अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणांच्या चलचित्र तुकड्यांची अनैतिक जुळणी करून प्रेक्षकांची दिशाभूल केल्याबद्दल बीबीसी वृत्तवाहिनीने नुकतीच जाहीर माफी मागितली. या वाहिनीच्या दोन उच्चपदस्थांनी राजीनामाही दिला. याविषयी…
प्रकरण नेमके काय?
बीबीसी वाहिनीने २८ ऑक्टोबर २०२४ रोजी ‘पॅनोरमा’ या त्यांच्या बहुपरिचित वृत्त विश्लेषण कार्यक्रमात ‘ट्रम्प : अ सेकंड चान्स?’ हा वृत्तपट प्रक्षेपित केला. यात ट्रम्प यांनी ६ जानेवारी २०२१ रोजी त्यांच्या समर्थकांना कॅपिटॉल हिल येथील अमेरिकी कायदेमंडळाच्या (काँग्रेस) इमारतीवर चाल करून जाण्यास सांगितल्याचे दाखवले गेले. पण यासाठी ट्रम्प यांनी वेगवेगळ्या वेळी, वेगळ्या संदर्भात केलेल्या दोन भाषणतुकड्यांची अनैतिकरीत्या संकलित जुळणी केल्याचे गेल्या महिन्यात ‘द टेलिग्राफ’ वृत्तपत्राने उघडकीस आणले. यासाठी या वृत्तपत्राने बीबीसीचे सल्लागार मायकेल प्रेस्कॉट यांच्या एका अंतर्गत ई मेलचा दाखला दिला.
ट्रम्प काय म्हणाले? काय दाखवले गेले?
ट्रम्प यांनी ६ जानेवारी २०२१ रोजी वॉशिंग्टन येथे केलेल्या भाषणात ‘आम्ही कॅपिटॉलपर्यंत चालत जाऊ. तेथे आमच्या निर्भीड सेनेटरांचा आणि काँग्रेस सदस्यांचा जयघोष करू’ असे म्हटले होते. पण ‘पॅनोरमा’मध्ये प्रसृत चलचित्रफितीमध्ये ट्रम्प ‘आम्ही कॅपिटॉलपर्यंत चालत जाऊ… आणि तेथे मी तुमच्या सोबत असेन. आणि आपण लढू. आरपारची लढाई लढू’ असे सांगत असल्याचे दाखवले गेले. वास्तविक भाषणातील ‘…चालत जाऊ’ आणि ‘…लढाई लढू’ या दोन विधानांमध्ये ५० मिनिटांचे अंतर होते. ‘आरपारची लढाई लढू’ हे वाक्य ट्रम्प यांनी अमेरिकी निवडणुकांतील कथित भ्रष्टाचार दर्शवण्यासाठी उच्चारले होते. पण ते संदर्भ बदलून दाखवले गेले.
बीबीसीने चूक कधी मान्य केली?
बीबीसीचे सल्लागार मायकेल प्रेस्कॉट यांनी त्यांच्या ई मेलमध्ये काही प्रश्न उपस्थित केले. अशा प्रकारे फेरफार करून वृत्तांकन केले जात असेल तर बीबीसीवर विश्वास कसा राहील, आणि हे कधीपर्यंत चालणार असे प्रेस्कॉट यांनी विचारले होते. याविषयी संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता या प्रकारात तडजोड झाल्याचा त्यांनी इन्कार केला, असेही प्रेस्कॉट नोंदवतात. या ई मेलचा बभ्रा झाल्यानंतर मात्र बीबीसी आणि ब्रिटनमध्ये खळबळ उडाली. बीबीसीचे व्यवस्थापकीय संचालक टिम डेव्ही आणि वृत्तविभाग प्रमुख डेबोरा टर्नेस यांनी राजीनामे दिले. अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीच्या काही दिवस आधीच वृत्तपट सादर केल्यामुळे बीबीसीच्या हेतूंविषयी शंका उपस्थित झाल्या. विशेष म्हणजे या वर्षी जानेवारी आणि मे महिन्यात या वृत्तपटातील फेरफारीच्या तक्रारींवर बीबीसीच्या मानक समितीच्या बैठकीत चर्चा झाली होती. ‘आम्ही त्याच वेळी काहीतरी कारवाई करायला हवी होती,’ अशी कबुली बीबीसीचे अध्यक्ष समीर शहा यांनी १० नोव्हेंबर रोजी दिली. आम्ही ही चूक कबूल करतो आणि त्याबद्दल माफी मागतो, असे समीर शहा यांनी जाहीर केले. संबंधित वृत्तपट ‘पॅनोरमा’च्या संकेतस्थळावरून काढून टाकण्यात आला.
ट्रम्प यांची प्रतिक्रिया काय?
‘मी केलेल्या अत्यंत नेमक्या भाषणात फेरफार केल्याबद्दल बीबीसीच्या बड्या मंडळींना राजीनामे द्यावे लागले’ असे ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधील एका पत्रकार बैठकीत सांगितले. ट्रम्प अर्थातच एवढ्यावर थांबणार नव्हते. त्यांच्या वकिलांनी बीबीसीला रीतसर नोटीस पाठवली. वृत्तपट मागे घ्यावा, माफी मागावी आणि बदनामी केल्याबद्दल ट्रम्प यांना भरपाई द्यावी अशी त्यांची मागणी होती. नोटिशीला उत्तर देण्यासाठी बीबीसीला १४ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली. मागण्या मान्य न केल्यास बीबीसीवर किमान एक अब्ज डॉलरचा नुकसान भरपाई दावा दाखल केला जाईल, असे ट्रम्प यांच्या वकिलांनी जाहीर केले.
नोटिशीवर बीबीसीची प्रतिक्रिया काय?
मुदत संपण्याच्या आदल्या रात्री बीबीसीने ट्रम्प यांची जाहीर माफी मागितली. याशिवाय बीबीसीचे अध्यक्ष समीर शहा यांनी व्हाईट हाऊस आणि खुद्द ट्रम्प यांच्याशी व्यक्तिशः पत्रव्यवहार करून त्यांची माफी मागितली. पण नुकसान भरपाई देणार नसल्याचेही सांगितले. यासाठी पाच मुद्दे उपस्थित केले – १. पॅनोरमा कार्यक्रम अमेरिकेत प्रसारित करण्याचे हक्क बीबीसीकडे नाहीत, हा कार्यक्रम ब्रिटनमध्येच प्रसारित होणे अपेक्षित होते. २. वृत्तपटातून ट्रम्प यांचे नुकसान झाले असे म्हणता येत नाही, कारण ते निवडून आले. ३. चित्रफितीची लांबी कमी करण्यासाठी ती संकलित केली गेली, यामागे कोणताही दूषित हेतू नव्हता. ४. वृत्तपट एक तासाचा होता, त्यात १२ सेकंदांची भाषणाची चित्रफीत दाखवणे हाच हेतू नव्हता. ५. सार्वजनिक हिताच्या बाबीवर मतप्रदर्शन करणे आणि राजकीय भाष्य करणे यांना अमेरिकेच्या बदनामीविषयक कायद्यात भक्कम संरक्षण आहे. त्यामुळे माफी मागितली, तरी नुकसान भरपाईचे दायित्व आपल्यावर येत नाही असे बीबीसीकडून स्पष्ट करण्यात आले.
siddharth.khandekar@expressindia.com
