१९५०ची फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी ब्राझीलचं सरकार आणि फुटबॉल संघटनेनं मिळून रिओ डी जानेरोमध्ये मराकाना हे अजस्र स्टेडियम बांधलं. त्या स्पर्धेत ब्राझीलनं उत्तम खेळ करत अंतिम फेरी गाठली. समोर होते मातब्बर उरुग्वे. तरीही पहिल्या सत्रामध्ये ब्राझीलनं १-० अशी आघाडी घेतली. मराकानामध्ये उपस्थित २ लाख (!) प्रेक्षकांमध्ये जल्लोष सुरू झाला. पण दुसऱ्या सत्रामध्ये उरुग्वेनं बरोबरी साधली. नंतर १० मिनिटं उरलेली असताना घिगियानं गोल करत उरुग्वेला आघाडीवर नेलं आणि ते जिंकले. मराकानाची शोकांतिका ‘मराकानाझो’ म्हणून ओळखली जाऊ लागली. त्या दिवशी एका ९ वर्षीय मुलानं पहिल्यांदाच आपल्या वडिलांना रडताना पाहिलं. या पराभवाचा वचपा काढेन असं वचन त्यानं वडिलांना दिलं. आठ वर्षांनी तो मुलगा स्वीडनमध्ये विश्वचषक अंतिम सामन्यात खेळला आणि त्यानं दोन गोल केले. तो मुलगा. एडसन आरांटेस डो नासिमेन्टो अर्थात पेले! आणि वचप्याचं काय? १९७० विश्वचषक उपांत्य सामन्यात उरुग्वेविरुद्ध १-१ अशी बरोबरी असताना पेलेच्याच गोलनं ब्राझीलला विजय मिळवून दिला!

मॅराडोनाच्या कथित वर्णद्वेषी भावमुद्रेने नवे वादळ

आइसलँडविरुद्धच्या सामन्यात र्अजेटिनाचा महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोनाने एका आशियाई चाहत्याबाबत वर्णद्वेषी भावमुद्रा केल्याच्या आरोपाने नवे वादळ उठले आहे. ब्रिटनच्या दूरचित्रवाणी कर्मचाऱ्यांनी काही दक्षिण कोरियाच्या चाहत्यांकडे बघून मॅराडोनाने ही वर्णद्वेषी प्रतिक्रिया दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मॅराडोनाने त्याच्या ‘फेसबुक’वर ‘‘फिफा विश्वचषकात प्रत्येकाला काही तरी मसाला बातमी हवी असल्याने असे घडल्याचे दिसते. तो आशियाई मुलगा अर्जेटिनाचा टी शर्ट घालून पाठिंबा देत असल्याचे मला दिसल्यावर मी त्याच्याकडे बघून आशियाई चाहतेदेखील आम्हाला पाठिंबा देत असल्याबाबत आनंद वाटल्याची प्रतिक्रिया दिली,’’ असे सांगितले.