नोकरीनिमित्त एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झाल्यास वाहन मालकांना त्यांच्या वाहनाचा पूर्वीचा वाहन नोंदणी क्रमांक बदलून नव्या क्रमाकांची नोंदणी करावी लागत होती. सततच्या बदलीची नोकरी असल्यास वारंवार पुनर्नोंदणीचा व्याप आणि खर्च होत होता. त्यासाठी वाहनांच्या नोंदणीसाठी ‘बीएच’ मालिका सुरू केली. महाराष्ट्रातील सर्व आरटीओ कार्यालयात ‘बीएच’ वाहन क्रमांक नोंदणी होते. मात्र, राज्यातील इतर आरटीओ कार्यालयांच्या तुलनेत पुण्यात सर्वाधिक ‘बीएच’ मालिका वाहन क्रमांकाची नोंदणी झाल्याचे दिसून येते. राज्यातील एकूण ‘बीएच’ वाहन क्रमांक नोंदणीच्या ४१ टक्के नोंदणी ही पुणे (एमएच – १२), पिंपरी-चिंचवड (एमएच – १४) असलेल्या पुण्यातच का होत आहे, याबाबत जाणून घेऊयात…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बीएच’ म्हणजे काय?

महाराष्ट्रातील आरटीओमध्ये नोंदणी झालेल्या वाहनाचा क्रमांक ‘एमएच’ ने सुरू झालेला दिसून येतो. त्यामुळे आपल्याला बहुसंख्य वाहने ही ‘एमएच’ क्रमांकाने सुरू झालेली दिसतात. तसेच काही वेळा ‘जीजे’ गुजरात, ‘केए’ कर्नाटक, ‘एचआर’ हरियाणा, ‘आरजे’ राजस्थान आणि पुढे क्रमांक अशा वाहनांच्या क्रमांक पाट्या दिसतात. गेल्या काही वर्षांपासून २१ ‘बीएच’, २२ ‘बीएच’, २३ ‘बीएच’ अशा क्रमांकाची वाहने दिसू लागली आहेत. ‘बीएच’ म्हणजे भारत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ऑगस्ट २०२१ मध्ये वाहनांच्या नोंदणीसाठी ‘बीएच’ (भारत) मालिका नोंदणी सुरू केली. महाराष्ट्रात सप्टेंबर २०२१ रोजी या नव्या मालिकेची सुरुवात झाली. कोणत्याही एका राज्याशी हा क्रमांक मालिका जोडलेली नसून या क्रमांकाची वाहन नोंदणी संपूर्ण देशासाठी एकच आहे. बीएच मालिकेचा वाहन क्रमांक असल्याने वाहनमालकाला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झाल्यानंतरही नव्या नोंदणी क्रमांकाची आवश्यकता भासत नाही.

आणखी वाचा-विश्लेषण : गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक कशी होते? व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप, टेलिग्राम संदेशांपासून सावध कसे राहावे?

२१ ‘बीएच’, २२ ‘बीएच’, २३ ‘बीएच’ म्हणजे काय ?

सामान्यत: वाहन क्रमांकाची सुरुवात ही इंग्रजी वर्णापासून होते. हे इंग्रजी वर्ण राज्याच्या नावातील किंवा राज्याच्या नावाचे संक्षिप्त रूप भासावे असे असतात. मात्र, ‘बीएच’ मालिकेची सुरुवात ही इंग्रजी आद्याक्षरांपासून नाही तर संख्येपासून होते. ‘बीएच’ मालिकेत २१,२२,२३ असे क्रमांक सुरुवातीला असून त्यानंतर ‘बीएच’ लिहलेले असते. ‘बीएच’ वाहन क्रमाकांची नोंदणी ही २०२१ सालापासून सुरू झाली. त्यामुळे २१ ही संख्या वाहनांच्या नोंदणीचे साल दर्शवते. त्यानुसार २०२२ म्हणजे २२, २०२३ म्हणजे २३ आणि आता २०२४ सालात नोंदणी झालेल्या वाहनाचा क्रमांक २४ ‘बीएच’ असा दिसतो. त्यानंतर पुढे यादृच्छिकपणे संगणकाने निवडलेला चार अंकी क्रमांक व त्यापुढे ए ते झेडमधील दोन वर्ण असतात.

‘बीएच’ वाहन क्रमांक कोण खरेदी करू शकतो ?

सर्वसामान्यपणे कोणालाही ‘बीएच’ वाहन क्रमांक खरेदी करता येत नाही. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनाही याचा लाभ घेता येत नाही. केंद्र – राज्य सरकारी कर्मचारी, संरक्षण क्षेत्रातील कर्मचारी, बँक कर्मचारी, प्रशासकीय सेवा कर्मचारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचारी ‘बीएच’ वाहन क्रमांक खरेदी करून त्याचा वापर करू शकतात. चारपेक्षा अधिक राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात कंपनी असलेल्या खासगी कर्मचाऱ्यांना ‘बीएच’ वाहन क्रमांक मिळू शकतो.

सर्वात प्रथम महाराष्ट्रात कुठे?

राज्यात सप्टेंबर २०२१ मध्ये ‘बीएच’ मालिकेच्या वाहन क्रमांकाची नोंद करण्यास सुरुवात झाली. राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांमध्ये सर्वात प्रथम वडाळा आरटीओ कार्यालयात ‘बीएच’ मालिकेच्या वाहनाचा क्रमांक नोंदवला होता. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरात ‘बीएच’ वाहन नोंदणी वेगात सुरू झाली. राज्यातील ५० आरटीओ कार्यालयात सप्टेंबर २०२१ पासून ते आतापर्यंत ५२,९५० वाहनांची नोंदणी झाली आहे.

आणखी वाचा-विश्लेषण : साखर उद्योगावर पुन्हा एकदा महाराष्ट्राची मक्तेदारी?

पुणे आणि मुंबईत किती टक्के वाटा?

सर्वाधिक पुण्यात (एमएच-१२) १२,४२१ वाहनांची नोंदणी ही ‘बीएच’ मालिकेनुसार झाली आहे. त्याखालोखाल पिंपरी-चिंचवड (एमएच-१४) मध्ये ९,४२६ वाहनांची नोंदणी झाली आहे. बारामती (एमएच-४२) मध्ये २२२ वाहनधारकांनी ‘बीएच’ मालिकेचा क्रमांक खरेदी केला. त्यामुळे पुण्यात एकूण २२,०६९ वाहनधारकांनी ‘बीएच’ मालिकेचा क्रमांक खरेदी केला असून एकूण ‘बीएच’ क्रमांक खरेदीच्या ४१ टक्के वाटा पुण्याचा आहे. त्या खालोखाल मुंबईतील चार आरटीओ कार्यालयात मिळून १०,७१० वाहनधारकांनी ‘बीएच’ क्रमांक खरेदी केला आहे. त्यामुळे एकूण खरेदीच्या २० टक्के वाटा मुंबईचा आहे. यामध्ये वडाळा (एमएच-३) मध्ये ३,६७३, मुंबई सेंट्रल (एमएच-१)मध्ये २,८१६, बोरिवली (एमएच-४७) २,२५७, अंधेरी (एमएच-२) १,९६४ वाहनांची नोंदणी झाली आहे.

पुण्यात खरेदीची संख्या सर्वाधिक का?

राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुण्यात सर्वाधिक संरक्षण क्षेत्रातील निवृत्त कर्मचारी राहतात. यासह पुण्यात संरक्षण संबंधातील अनेक विभागात आहेत. यात लष्कराचे दक्षिण मुख्यालय (सदर्न कमांड), लष्करी रुग्णालय, आयएनएस शिवाजी, इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी यांचा समावेश आहे. संरक्षण विभागातील कर्मचाऱ्यांकडून सर्वाधिक ‘बीएच’ मालिका क्रमांक खरेदी केला जातो. तसेच पुण्यात केंद्र सरकारची कार्यालये, राष्ट्रीय संस्थाही मोठ्या प्रमाणावर आहेत. यांसह नव्याने तयार झालेले आयटी पार्क, देशभरात पसरलेल्या उद्योग क्षेत्रातील, बॅंकेतील कार्यालये ही पुण्यात आहेत. त्यामुळे ‘बीएच’ वाहन क्रमांक मिळणारे निवडक विभागातील कर्मचारी पुण्यात असून त्यांचे इतर राज्यात स्थलांतर देखील अधिक होते. त्यामुळे राज्यात पुण्यात ‘बीएच’ वाहन क्रमांक खरेदीची संख्या सर्वाधिक आहे.

आणखी वाचा-अतिरिक्त साखर लहान मुलांसाठी किती धोकादायक? ‘हेल्दी ड्रिंक्स’ म्हणून जाहिरात करण्यास केंद्र सरकारने का केली मनाई?

गैरवापर होतो का?

‘बीएच’ वाहन क्रमांक खरेदीस सुरुवात झाल्यानंतर, त्याच्या अटी व नियमांमधून पळवाटा शोधून अनेक खासगी संस्था, क्षेत्रातील कर्मचारी आवश्यकता नसताना, इतर राज्यात वास्तव्य नसताना, ‘बीएच’ वाहन क्रमांक खरेदी करण्यास सुरुवात केली. या क्रमांक मालिकेचा गैरवापर होऊ लागल्याने फेब्रुवारी २०२४ मध्ये पुन्हा नव्याने ‘बीएच’ वाहन क्रमांक खरेदीसाठी नवीन परिपत्रक काढण्यात आले. त्यानुसार भारतातील विविध राज्यांमध्ये कार्यालये असल्याचा दावा करणाऱ्या वाहनधारकांकडे त्यांच्या मागील कार्यकाळातील विविध राज्यातील वास्तव्याचा दाखला, मागील कार्यकाळातील वेतन देयके सादर करण्याची सूचना देण्यात आली. वाहनधारक सद्यःस्थितीत कार्यरत असलेल्या विभागात, कंपनीत तो यापूर्वी इतर राज्यात कार्यरत होता का याची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. खातरजमा झाल्यावरच वाहन ‘बीएच’ मालिका नोंदणीसाठी ग्राह्य धरले जाते.

संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांना कोणती सूट?

‘बीएच’ मालिकेचा लाभ प्रति व्यक्ती फक्त एक वाहनासाठीच देण्यात येतो. ‘बीएच’ मालिका नोंदणी करणाऱ्या वाहनधारकास वाहन खरेदी करताना, स्वतःच्या बँक खात्यातून पैसे वळते करून खरेदी केले आहे किंवा कर्जाद्वारे वाहन खरेदी केले असल्यास त्या माहितीचा पुरावा तपासला जातो. संबंधित माहिती नसल्यास वाहनधारकाला ‘बीएच’ मालिकेचा क्रमांक मिळत नाही. वाहनधारकांचे बँक खात्याची विवरण पत्रे तपासली जातात. मात्र भारतीय संरक्षण दलातील वाहनधारकांच्या वाहनांची ‘बीएच’ मालिकेत नोंदणी करताना त्यांचे फक्त संरक्षण दलाचे ओळखपत्र घेतले जाते. त्यांच्याकडे इतर कागदपत्रांची मागणी केली जात नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why buy most bh series vehicle number in pune who can get this number print exp mrj