भारताच्या तब्बल पाच बुद्धिबळपटूंनी प्रतिष्ठेच्या ‘कॅन्डिडेट्स’ म्हणजेच आव्हानवीरांच्या स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. भारताचे एकापेक्षा अधिक बुद्धिबळपटू या स्पर्धेत खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल. भारतीय बुद्धिबळासाठी हे खूप मोठे यश मानले जात आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून भारताच्या बुद्धिबळपटूंनी विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. आता ‘कॅन्डिडेट्स’मध्ये आपले वेगळेपण सिद्ध करण्याची या बुद्धिबळपटूंना संधी मिळणार आहे. या संधीचा कोण सर्वोत्तम उपयोग करू शकेल, तसेच ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेचे महत्त्व काय याचा आढावा.

‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेचे महत्त्व काय?

‘कॅन्डिडेट्स’ म्हणजेच आव्हानवीरांच्या स्पर्धेतील विजेत्या बुद्धिबळपटूला जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत सध्याच्या जगज्जेत्याला आव्हान देण्याची संधी मिळते. पुरुष आणि महिला विभागात प्रत्येकी आठ बुद्धिबळपटूंचा समावेश असलेली ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धा टोरंटो, कॅनडा येथे २ ते ५ एप्रिल या कालावधीत रंगणार आहे. सध्या पुरुषांमध्ये डिंग लिरेन आणि महिलांमध्ये जू वेन्जून हे चीनचे बुद्धिबळपटू जगज्जेते आहेत.

हेही वाचा : विश्लेषण : चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची ससेहोलपट का सुरू आहे? जिनपिंग सरकारची नाराजी का?

भारताचे कोणते बुद्धिबळपटू ‘कॅन्डिडेट्स’साठी पात्र ठरले आहेत?

पाच वेळच्या जगज्जेत्या विश्वनाथन आनंदने तीन दशकांहूनही अधिक काळ भारतीय बुद्धिबळाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. त्याच्यामुळे भारतीय बुद्धिबळाला वेगळी ओळख मिळाली. परंतु, त्याच्या व्यतिरिक्त भारताचा एकही बुद्धिबळपटू ‘कॅन्डिडेट्स’साठी पात्र ठरू शकला नव्हता. यंदा मात्र हे चित्र पूर्णपणे बदलले. आता पुरुष विभागात आर. प्रज्ञानंद, विदित गुजराथी आणि डी. गुकेश, तर महिलांमध्ये आर. वैशाली आणि कोनेरू हम्पी असे विक्रमी पाच भारतीय ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू ‘कॅन्डिडेट्स’साठी पात्र ठरले आहेत.

भारतीय बुद्धिबळपटूंनी ही पात्रता कशा प्रकारे मिळवली?

‘कॅन्डिडेट्स’साठी पात्र ठरण्याचे विविध निकष आहेत. यापैकी एक म्हणजे विश्वचषक स्पर्धेतील अव्वल तीन खेळाडूंमध्ये स्थान मिळवणे. भारताचा १८ वर्षीय प्रज्ञानंद गेल्या वर्षीच्या विश्वचषक स्पर्धेत उपविजेता ठरला होता. त्यामुळे यंदाच्या ‘कॅन्डिडेट्स’साठी पात्र ठरणारा भारताचा तो पहिला बुद्धिबळपटू होता. त्यानंतर विदित गुजराथी आणि प्रज्ञानंदची बहीण आर. वैशालीने ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेत प्रवेश मिळवला होता. या दोघांनी ग्रँड स्वीस स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याची किमया साधली होती. या स्पर्धेतील पुरुष व महिला विभागांमधील अव्वल दोन खेळाडू ‘कॅन्डिडेट्स’साठी पात्र ठरले.

हेही वाचा : खंडणीसाठी आता ‘सायबर किडनॅपिंग’, जाणून घ्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने कशी फसवणूक होते?

तसेच २०२३च्या ‘फिडे’ स्पर्धांच्या मालिकेत (फिडे सर्किट) सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या बुद्धिबळपटूलाही ‘कॅन्डिडेट्स’मध्ये स्थान मिळाले. ‘फिडे सर्किट’मध्ये फॅबियानो करुआनाने सर्वोत्तम कामगिरी केली, तर गुकेश दुसऱ्या स्थानी राहिला. मात्र, करुआनाने विश्वचषक स्पर्धेत तिसरे स्थान मिळवत ‘कॅन्डिडेट्स’मधील आपली जागा आधीच निश्चित केली होती. त्यामुळे ‘फिडे सर्किट’मध्ये दुसऱ्या स्थानी राहिलेल्या गुकेशलाही ‘कॅन्डिडेट्स’मध्ये प्रवेश मिळाला. अखेरीस अनुभवी कोनेरु हम्पी क्रमवारीच्या आधारे ‘कॅन्डिडेट्स’साठी पात्र ठरली. जानेवारी २०२४मध्ये क्रमवारीत अव्वल असणारी खेळाडू या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत स्थान मिळवणार असा निकष होता. अग्रस्थानी असलेल्या चार वेळच्या जगज्जेत्या हू यिफानने ‘कॅन्डिडेट्स’मध्ये खेळण्यास आधीच नकार दिला होता. त्यामुळे क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या हम्पीचा या स्पर्धेत खेळण्याचा मार्ग मोकळा झाला.

हेही वाचा : विश्लेषण : अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करते आहे?

‘कॅन्डिडेट्स’मध्ये विजयाची सर्वोत्तम संधी कोणाला?

प्रज्ञानंद (वय १८ वर्षे), गुकेश (१७ वर्षे) आणि वैशाली (२२ वर्षे) यांचे वय फारच कमी असून ‘कॅन्डिडेट्स’सारख्या स्पर्धेत दडपणाखाली आपला सर्वोत्तम खेळ करणे त्यांना अवघड जाऊ शकेल. अनुभवाच्या आधारे विदित (२९ वर्षे) आणि हम्पी (३७ वर्षे) हे भारतीय ‘कॅन्डिडेट्स’मध्ये सर्वोत्तम कामगिरी करू शकतील. विदितने गेल्या काही काळापासून आपल्या खेळात खूप सुधारणा केली आहे. तो अधिक योजनाबद्ध खेळ करू लागला आहे. तसेच पिछाडीवर असला तरी खेळ उंचावून पुनरागमनाची त्याच्यात क्षमता आहे. ‘कॅन्डिडेट्स’मध्ये अन्य आघाडीच्या खेळाडूंविरुद्ध खेळताना हे अत्यंत महत्त्वाचे ठरू शकेल. महिलांमध्ये हम्पी मोठे विजय मिळवण्याची क्षमता राखून आहे. पुरुषांमध्ये ज्या प्रकारे आनंदने भारतीय बुद्धिबळाची धुरा सांभाळली, त्याच प्रमाणे महिलांमध्ये हम्पीने अनेक वर्षे भारतासाठी सर्वोत्तम कामगिरी केली. मात्र, तिला ‘कॅन्डिडेट्स’मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी खूप वाट पाहावी लागली. आता मिळालेल्या संधी उपयोग करण्यासाठी ती उत्सुक असेल. तिची प्रगल्भता आणि दांडगा अनुभव लक्षात घेता ‘कॅन्डिडेट्स’मध्ये अन्य बुद्धिबळपटू तिला कमी लेखण्याची चूक नक्कीच करणार नाहीत.