scorecardresearch

Premium

विश्लेषण: विदित, वैशाली ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेसाठी पात्र… भारतीय बुद्धिबळपटूंच्या यशाची जगभर चर्चा का होतेय?

आठ बुद्धिबळपटूंचा समावेश असलेली ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धा पुढील वर्षी एप्रिलमध्ये कॅनडा येथे रंगणार आहे.

Vidit Gujrathi R Vaishali qualified prestigious 'Candidates' chess competition
विदित, वैशाली ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेसाठी पात्र… भारतीय बुद्धिबळपटूंच्या यशाची जगभर चर्चा का होतेय? PHOTOS: FIDE/Anna Shtourman)

भारताच्या आर. वैशाली आणि विदित गुजराथी यांनी नुकत्याच झालेल्या ‘फिडे’ ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेत अनुक्रमे महिला आणि खुल्या विभागाचे विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा जिंकणारे ते भारताचे पहिले बुद्धिबळपटू ठरले. इतकेच नाही, तर या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर विदित आणि वैशाली प्रतिष्ठेच्या ‘कॅन्डिडेट्स’ म्हणजेच आव्हानवीरांच्या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. त्यांचे हे यश भारतीय बुद्धिबळाच्या दृष्टीने खूप मोठे आणि महत्त्वाचे आहे.

‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धा प्रतिष्ठेची का?

‘कॅन्डिडेट्स’ म्हणजेच आव्हानवीरांच्या स्पर्धेतील विजेत्या बुद्धिबळपटूला जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत सध्याच्या जगज्जेत्याला आव्हान देण्याची संधी मिळते. त्यामुळेच ही स्पर्धा प्रतिष्ठेची मानली जाते. आठ बुद्धिबळपटूंचा समावेश असलेली ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धा पुढील वर्षी एप्रिलमध्ये कॅनडा येथे रंगणार आहे. पाच वेळच्या जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनने विश्वचषक स्पर्धा जिंकत ‘कॅन्डिडेट्स’साठी पात्रता मिळवली होती. मात्र, जागतिक अजिंक्यपद लढत आणि त्यासाठी पात्रतेचे स्वरूप यावरून ‘फिडे’ म्हणजेच बुद्धिबळाच्या जागतिक संघटनेशी असलेल्या मतभेदांमुळे त्याने सलग दुसऱ्यांदा ‘कॅन्डिडेट्स’मध्ये खेळण्यास नकार दिला आहे.

navjot kaur
Navjyot kayr : मिस वर्ल्ड स्पर्धेत न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करणारी भारतीय वंशाची महिला आहे तरी कोण?
KL Rahul IPL 2024 Shoot Video Viral
VIDEO : ‘हे कोण लिहितंय…’, आयपीएल शूटमध्ये केएल राहुलचा संयम सुटला, स्क्रिप्टवरुन कर्मचाऱ्यावर संतापला
ITTF World Table Tennis Team Championship Updates
Paris Olympics : भारतीय टेबल टेनिस संघांनी रचला इतिहास, पॅरिस ऑलिम्पिकसाठी ठरले पात्र
aishwarya sheoran
मॉडलिंगची झगमगती दुनिया सोडली, फक्त दहा महिने केला अभ्यास, ऐश्वर्याने पहिल्याच प्रयत्नात मिळवला आयएएसचा मुकूट

‘कॅन्डिडेट्स’साठी खुल्या आणि महिला विभागात आतापर्यंत कोणाचे स्थान निश्चित?

या स्पर्धेसाठी आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेतील उपविजेता भारताचा आर. प्रज्ञानंद, इयान नेपोम्नियाशी (जागतिक लढतीतील गतउपविजेता), फॅबियानो कारूआना, निजात अबासोव, विदित आणि हिकारू नाकामुरा हे बुद्धिबळपटू खुल्या विभागातून पात्र ठरले आहेत. तसेच ‘फिडे’ सर्किटचा विजेता आणि जानेवारी २०२४ अखेरीस जागतिक क्रमवारीतील अव्वल बुद्धिबळपटूही या स्पर्धेसाठी पात्र ठरतील. महिलांमध्ये चीनची ली टिंगजी (जागतिक लढतीतील उपविजेती), कॅटरिना लायनो, अलेक्सांद्रा गोर्याचकिना, नुरगयुल सलिमोव्हा, ॲना मुझेचुक, वैशाली आणि टॅन झोन्गयी या बुद्धिबळपटूंनी ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले आहे. जानेवारी २०२४ अखेरीस जागतिक क्रमवारीत अव्वल असणारी बुद्धिबळपटूही या स्पर्धेत खेळेल.

विदित आणि वैशाली या स्पर्धेसाठी कसे पात्र ठरले?

‘फिडे’ ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेतील अव्वल दोन खेळाडू ‘कॅन्डिडेट्स’साठी पात्र ठरणार हे निश्चित होते. विदित आणि वैशाली यांनी आपापल्या विभागांत जेतेपद पटकावल्याने ते कॅन्डिडेट्स’साठी पात्र ठरले. विशेष म्हणजे दोघांनीही ८.५ गुणांसह अग्रस्थान पटकावले आणि ते दुसऱ्या स्थानावरील बुद्धिबळपटूपेक्षा अर्ध्या गुणाने पुढे राहिले.

विदितची कामगिरी का खास ठरली?

ग्रँड स्विस स्पर्धेत विदितची सुरुवात निराशाजनक ठरली होती. त्याला पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, त्यानंतर त्याने ज्या परिपक्वतेने खेळ केला, त्याने सर्वांनाच प्रभावित केले. पुढील सलग तीन फेऱ्यांमध्ये विजय नोंदवत त्याने गुणतालिकेत अग्रस्थान मिळवले. अखेरच्या फेरीपूर्वी विदित, आंद्रे एसिपेन्को आणि हिकारू नाकामुरा या तिघांचेही ७.५ गुण होते. मात्र, अखेरच्या फेरीत केवळ विदितला विजय मिळवता आला. विदितने अलेक्सांडर प्रेदकेवर ४७ चालींत मात केली.

हेही वाचा… विश्लेषण: केंद्र सरकारच्या चित्ता प्रकल्पाची सद्यःस्थिती काय? भविष्य काय?

विदितला भारतीय सहकारी अर्जुन एरिगेसी आणि जवळचा मित्र असलेल्या अनिश गिरीचीही मदत झाली. एरिगेसीने नाकामुराला बरोबरीत रोखले, तर गिरीने एसिपेन्कोला नमवले. त्यामुळे विदित विजेता ठरला. नाकामुराने दुसऱ्या स्थानासह ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेत प्रवेश मिळवला.

विदितने यापूर्वी कोणत्या स्पर्धांमध्ये चमक दाखवली आहे?

जागतिक क्रमवारीनुसार, गुकेश, विश्वनाथन आनंद आणि प्रज्ञानंद यांच्यानंतर विदित भारताचा चौथा सर्वोत्तम बुद्धिबळपटू आहे. कनिष्ठ स्तरावर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक मिळवणाऱ्या विदितने वरिष्ठ स्तरावरही आपला लौकिक वारंवार सिद्ध केला आहे. विदितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०२०च्या ‘फिडे’ ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावले होते. तसेच त्याने २०१९मध्ये बिल बुद्धिबळ स्पर्धा जिंकली होती. २०२१ आणि २०२३च्या विश्वचषक स्पर्धांमध्ये त्याने उपांत्यपूर्व फेरीचा पल्ला गाठला होता. आता त्याने ग्रँड स्विस स्पर्धा जिंकत आणि ‘कॅन्डिडेट्स’साठी पात्र ठरत कारकीर्दीतील सर्वांत मोठे यश मिळवले आहे.

केवळ प्रज्ञानंदची बहीण नव्हे, तर…

आर. वैशाली काही वर्षांपूर्वीपर्यंत आर. प्रज्ञानंदची बहीण म्हणून ओळखली जायची. मात्र, टप्प्याटप्प्याने तिने जागतिक पातळीवर आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. वैशालीने वयाच्या १२व्या वर्षी एका प्रदर्शनीय लढतीत मॅग्नस कार्लसनला पराभूत केले होते. २०१६मध्ये तिने महिला आंतरराष्ट्रीय मास्टर आणि २०१८मध्ये महिला ग्रँडमास्टर हे किताब मिळवले. २०२०मध्ये ऑनलाइन ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघात वैशालीचा समावेश होता. तिने २०२१मध्ये आंतरराष्ट्रीय मास्टर हा किताब मिळवला. २०२२मध्ये चेन्नई येथे झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्येही तिने चमक दाखवली होती. वैशालीने वैयक्तिक कांस्यपदक पटकावले, तसेच कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघातही तिचा समावेश होता. आता तिने ग्रँड स्विस स्पर्धा जिंकणारी पहिली महिला बुद्धिबळपटू होण्याचा मानही मिळवला आहे. तसेच २२ वर्षीय वैशाली ग्रँडमास्टर किताबापासूनही काही गुणच दूर आहे. त्यामुळे महिला विभागात वैशालीकडे भारतीय बुद्धिबळाचे भविष्य म्हणून पाहिले जात आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vidit gujrathi and r vaishali have qualified for the prestigious candidates chess competition print exp dvr

First published on: 13-11-2023 at 08:51 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×