली आहे.
या आघातांच्या परिणामस्वरूप चंद्राच्या गाभ्यामध्ये बदल होत गेले आणि त्या बदलांचे रूप या वितळलेल्या झिरकॉनच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चंद्रावरून आणलेल्या ‘७२२५५’ या नमुन्यामधील क्रिस्टल्समध्ये झिरकॉनचा अंश आढळला. त्याचे मापन करूनच संशोधकांनी चंद्राचे वय निश्चित केले. कारण झिरकॉनमधील बदल तब्बल ४.४ अब्ज वर्षांपूर्वी झाल्याचे नोंदले गेले.
“नॅनोस्केल किंवा अॅटम स्केलच्या आधारे मोठे प्रश्न कसे सुटू शकतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे,” असे सहाय्यक संशोधिका जेनिका ग्रीर सांगतात.
पृथ्वीच्या तुलनेत चंद्राचे वय किती आहे?
पृथ्वी वय ४.५ ते ४.६ अब्ज वर्षे असल्याचा अंदाज आहे तर चंद्राचे वय ४.४६ अब्ज वर्षे आहे.