12 November 2019

News Flash

FIFA World Cup 2018 : धक्कादायक! पराभवाच्या धक्क्याने इजिप्तच्या फुटबॉल तज्ज्ञाचा मृत्यू

इजिप्तचा पराभव झाल्याच्या धक्क्याने इजिप्तचे फुटबॉल तज्ज्ञ व अॅनालिस्ट अब्दल रहीम मोहम्मद यांचा मृत्यू झाला.

FIFA World Cup 2018 : फिफा विश्वचषक स्पर्धेत गटातील साखळी सामन्यात सौदी अरेबियाने इजिप्तवर २-१ असा धक्कादायक विजय मिळवला. सौदी अरेबियाचा फिफा विश्वचषकात गेल्या २४ वर्षातला हा पहिलाच विजय ठरला. त्यामुळे हा विजय त्यांच्यासाठी ऐतिहासिक होता.

वोल्गोग्रॅड अरेनात झालेल्या या सामन्यात मोहम्मद सलाहने २२ व्या मिनिटाला गोल करुन इजिप्तचे खाते उघडले होते. या सामन्यात ४१व्या मिनिटाला सौदी अरेबियाच्या फहाल-अल-मुवालदची पेनल्टी किक इजिप्तचा गोलकिपर इसाम-इल-हदरीने थोपवली. मात्र पाचच मिनिटांनी सलमान अल फराजने पेनल्टी किकवरच गोल डागून सौदी अरेबियाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. यानंतर काही वेळासाठी हा सामना १-१ असा बरोबरीत सुटेल असे वाटत असतानाच सालेम-अल-दवसारी याने अतिरिक्त वेळेत (९५) गोल झळकावून सौदी अरेबियाला २-१ असा विजय मिळवून दिला.

या सामन्यात इजिप्तचा पराभव झाल्याच्या धक्क्याने इजिप्तचे फुटबॉल तज्ज्ञ व अॅनालिस्ट अब्दल रहीम मोहम्मद यांचा मृत्यू झाला. ९५व्या मिनिटाला सालेम-अल-दवसारी याने गोल केला आणि त्यांनंतर मैदानावर सेलिब्रेशन सुरु झाले. सौदी अरेबिया हा सामना जिंकणार हे जवळपास निश्चित होते. या धक्क्याने मोहम्मद यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र रुग्णालय व्यवस्थापनाने त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, १९९४ सालापासून सौदी अरेबियाने विश्वचषकात १२ सामने खेळले होते, त्यापैकी १० सामन्यांत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं, तर २ सामने बरोबरीत सुटले. ४५ वर्षीय इजिप्तचा गोलकीपर हदरी हा फिफा विश्वचषकात खेळणारा आजवरचा सर्वात वयस्क खेळाडू ठरला. या आधी हा विक्रम कोलंबियाचा गोलकीपर मॉन्डरॅगोन याच्या नावावर होता. तसेच, १९६६नंतर फिफा विश्वचषकाच्या पदार्पणातच पेनल्टी थोपवून लावणारा इसाम इल हदरी हा आजवरचा चौथा गोलकीपर ठरला.

First Published on June 26, 2018 7:57 pm

Web Title: fifa world cup 2018 saudi arabia beat egypt shock analyst dead