‘वीकेण्ड’ म्हटलं की, जगातील सर्व व्यक्तींना शनिवार आणि रविवारच आठवतात. कारण, जगामध्ये आठवड्यातील वारांची रचना समान आहे. मग, प्रश्न पडतो की, हे वार कोणी ठरवले? यांची क्रमवार रचना कोणी केली ? आठवड्यात सात वारच का असतात…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राचीन आठवड्याची रचना

प्राचीन काळात सात दिवसांचा आठवडा अशी पद्धत नव्हती. तिथीनुसार कामांची विभागणी होत असे. आज आपला वीकेण्ड शनिवार-रविवार असतो, तसा त्या काळात चतुर्दशीची संध्याकाळ आणि पौर्णिमा/ अमावास्या हा सुट्टीचा काळ होता. म्हणजे १५ दिवसांच्या अंतराने सुट्टी असे. प्राचीन काळी निरनिराळ्या देशांत आठवड्याचा कालावधी निरनिराळा असे, पण हा कालावधी महिन्यापेक्षा लहान होता हे निश्‍चित. भारतात प्राचीन काळी निरनिराळे यज्ञ होत असत. त्यांची सुरुवात उत्तरायणाबरोबर (सूर्य मकरवृत्तापासून उत्तरेकडे जाण्याच्या प्रारंभाबरोबर) होत असे. सुरुवातीच्या दिवसास ‘आरंभणीय’ म्हणत. तेथून सहा- सहा दिवसांच्या टप्प्याटप्प्यांनी हा यज्ञ होत असे. या सहा दिवसांच्या संचास ‘षडह’ म्हणत. चंद्राच्या गतीवरून पूर्वी महिना दोन पक्षांत विभागला जात असे. प्राचीन इजिप्तमध्ये दहा दिवसांचा आठवडा होता. क्रांतीनंतर फ्रेंच लोकांनी आपले काही वैशिष्ट्य म्हणून मुद्दाम नवीन पंचांग तयार केले. त्यात आठवड्याचा कालावधी दहा दिवसांचा होता. पण ही प्रथा टिकली नाही. आफ्रिकेच्या इतर भागांत ठिकठिकाणी तीन, चार, पाच, सहा आणि आठ (चाराचे दोन गट) दिवसांचे आठवडे असत. किती दिवसांचा एकेक सलग गट आठवडा म्हणून मानावा, ही गोष्ट दोन निरनिराळ्या कारणांनी ठरविली जात असे. त्यातील पहिले कारण म्हणजे बाजार आणि दुसरे म्हणजे धार्मिक उत्सव. बाजाराच्या दिवशी इतर कोणतीही कामे करावयाची नाहीत, असा आफ्रिकेतील रानटी टोळ्यांमध्ये दंडक असे. बाजार किंवा व्यापारी येण्याच्या दिवशी सुट्टी दिली जात असे.

हेही वाचा : विश्लेषण : त्र्यंबकेश्वर मंदिराच्या शुद्धीकरणावरून शाब्दिक चकमक; ही ‘शुद्धता’ नेमकी आली कुठून ?

आठवडा म्हणजे काय ?

आठवडा म्हणजे आठ दिवस नसतात. सात दिवसांचा आठवडा असतो. त्याला सप्ताह असे म्हणतात. रविवारी पहिला वार असतो आणि आठ दिवसांनी पुन्हा रविवारच येतो. यातून आठवडा हा शब्द निर्माण झाला आहे. सूर्य- चंद्राशिवाय नुसत्या डोळ्यांनी दिसणारे पाच ग्रह म्हणजे मंगळ, बुध, गुरू, शुक्र आणि शनी होत. खाल्डियन समाजांत फलज्योतिषाचा फैलाव झाला होता. या सात ग्रहांना फलज्योतिषात महत्त्वाचे स्थान दिल्यामुळे खाल्डियनांनी सात दिवसांचा आठवडा स्वीकारला असावा व तोच हळूहळू सर्वत्र रूढ झाला. ग्रीक व रोमन साम्राज्यांत खाल्डियन लोक फलभविष्य सांगत. त्याच्या अनुरोधाने तिकडे वार प्रचलित झाले. खाल्डियन संस्कृतीचे केंद्र बगदाद असल्यामुळे नंतर अरबी लोकांनीही हीच पद्धती स्वीकारली. सात दिवसांचा आठवडा हे कालावधीचे एकक म्हणून स्वीकारण्यात चिनी, हिंदू, इजिप्शीयन, ज्यू व पर्शियन लोकांनी पुढाकार घेतला.

हेही वाचा : विश्लेषण : भारतीय निवडणूक पद्धतीवर श्रीलंकेचा प्रभाव ? जाणून घ्या निवडणूक चिन्हांचा रंजक इतिहास

हिंदू पंचांगानुसार सूर्य उगवल्यापासून परत दुसऱ्या दिवशी उगवण्यापर्यंतच्या कालास वार असे म्हणतात. मुस्लिम समाज सूर्यास्तानंतर पुढचा वार सुरू झाला असे समजतो, तर आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार मध्यरात्री बारानंतर नवीन वार सुरू होतो. तिन्ही पद्धतींमध्ये सूर्योदय ते सूर्यास्त या काळात एकच समान वार असतो. वारांनाच ‘वासर’ असेही म्हटले जाते. एका आठवड्यात सात वार असतात. पंचांगाच्या पाच अंगांपैकी एक ‘वार’ आहे. असे असले तरी वार आणि आठवडा या संकल्पना आपण ग्रीक लोकांकडून घेतल्या आहेत, असे म्हटले जाते.

या संदर्भात ‘भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास’ या शं. बा. दीक्षित यांनी १८९६ साली लिहिलेल्या ग्रंथात ते म्हणतात,” सर्व भारत (महाभारत) मी स्वतः ज्योतिषदृष्टीने वाचले आहे, त्यात मला सात वार आणि मेषादी राशी कुठे आढळल्या नाहीत. शकापूर्वी ५०० च्या सुमारास मेषादी संज्ञा आमच्या देशात प्रचारत आल्या आणि त्यापूर्वी सुमारे ५०० वर्षे वार आले असावेत. वार आणि राशी या खाल्डियन, इजिप्शियन वा ग्रीक संस्कृतींकडून आपल्याकडे आल्या,” असे मत त्यांनी मांडले आहे.

हेही वाचा : विश्लेषण : ‘रेड क्रॉस’च्या निर्मितीच्या मुळाशी युद्ध ?

आर्यभट्टाचा सिद्धांत


भारतीय गणितज्ज्ञ आर्यभट्ट याने वारांच्या क्रमाविषयी आर्यभटीय ग्रंथात स्पष्टीकरण लिहिले आहे. ‘आ मंदात्‌‌ शीघ्रपर्यंतम् होरेशा:।’ म्हणजेच मंदगतीच्या ग्रहापासून शीघ्रगतीच्या ग्रहापर्यंत होरे सुरू असतात. यात होरा नावाचा एक घटक येतो. त्याचा अर्थ तास असा आहे. प्रत्येक तासाचा एक अधिपती ग्रह मानला जातो. त्याला होराधिपती असे नाव आहे. तसेच त्या दिवसाचा एक अधिपती ग्रह असतो, त्याला दिनाधिपती म्हणतात. सूर्योदयाच्या (दिवसाच्या पहिल्या) तासाचा जो होराधिपती असतो, तोच त्या दिवसाचा दिनाधिपती होतो. यासाठी प्रथम ग्रहांची त्यांच्या गतीनुसार चढत्या क्रमाने मांडणी करायची. शनीची गती सर्वात कमी आहे, त्यानंतर पुढे गतीनुसार शनी, गुरू, मंगळ, सूर्य, शुक्र, बुध आणि चंद्र अशी होती. या सर्वांत चंद्राची गती सर्वोच्च आहे. यात शनीचा क्रमांक पहिला लागतो. कारण, शनी हा या सर्वांत कमी गतीचा ग्रह आहे. यामुळे आर्यभटाने पहिला होराधिपती शनीला धरले आहे. अर्थात, तो वार शनिवार झाला. म्हणजेच त्या काळात शनिवार हा आठवड्याचा पहिला दिवस होता.

वारांची रचना कशी झाली याचे उत्तर भारतीय ज्योतिषशास्त्रात वराहमिहिर याने नोंदवलेले पाहावयास मिळते. शनिवारनंतर रविवार का येतो हे पाहण्यासाठी होरे कसे मोजले जातात हे पाहिले जाते. उदा. शनिवारी पहिला होरा शनीचा, दुसरा गुरूचा, तिसरा मंगळाचा, चौथा रवीचा, पाचवा शुक्राचा, सहावा बुधाचा, सातवा चंद्राचा असे पुढील होरे येत जातात. याप्रमाणे रांगेने २४वा होरा मंगळाचा येतो. येथे एका दिवसाचे २४ तास पूर्ण होतात. पुढील दिवस सुरू होतो तो त्यापुढील होऱ्याने म्हणजे रवीच्या होऱ्याने. म्हणून शनिवारनंतर रविवार येतो. सूर्याला मध्यभागी ठेवून चंद्र आणि इतर ग्रहांपैकी त्या काळी माहीत असलेल्या पाच ग्रहांचा, सूर्य प्रदक्षिणेला सर्वात जास्त वेळ लागणाऱ्या ग्रहापासून सर्वात कमी वेळ लागणाऱ्या ग्रहापर्यंत अनुक्रम लावला की तो शनी, गुरू, मंगळ, रवी, शुक्र, बुध, चंद्र(सोम) असा येईल. कोणत्याही वारापासून सुरुवात करून पुढचे दोन वार गाळून जो वार येईल तो त्या ग्रहाचा वार. म्हणून शनिवारनंतर दोन नावे गाळून रविवार येतो आणि असेच सोमवार, मंगळवार वगैरे.

हेही वाचा : आत्महत्यांचा इतिहास आणि आजचे गंभीर स्वरूप

वारांची नावे

मराठीमध्ये, संस्कृतमध्ये वारांची नावे ही ग्रहांवरून ठेवलेली दिसतात. परंतु, इंग्रजीमध्ये तसे आढळत नाही. ट्यूसडे ते फ्रायडे पर्यंतच्या वारांची नावे पाश्चात्त्य देवतांच्या नावांवरून ठेवलेली आहेत. उर्दूतही इतवार, पीर, जुमेरात, जुम्मा अशी वेगळी नावे दिसतात. हिंदीमध्ये शनिवारला शनिचर असे म्हणतात. शनै: चरति, हळू चालतो असा ‘शनिचर’ असेही या वाराच्या नावाचे कारण असू शकते. आदित्यवारावरून मराठीत आइतवार म्हणतात असे दिसते. बेत्सरवार असेही अपभ्रंशित मराठीमध्ये आढळते. ते बृहस्पतीचे अपभ्रंशित रूप आहे. ट्यूसडे ते फ्रायडे या वारांची नावे अनुक्रमे टिऊ (जरमॅनिक देवत्ता), वोडन ( अँग्लो-सॅक्सन देवता), थॉर (नॉर्स देव) आणि फ़िग/फ्रेया (नॉर्स स्त्रीदेवता) यांच्या नावांवरून ठेवली गेली. फ्रेंचमध्येही देवतांच्या नावावरून वारांची नावे दिसतात. लंदी – ल्यून म्हणजे चंद्र – सोमवार, मार्दी – मार्स म्हणजे मंगळ – मंगळवार, मॅर्क्रदी – मर्क्युरी – बुधवार, जदी – ज्यूपीटर – गुरुवार, व्हाँद्रदी – व्हीनस – शुक्रवार, सामदी – सॅटर्स – शनिवार, दिमाँश – रविवार अशी वारांची नावे आहेत.

दोन-अडीच हजार वर्षांपूर्वी या वारांची आणि राशींची निर्मिती झाली आणि त्याला खगोलशास्त्रीय कारणे आहेत. तेव्हा निर्माण झालेल्या सात वारांमुळे ५२ आठवडे-३६४/६५ दिवस अशी सुटसुटीत रचना आपल्याला दिसते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why does monday come after sunday who designed the week vvk
First published on: 21-05-2023 at 13:58 IST