विश्वविख्यात पेले, रोनाल्डो, गॅरिंचा आदी मातब्बर फुटबॉलपटूंचा वारसा लाभलेला संघ म्हणून ब्राझीलकडे पाहिले जाते. पाच वेळा जगज्जेतेपदावर आपले नाव कोरणारा ब्राझील हा यंदाच्या विश्वचषकाचा दावेदार मानला जात होता. मात्र अतिआत्मविश्वास व बेभरवशाचा खेळ यामुळे त्यांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. बलाढय ब्राझीलवर बेल्जियमने २-१ गोल फरकाने मात केली.

पहिल्या सत्रातच बेल्जियमच्या संघाने २-० अशी आघाडी घेतली होती. दोन गोल झाल्यानंतर ब्राझीलने जोरदार आक्रमण केले. ब्राझीलचे खेळाडू वारंवार बेल्जियमच्या गोलपोस्टवर धडक देत होते. पण बेल्जियमच्या भक्कम बचावफळीने त्यांचे गोल करण्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडले आणि ब्राझीलला स्पर्धेतून बाहेर केले.

त्यानंतर ज्यावेळी ब्राझीलचा संघ मायदेशी परतला, तेव्हा त्यांना चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओनुसार चाहत्यांनी संघाचे खेळाडू ज्या बसमध्ये होते, त्या बसवर दगड जाणीव अंडी फेकून आपला राग व्यक्त केला आणि बस अडवून धरली.

काही काळाने जेव्हा बस जागेवरून पुढे जाऊ लागली, त्यानंतरही चाहत्यांनी दगड आणि अंडी फेकणे सुरूच ठेवले. त्यानंतर अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नाईलाजाने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.