India Bangladesh relations: १९७१ साली धार्मिक आणि आर्थिक असमानतेमुळे पाकिस्तानचे दोन भाग झाले. लाखो लोकांचा मृत्यू झाला आणि लाखो लोक बेघरही झाले. त्यावेळी पूर्व पाकिस्तानमधील लोकांनी पाकिस्तानी लष्कराच्या अत्याचारांपासून स्वातंत्र्य मिळवलं होतं. पण, आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की, बांगलादेश पुन्हा एकदा पाकिस्तानच्या वाटेवर का जात आहे?
देशही सोडावा लागला
आपल्या शेजारील बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे, लोक रस्त्यावर उतरले आहेत. भारतीय चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या वडिलोपार्जित घरावरही अलीकडेच हल्ला करण्यात आला. गेल्या वर्षी जुलै महिन्यात बांगलादेशात दंगल सुरू झाली होती आणि त्याचे रूपांतर मोठ्या हिंसाचारात झाले. त्यामुळे शेख हसीनांना केवळ पंतप्रधानपदच गमवावं लागलं नाही, तर जीव वाचवण्यासाठी त्यांना देशही सोडावा लागला आणि भारतात आश्रय घ्यावा लागला.
…वाटचाल पाकिस्तानच्या दिशेने
मात्र, यावेळी परिस्थिती थोडी वेगळी आहे. यावेळी दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये थेट संघर्ष होत आहे. दुसरीकडे, पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर संस्थेनंतर आता पाकिस्तानी दहशतवादी गटही बांगलादेशात सक्रिय झाले आहेत. अशा परिस्थितीत, बांगलादेश पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं चित्र आहे.
बांगलादेश निर्माण करण्याची गरज का पडली?
बांगलादेश निर्माण होण्याच्या काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानात नेमकं काय घडत होतं?
१९४७ साली भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळालं आणि देशाचे दोन तुकडे झाले. धर्माच्या आधारावर पाकिस्तान नावाचा एक नवीन देश निर्माण झाला. परंतु, धर्माच्या नावाने निर्माण झालेल्या या नव्या देशाचे पुढे जाऊन बांगलादेश आणि पाकिस्तान अशा दोन भागात विभाजन झाले.
पूर्व पाकिस्तानातील लोकांची भाषा बंगाली होती. तिथल्या स्त्रिया विविध रंगाच्या साड्या नेसायच्या. याच्या उलट, पश्चिम पाकिस्तानात उर्दू आणि पंजाबी भाषा प्रचलित होती. तिथे बुरखा आणि हिजाब घालण्याची संस्कृती होती.
पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येपैकी ५५ टक्के लोक पूर्व पाकिस्तानात राहत होते आणि ४५ टक्के लोक पश्चिम पाकिस्तानात. पाकिस्तानच्या संसदेत म्हणजेच नॅशनल असेंब्लीमध्ये एकूण ३१३ जागांपैकी १६९ जागा पूर्व पाकिस्तानात होत्या (आजचा बांगलादेश) आणि १४४ जागा पश्चिम पाकिस्तानात (आजचा पाकिस्तान).
पूर्व पाकिस्तानला दुय्यम वागणूक
असे असले तरी, पाकिस्तानच्या एकूण अर्थसंकल्पातील ८० टक्के निधी केवळ पश्चिम पाकिस्तानावर खर्च केला जात होता. पूर्व पाकिस्तानातील लोकांकडे दुय्यम दर्जाने पाहिले जात होते. सरकार चालवणारे नेते पश्चिमेकडचेच होते आणि पूर्व पाकिस्तानातील लोकांना ते दुसऱ्या दर्जाचे नागरिक समजत. पाकिस्तानी लष्करासाठी तर ते फक्त कीटक असल्यासारखे होते. पूर्व पाकिस्तानातील लोकांनी या आर्थिक विषमता आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. मात्र, पाक लष्कराने अत्याचाराची परिसीमा गाठली. तत्कालीन बांगलादेशवासीयांच्या विरोधात शिवीगाळ केली. त्यांना कमजोर आणि कमी दर्जाचे समजले जात होते. पोलिसांकडे तक्रार केली, तरी त्यानंतर पोलिसांनीही त्यांनाच दोषी ठरवलं. १९५२ साली बंगाली भाषेसाठी मोठं आंदोलन झालं. या आंदोलनात अनेक विद्यार्थ्यांना आपले प्राण गमवावे लागले. ही तर फक्त सुरुवात होती.
बंगबंधूंनी खटला का दाखल केला?
पूर्व पाकिस्तानातील राजकीय पक्ष असलेल्या अवामी लीगचे प्रमुख शेख मुजीबुर रहमान, म्हणजेच ‘बंगबंधू’ यांनी त्यांच्या प्रांतावर होत असलेल्या राजकीय अन्याय आणि आर्थिक भेदभावाविरोधात आवाज उठवला होता. १९६५ च्या भारत-पाक युद्धानंतर शेख मुजीबुर रहमान यांनी लाहोरमध्ये म्हटलं होतं, “दोन्ही प्रांतांमध्ये आर्थिक विकासात समानता यावी यासाठी प्रांतिक स्वायत्तता आवश्यक आहे.” शेख मुजीबुर रहमान यांचा हा सल्ला केवळ दुर्लक्षितच केला गेला नाही, तर १९६८ साली’ अगरतळा कट प्रकरणा’त त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला. त्यांच्यावर असा आरोप करण्यात आला की त्यांनी भारताशी संगनमत करून पूर्व पाकिस्तान तोडण्याचा कट रचला आहे.
१९७०ची निवडणूक म्हणजे फाळणीच्या आगीत तेल ओतणं
पाकिस्तान सरकारने पूर्व पाकिस्तानातील लोकांना कधीच महत्त्व दिलं नाही, ना त्यांच्या समस्या ऐकल्या. सरकारच्या वर्तनामुळे, पोलिसांच्या आणि लष्कराच्या वागणुकीमुळे लोकांमध्ये रोष वाढत गेला. आपल्या हक्कांसाठी लढताना पूर्व पाकिस्तानातील लोकांनी स्वतंत्र राष्ट्राची मागणी करायला सुरुवात केली. १९७० साली डिसेंबर महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीने पाकिस्तानच्या फाळणीच्या आगीत आणखी तेल ओतलं.
…आणि बांग्लादेश स्वतंत्र झाला
१९७० च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी पाकिस्तानात राष्ट्रपती राजवट लागू होती आणि हुकूमशहा जनरल याह्या खान राष्ट्रपती होते. या निवडणुकीत शेख मुजीबुर रहमान यांच्या अवामी लीगने पूर्व पाकिस्तानातील १६९ जागांवर उमेदवार उभे केले आणि त्यातील तब्बल १६७ जागांवर विजय मिळवला. पश्चिम पाकिस्तानातील पाकिस्तान पिपल्स पार्टीला केवळ १३८ पैकी ८१ जागा मिळाल्या. पाकिस्तानात सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेली बहुमताची संख्या १५७ होती. शेख मुजीबुर रहमान यांच्याकडे स्पष्ट बहुमत होतं, पण पश्चिम पाकिस्तानातील नेत्यांना बंगाली लोकांनी सत्ता सांभाळणं मान्य नव्हतं. म्हणूनच पाकिस्तानचे लष्करी हुकूमशहा जनरल याह्या खान यांनी शेख मुजीबुर रहमान यांना पंतप्रधान पद देण्यास नकार दिला. ७ मार्च १९७१ रोजी शेख मुजीबुर रहमान यांनी ढाका येथील रेसकोर्स मैदानावर ऐतिहासिक भाषण केलं. त्यांनी पूर्व पाकिस्तानला स्वतंत्र राष्ट्र घोषित केलं आणि त्या देशाचं नाव ‘बांगलादेश’ ठेवलं.
बाथरूममध्ये झालेली चर्चा
१५ मार्च १९७१ रोजी जनरल याह्या खान सत्ता हस्तांतरणावर चर्चा करण्यासाठी ढाक्यात पोहोचले. तेव्हा शेख मुजीबुर रहमान त्यांना भेटण्यासाठी एका पांढऱ्या कारमधून आले. त्या कारवर काळा झेंडा लावलेला होता. जेव्हा याह्या खान यांनी शेख मुजीबुर रहमान यांना गव्हर्नमेंट हाऊसच्या ड्रॉइंग रूममध्ये बोलणी करण्यासाठी नेलं, तेव्हा शेख यांनी त्याला आक्षेप घेतला. जॉन सिसन आणि लिओ रोझ यांनी त्यांच्या पुस्तकात War and Secession: Pakistan, India and Creation of Bangladesh या भेटीचा उल्लेख करताना लिहिलं आहे की, शेख मुजीबुर रहमान यांना खासगी चर्चा करायची होती. याह्या खान यांनी आदेश दिला की, बाथरूममध्ये दोन खुर्च्या ठेवाव्यात. त्यानंतर पाकिस्तान वाचवण्यासाठीची चर्चा बाथरूममध्ये सुरू झाली. ही चर्चा सुमारे दोन तास आणि तीस मिनिटे चालली.
“लग्न झालेल्या जोडप्यासारखं वागताय…”
१९ मार्च रोजी याह्या खान यांनी पाकिस्तान पिपल्स पार्टीचे नेते झुल्फिकार अली भुट्टो यांना देखील ढाक्यात बोलावलं. जेणेकरून तेही चर्चेत सहभागी होतील. पुन्हा एकदा हे तिघं शेख, याह्या आणि भुट्टो एकत्र भेटले. याह्या खान यांनी भुट्टो आणि शेख यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण त्या दोघांमध्ये बोलणं बंद होतं. तेव्हा याह्या खान यांनी वातावरण थोडं हलकं करण्यासाठी विनोद केला आणि म्हणाले, “तुम्ही दोघं अगदी नवीन लग्न झालेल्या जोडप्यासारखं वागताय.” त्यांनी दोघांचे हात हातात घेतले आणि बोलायला सांगितलं. त्यानंतर भुट्टो आणि शेख मुजीबुर रहमान यांच्यात पुन्हा संवाद सुरू झाला.
लाहोर ठराव दिन
या चर्चेनंतर, एकमत झाले की, बांगलादेश पाकिस्तानचाच भाग राहील. पण २३ मार्चला ही बोलणी फिस्कटली. खरं तर, २३ मार्च रोजी संपूर्ण पाकिस्तानात ‘लाहोर ठराव दिन’ साजरा केला जात होता. १९४० साली याच दिवशी स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची कल्पना प्रथमच मांडण्यात आली होती.
१३ दिवसांत पाकिस्तानची शरणांगती
पण, परिस्थिती हाताबाहेर गेली. ३ डिसेंबर १९७१ रोजी, पाकिस्तानी लष्कराच्या अमानुषतेला रोखण्यासाठी भारतीय सैनिक रणभूमीत उतरले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात तिन्ही सीमेवर युद्ध झालं. फक्त १३ दिवसांत पाकिस्तानी लष्कराला शरणागती पत्करावी लागली. या युद्धात ९३ हजारांहून अधिक पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय लष्करासमोर शस्त्र टाकले आणि बांगलादेश या नव्या राष्ट्राचा जन्म झाला