FIFA World Cup 2018 NIG vs ICE : फिफा विश्वचषक स्पर्धेत आज दिवसाच्या दुसऱ्या सामन्यात ड गटात नायजेरियाने आईसलँडच्या संघावर २-०ने मात केली. नायजेरियाच्या संघाकडून अहमद मुसा याने दोनही गोल करत आईसलँडच्या संघाला धूळ चारली. सामन्याच्या पूर्वार्धात नायजेरियाच्या संघाला एकदाही गोल पोस्टवर आक्रमण करण्याची संधी मिळाली नाही. मात्र उत्तरार्धात सामन्याच्या ४९व्या मिनिटाला मुसाने पहिला गोल केला. मोझेसने पास केलेल्या फुटबॉलला त्याने दिशा दिली आणि संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सामन्यात ७५व्या मिनिटाला ओमेरूओने पास केलेल्या फुटबॉलवर मुसाने पुन्हा गोल करत आईसलँडला २-०ने पिछाडीवर टाकले.

नायजेरियाच्या या विजयानंतर आता ड गटातील गुण परिस्थिती अधिकच क्लिष्ट झाली आहे. क्रोएशियाने काल अर्जेटिनाला पराभवाचा धक्का दिल्याने तो संघ ६ गुणांसह बाद फेरीत दाखल झाला आहे. आताच्या विजयासह नायजेरिया तीन गुणांसह दुसऱ्या स्थानी पोहोचली आहे. तर, आइसलँड आणि अर्जेंटिना हे संघ अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर फेकले गेले आहेत. त्यामुळे आता साखळी सामन्यातील ड गटाच्या अखेरच्या दोन सामन्यावर बाद फेरीतील दुसऱ्या संघांची निवड होणार आहे.