FIFA World Cup 2018 JPN vs POL : एच गटात आज झालेल्या सामन्यात पोलंडने जपानला १-० असे पराभूत केले. पण, पराभव होऊनही जपानला बाद फेरी गाठणे शक्य झाले. सामना संपल्यानंतर जपान आणि सेनेगल या दोन संघांचे गुण आणि गोल कमाई संख्या दोन्हीही समान होते. त्यामुळे ‘फेअर प्ले’ (खिलाडूवृत्ती)च्या मुद्द्यावर निर्णय घेण्यात आला. या अनुषंगाने सेनेगलपेक्षा जपानला स्पर्धेत आतापर्यंत कमी येलो कार्ड्स मिळाल्याने जपानला स्पर्धेत पुढे पाठवण्यात आले. तर सेनेगल आणि पोलंड यांचे आव्हान संपुष्टात आले.

जपान विरुद्ध पोलंड या सामन्यात पूर्वार्धात एकही गोल होऊ शकला नाही. पूर्वार्धात गोलपोस्टवर दोन्ही संघांनी एकही आक्रमक हल्ला केला नाही. पण उत्तरार्धात मात्र दोन्ही संघांनी आपला पवित्रा बदलला. जपानने ४७व्या मिनिटाला पोलंडच्या गोलपोस्टवर आक्रमण केले. पण ते आक्रमण थोपवण्यात आले. त्यानंतर ५९व्या मिनिटाला पोलंडकडून जपानच्या गोलपोस्टवर हल्ला चढवण्यात आला, कुरझावाने पस केलेल्या फुटबॉलला योग्य दिशा देत बेड्नारेकने पोलंडकडून गोल केला. संपूर्ण सामन्यात केवळ हा एकमेव गोल झाला.

जपान पराभूत झाल्यामुळे एच गटात जपान आणि सेनेगल या दोघांचेही ४ गुण होते. तसेच गोल कमाई संख्या आणि गोल फरक देखील समान होता. त्यामुळे कमी येलो कार्ड्स मिळालेल्या जपानला फेअर-प्ले म्हणजेच खिलाडूवृत्तीने खेळ करण्याच्या मुद्द्यावर बाद फेरीचे तिकीट देण्यात आले. महत्वाचे म्हणजे या स्पर्धेत पहिल्यांदाच फेअर प्ले पॉइंट्सचा वापर करण्यात आला.