|| ऋषिकेश बामणे

वाढदिवसानिमित्त तब्बल ३१ पौंडाचा केक

फुटबॉल म्हटले की त्यात जय-पराजय, आवडत्या संघाच्या विजयासाठी होणारी प्रार्थना आणि लोकप्रिय खेळाडूसाठी केला जाणारा उपवास हे नेहमीचेच. मात्र कोलकात्याच्या एक चहावाल्याने या सर्वावर कुरघोडी केली आहे. अर्जेंटिनाचा नामांकित फुटबॉलपटू लिओनेल मेसीचा निस्सीम चाहता असलेल्या शिवशंकर पात्राने मेसीचा वाढदिवस एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. रविवारी, २४ जून रोजी वयाची ३१ वर्षे ओलंडणाऱ्या मेसीच्या वाढदिवशी तब्बल ३१ पौंड वजनाचा (१५.५ किलो) केक त्याच्या १० फूट उंच फलकासमोर कापण्यात आला. अर्जेंटिनाच्या जर्सीचाच रंग या केकलाही देण्यात आला होता. त्याशिवाय त्याने १०० लहान मुलांना अर्जेंटिनाची जर्सी मोफत वाटली.

रशियात सुरू असलेली विश्वचषक फुटबॉल स्पर्धा सध्या चांगलीच रंगते आहे. त्यातच अर्जेंटिनासारख्या बलाढय़ संघावर साखळी गटातच स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवू शकते. पण शिवशंकर यांना अर्जेंटिना यंदाचा विश्वचषक जिंकून मेसीला विजयी निरोप देणार याची खात्री आहे. शिवशंकर यांच्यासह त्यांची पत्नी सपना, मुलगी नेहा आणि मुलगा शुभम हे मेसीसाठी अर्जेंटिनाचा एकही सामना चुकवत नाहीत.

१९८६मध्ये फुटबॉल विश्वातील महान खेळाडू दिएगो मॅराडोना यांनी अर्जेंटिनाला दुसऱ्यांदा विश्वचषक उंचावून दिला. तेव्हापासून शिवशंकर अर्जेंटिनाचे चाहते झाले. पुढे २००५मध्ये मेसीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू झाल्यावर त्याचा खेळ पाहण्यासाठी त्यांनी टेलिव्हिजन संच खरेदी केला. २००६ पासून प्रत्येक विश्वचषकाच्या वेळी शिवशंकर आपल्या घराला अर्जेंटिनाच्या जर्सीमध्ये रंगवतात. निळ्या-पांढऱ्या रंगाची सुंदर तीन मजली इमारत, रस्त्याच्या चोहीबाजूंना लावलेले पताके हे सर्व पाहण्यासाठी शिवशंकर राहत असलेल्या उत्तर २४ परगणा जिल्हा परिसरात तुफान गर्दी जमते.

२०११मध्ये मेसी प्रथमच भारतात आणि फुटबॉलसाठी खास ओळखल्या जाणाऱ्या कोलकात्यात आला होता. त्यावेळी शिवशंकर यांना मेसीचा खेळ ‘याचि देही, याचि डोळा’ पाहण्याची संधी मिळाली. अर्थातच त्याचा लाभ उठवून त्यांनी अर्जेंटिना-व्हेनेझुएला या मैत्रीपूर्ण सामन्याचा आनंद लुटण्यासाठी कोलकात्यातील सॉल्ट लेक स्टेडियम गाठले. या लढतीत मेसीने केलेल्या गोलच्या बळावर अर्जेंटिनाने व्हेनेझुएलाला १-० असे पराभूत करत चाहत्यांना आयुष्यभर लक्षात राहील अशी भेट दिली.

‘‘सध्या रशियात सुरू असलेली विश्वचषक फुटबॉल स्पर्धा प्रत्यक्षात जाऊन पाहण्याइतकी माझी ऐपत नाही. मात्र या गोष्टीचे मला जराही दु:ख वाटत नाही. मेसीने कधीच निवृत्त होऊ नये व यंदाचा विश्वचषक जिंकून सर्व टीकाकारांना चोख उत्तर द्यावे,’’ अशी इच्छा शिवशंकरने व्यक्त केली.