आपल्यापेक्षा आकार, लोकसंख्या व आर्थिक स्थिती याबाबत कितीतरी पटीने लहान असलेला उरुग्वेचा संघ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची बाद फेरी गाठू शकतो, तर आपल्याला असे यश का मिळत नाही, असा प्रश्न चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांना पडला आहे. त्यातच विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीत चीनचा सीरियाकडून पराभव झाल्यानंतर जिनपिंग यांच्यावर कडाडून टीका झाली होती. फुटबॉलच्या प्रसारासाठी शासन चांगले प्रयत्न करीत नाही, अशा आशयाचे फलक घेत अनेकांनी रस्त्यावर येऊन निदर्शने केली होती. त्यामुळेच त्यांनी २०५०पर्यंत आपल्या देशाला फुटबॉलची महासत्ता बनवण्याचे लक्ष्य ठरवले आहे.

त्यादृष्टीने देशात त्यांनी २० हजार नवीन प्रशिक्षण अकादमी सुरू करण्याचे निश्चित केले आहे. गुआंगझुओ येथील सर्वात मोठय़ा अकादमीशी या सर्व अकादमी संलग्न असणार आहेत. या अकादमीत प्रशिक्षण देण्यासाठी परदेशातील नामवंत क्लबची मदत घेण्याचे त्यांनी ठरवले आहे. त्याचप्रमाणे काही युरोपियन क्लबमधील खेळाडूंना आपल्या देशात प्रदर्शनीय सामने घेण्याचे त्यांचे प्रयोजन आहे.

शालेय स्तरावर व ग्रामीण भागातील तळागाळापर्यंत या खेळाची व्याप्ती वाढावी, असे जिनपिंग यांचे ध्येय आहे. २०२५ सालापर्यंत देशातील ५० हजारांहून अधिक शाळांमध्ये फुटबॉल हा खेळ शिक्षणाचा एक भाग म्हणून शिकवला जाईल अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यासाठी ज्येष्ठ व अनुभवी खेळाडूंवरच प्रशिक्षणाची जबाबदारी सोपविली जाणार आहे. तसेच या ज्येष्ठ खेळाडूंना प्रशिक्षक होण्यासाठी तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्याचीही त्यांची योजना आहे.

‘‘२००८च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाचे यजमानपद जेव्हा चीनला मिळाले, तेव्हाच त्यांनी या स्पर्धेत आपला देश पदकतालिकेत कसे अव्वल स्थान घेईल, यादृष्टीने नियोजन आराखडा केला होता. याचप्रमाणे योग्य नियोजन केले व त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने झाली तर आपला देश फुटबॉल महासत्ता होईल,’’ अशी जिनपिंग यांना खात्री वाटत आहे.

  • शालेय स्तरावर फुटबॉलसाठी नैपुण्यशोध मोहीम मोठय़ा प्रमाणावर हाती घेतली जाणार आहे. त्याकरिता आवश्यकता भासल्यास परदेशी प्रशिक्षकांचीही मदत घेतली जाणार आहे.
  • युरोपियन देशांमध्ये शालेय स्तरावर व ग्रामीण स्तरावर फुटबॉल नैपुण्य शोध व विकास कसा साधला जातो याचा अभ्यास करण्यासाठी जिनपिंग यांनी एक समिती स्थापन करण्याचे ठरवले आहे.
  • अलीकडेच ‘फाइव्ह अ साइड फुटबॉल’ हा प्रकार लोकप्रिय होत असून त्यामध्ये लहान मुले मोठय़ा प्रमाणावर भाग घेतात व खेळाचा आनंद मनापासून घेतात, हे लक्षात आल्यामुळे चीनच्या फुटबॉल संघटकांनीही या प्रकारास चालना देण्याचे ठरवले आहे.