अनिकेत साठे
कुंभनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक लोकसभा मतदारसंघात भगवे कपडे परिधान करणाऱ्या स्वामी शांतिगिरी महाराजांची अपक्ष उमेदवारी विविध कारणांनी चर्चेत आहे. धर्मरक्षणासाठी धर्मयोद्धा संघटनेची स्थापना करणाऱ्या महाराजांमुळे हिंदुत्ववादी मतांचे विभाजन अटळ मानले जाते. हे विभाजन टाळण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप नेत्यांनी मनधरणी केली, पण महाराजांनी निवडणूक लढण्याचा पवित्रा कायम ठेवला. हजारो भक्त परिवाराला सक्रिय प्रचारात उतरवित त्यांनी राजकीय पक्षांना आव्हान दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शांतिगिरी महाराज कोण आहेत?

त्र्यंबकेश्वर येथील जनार्दन स्वामी आश्रमात वास्तव्यास असणाऱ्या ६४ वर्षांच्या शांतिगिरी तथा मौनगिरी महाराजांचा समाजकार्य, धर्मकार्य व शेती हा व्यवसाय आहे. वेरूळला त्यांचा मुख्य मठ असून राज्यासह देशांत १२० हून अधिक मठ, आश्रम आहेत. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, जळगावसह इतर भागात जय बाबाजी नावाने त्यांचा मोठा भक्त परिवार आहे. बाल ब्रह्मचारी असणारे महाराज ४५ वर्षांपासून केवळ फळांचा आहार करतात. नऊ वर्षे त्यांनी अखंड मौनव्रत पाळले होते. पैशांना स्पर्श न करणे, महिलांना दुरुन दर्शन देणे याविषयी भक्त आवर्जून सांगतात. संत जनार्दन स्वामींच्या तत्त्वांचे पालन करीत समाजकार्य करणारे शांतिगिरी महाराज हे अनेक वर्षांपासून राजकारणाचे शुद्धीकरण मोहीम राबवत आहेत. धर्माच्या रक्षणासाठी धर्मयोद्धा संघटना तर, आरोग्य क्षेत्रातील गरजुंसाठी जनशांती सेवा समिती त्यांनी स्थापन केली आहे. व्यसनमुक्ती, वृक्षारोपण, गोमाता पालन असेही त्यांचे कार्य आहे.

हेही वाचा >>>विश्लेषण: महामार्गांच्या विकासाला यंदा ब्रेक?

उमेदवारीला महत्त्व का?

शांतिगिरी महाराज २००९ मध्ये औरंगाबाद लोकसभा मतदार संघात रिंगणात उतरले होते. पराभव स्वीकारावा लागला तरी दीड लाख मते त्यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांचे लक्ष नाशिक या सर्वाधिक भक्त परिवार असणाऱ्या मतदार संघाकडे गेले. २०१४ आणि २०१९ या लोकसभा निवडणुकीत नाशिकमधून ते इच्छुक होते. मात्र, शिवसेना-भाजप नेत्यांच्या मनधरणीमुळे त्यांनी माघार घेऊन युतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. यावेळी महायुतीकडून उमेदवारी मिळावी, म्हणून ते प्रयत्नशील होते. मुख्यमंत्र्यांपासून ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांनी पाठपुरावाही केला होता. वादाच्या भोवऱ्यात सापडलेली नाशिकची जागा महायुतीतील कुठल्याही पक्षाला मिळाली तरी त्या पक्षाकडून अर्ज भरण्याची त्यांची तयारी होती. परंतु तसे झाले नाही. शिवसेना शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना तिकीट दिले. निवडणूक लढवायचीच, या इर्ष्येने महाराज अपक्ष म्हणून मैदानात उतरले. त्यांचा स्थानिक पातळीवरील भक्त परिवार हा राजकीय पक्षांच्या चिंतेचा विषय आहे. धार्मिक मुद्यांवरील प्रचाराने मत विभाजनाची शक्यता बळावली आहे.

दावे धास्तीचे कारण का ठरले?

२०१४ पासून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आपला भक्त परिवार प्रचारात उतरल्याने युतीला नाशिक, दिंडोरी, धुळे, जळगाव, जालना, शिर्डी या मतदार संघात यश मिळाल्याचा दावा शांतिगिरी महाराज करतात. मागील दोन्ही निवडणुकीत भक्त परिवार घरची भाकरी बांधून प्रचारात सक्रिय राहिला. नाशिक लोकसभेत भक्तांच्या योगदानामुळे गोडसे दुसऱ्यांदा निवडून आल्याचा दावा त्यांच्याकडून केला जातो. ही बाब महायुतीत धास्ती वाढविणारी ठरली. मत विभाजन होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, भाजपचे नेते गिरीश महाजन आदींनी प्रयत्न केले. अयोध्येतील राममंदिराप्रमाणे हनुमान जन्मस्थळावर हनुमान मंदिराची उभारणी, आगामी कुंभमेळ्याचे नियोजन, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचा विकास, गोदावरी स्वच्छता, अनुष्ठानाच्या माध्यमातून तरुणाईची व्यसनमुक्ती हे मुद्दे महाराज प्रचारात मांडत आहेत.

हेही वाचा >>>१९८० ची लोकसभा निवडणूक: जनता पार्टीचा अस्त, भाजपाचा उदय आणि इंदिरा गांधींचा मृत्यू

प्रचारतंत्र वेगळे का ठरते?

उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते घरोघरी जाऊन, समाज माध्यमापर्यंत महाराजांचे प्रचाराचे नियोजन प्रतिस्पर्धी उमेदवार व राजकीय पक्षांपेक्षाही वेगळे ठरत आहे. निवडणूक काळात कुठल्याही कार्यक्रमात गर्दी जमविताना राजकीय पक्ष, पदाधिकाऱ्यांची दमछाक होते. याउलट महाराजांची स्थिती आहे. त्यांचा अर्ज भरण्यासाठी राज्यातून हजारो भक्त लोटले होते. राजकीय पक्षांपेक्षा भव्य प्रचार फेरी काढत त्यांनी अर्ज दाखल केला. भक्त परिवाराच्या बळावर सायकल व दुचाकी फेरी, पदयात्रा, घरोघरी गाठीभेटी असा त्यांचा प्रचार सुरू आहे. सर्व भक्त स्वखर्चाने प्रचारात योगदान देतात. परजिल्ह्यांतील भक्त परिवार नाशिकमधील आपले नातेवाईक, मित्र परिवार शोधून भेटीगाठी घेत आहेत. भक्तांनी ‘शांतीदूत’ नावाने व्हॉट्सॲपवर हजारो गट बनवत नातेवाईक-मित्रांमध्ये प्रचार चालविला आहे. राजकीय नेत्यांमागे नसेल इतके अनुयायी अपक्ष उमेदवाराच्या प्रचारात उतरले आहेत.

महाराजांची श्रीमंती किती?

आश्रमात कुटीत निवास करणाऱ्या शांतिगिरी महाराजांकडे तब्बल ३९ कोटींची संपत्ती आहे. वाहने व स्थावर मालमत्तेत त्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक आणि रत्नागिरी या भागात अर्धा एकर ते ११ एकरपर्यंत जमिनी आहेत. त्यांच्याकडील जमीन, भूखंडांचे आजचे बाजारमूल्य ३८ कोटी ८१ लाख आहे. त्यांच्याकडे सफारी, टाटा टेम्पो, मालवाहू, हायवा (डंपर), टीयुव्ही, टाटा ४०७, शालेय वाहतूक करणाऱ्या बस अशी तब्बल ६७ लाखांची नऊ वाहने आहेत. महाराजांचे वार्षिक उत्पन्न एक लाख ६२ हजाराच्या आसपास आहे. जंगम मालमत्ता ७१ लाख ६८ हजार रुपयांची असून यात कुठलेही दागिने व जडजवाहीर नाहीत. आजवर त्यांनी ७० लाख ३५ हजारांची स्थावर मालमत्ता स्वत: खरेदी केली आहे. 

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is shantigiri maharaj why is his candidature in nashik becoming troublesome for mahayutti print exp amy
First published on: 10-05-2024 at 07:50 IST