“फुटबॉल हा एक साधा खेळ आहे. २२ खेळाडू, ९० मिनिटे, एका चेंडूचा पाठलाग करतात आणि शेवटी जर्मनीचा संघ नेहमी जिंकतो”, असेच काहीसे उद्गार इंग्लंडचे महान फुटबॉलर गॅरी लिनेकर यांनी जर्मनीबाबत काढले होते. पण लिनेकर यांचे ते शब्द कदाचित जर्मन खेळाडूंच्या डोक्यात गेले की काय असंच काहीस चित्र रशियात पाहायला मिळालं.

रशियात जर्मनी कधीच जिंकत नाही आणि याला इतिहास साक्षीदार आहे असं म्हणतात. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीला रशियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर आता फिफा विश्वचषकातही एका सामन्याचा अपवाद वगळला तर जर्मनीला विजयापासून दूरचं राहावं लागलं. आधी मेक्सिको आणि मग दुबळ्या दक्षिण कोरियानं गतविजेत्या जर्मनीचा फडशा पाडला. यामुळे गतविजेत्यांवर साखळीतंच गारद होण्याची नामुष्की ओढावली.

दक्षिण कोरियाविरुद्ध पराभव स्वीकारल्यामुळं जर्मनीला आपल्या गटात तळावरच समाधान मानावं लागलं. चारवेळेचा विश्वचषक विजेत्या जर्मनीची गेल्या ८० वर्षांतली ही सर्वात वाईट कामगिरी ठरली. याआधी १९३८ साली जर्मनीला पहिल्या फेरीतच पराभव स्वीकारावा लागला होता.  इतकच नाही तर १९३८ नंतर पहिल्यांदाच जर्मनीला विश्वचषकातल्या टॉप ७ मध्ये स्थान मिळवता आलं नाही. १९६२ साली ब्राझिलनं सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला होता. पण त्यानंतर आजवर एकाही संघाला सलग दोनदा विश्वचषक जिंकता आलेला नाही.

गतविजेत्यांना शाप

गतविजेत्यांचं आव्हान साखळीतच संपुष्टात येण्याची ही गेल्या पाच विश्वचषक आवृत्तींमधली चौथी वेळ आहे. १९९८ साली फ्रान्सचा संघ विश्वविजेता झाला होता, पण २००२ च्या विश्वचषकात फ्रान्स साखळीतच गारद झाला होता. मग २०१० साली २००६ सालचा विश्वविजेता इटलीचा संघ पहिल्या तीन सामन्यांनंतर घरी परतला होता. तर २०१० चा विजेता स्पेन २०१४ च्या विश्वचषकात सपशेल अपयशी ठरला होता. आता जर्मनीनंही फ्रान्स, इटली आणि स्पेनच्या त्या कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे.

२०१४ साली जर्मनीनं ब्राझिलवर मिळवलेला ७-१ असा विजय आजही सर्वांच्या लक्ष्यात आहे. मग अर्जेन्टिनाविरुद्ध अंतिम सामन्यातला विजय हा तर काल-परवाच मिळवलेल्या विजयासारखा वाटतो. स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या गतविजेत्या जर्मनीवर इतकी वाईट वेळ का बरं आली असेल ? त्याला अनेक कारणं आहेत….

धन्यवाद रेसूस आणि क्रूस..किमान तुम्ही तरी जर्मनीची लाज राखली.

ब्राझिलमध्ये झालेल्या विश्वचषकात जर्मनीचं आक्रमण थोपवून लावण्यात अनेक संघांना जमलंच नाही. पण रशियातल्या विश्वचषकात जर्मनीला गोल करणं हा नेमका काय प्रकार असतो याचा जणू विसरच पडला होता. थॉमस म्युलर, मारियो गोमेझ, टीमो वर्नरसारख्या आघाडीच्या खेळाडूंना तीन सामन्यांत एकही गोल करता आला नाही. जो संघ दणादण गोल करण्यासाठी प्रसिद्ध आहे त्या संघाला ३ सामन्यांत मिळून केवळ दोनच गोल करता आले. ही जर्मनीसाठी मोठी चिंतेची बाब आहे. मार्को रेयूस आणि टोनी क्रूस या मिडफील्डरचा अपवाद वगळता जर्मनीच्या एकाही शिलेदाराला गोल करता आला नाही.

जर्मनीचं विश्वचषकातलं हे बोथट आक्रमण पाहून लिरॉय सानेची आठवण आल्याशिवाय राहत नाही. २२ वर्षाच्या या पठ्याने मॅनचेस्टर सिटीला २०१७-१८ या मोसमाचं इंग्लिश प्रीमियर लीग जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. सानेनं प्रीमियर लीगच्या ३२ सामन्यांत १० गोल आणि १५ असिस्टही केले होते. पण अशी दमदार कामगिरी बजावूनही प्रशिक्षक जोकेम लो यांनी सानेची विश्वचषकासाठीच्या संघात निवड केली नाही. माझ्या मते प्रशिक्षक जोकेम लो यांची ही सर्वात मोठी घोडचूक होती.

जर्मनीचं आक्रमण तर बोथट होतंच, पण त्यांचा बचावही तितकाच वाईट होता. मेक्सिको असो, स्वीडन असो वा दक्षिण कोरिया. जर्मनीच्या बचावफळीतल्या खेळाडूंना प्रतिस्पर्ध्यांचा काउंटर अटॅक थोपवून लावण्यात सपशेल अपयश आलं. त्यात जेरोमी बोएटेंगसारख्या अनुभवी खेळाडूनं स्वीडनविरुद्ध घोडचूक करुन रेड कार्ड मिळवलं. त्यामुळं दक्षिण कोरियाविरुद्ध सामन्यात जर्मनीचा संघ बोएटेंगशिवायच मैदानात उतरला.  त्या सामन्यात जर्मनीलाही बोएटेंगची उणीव प्रकर्षानं जाणवली.

प्रशिक्षक जोकेम लो यांच्या रणनितीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मेक्सिकोविरुद्ध झालेल्या पराभवानंतर जोकेम लो यांनी संघात चार बदल केले. त्याचा त्यांना फायदाही झाला. जर्मनीनं स्वीडनविरुद्ध २-१ असा विजय मिळवला. पण त्यानंतरही जोकेम लो यांनी दक्षिण कोरियाविरुद्ध सामन्यात संघामध्ये तब्बल ५ बदल केले आणि त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागली. इतक्या मोठ्या प्रमाणात फेरबदल करणं हे कोणत्याही संघाचं मनोबल उंचावणार नाही आहे.

फुटबॉल जगतात जर्मनीनं आजवर अनेक विक्रम रचले आहेत जे इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहीले गेलेयत. पण रशियात त्यांच्या नावावर नको असलेला विक्रम रचला गेलाय. त्यामुळे आता हा नको इतिहास विसरुन पुन्हा एकदा नव्यानं उभं राहण्याचं आव्हान जर्मनीसमोर असेल.

  • आपल्या प्रतिक्रीया vijay.majha@gmail.com या इमेल आयडीवर कळवा.