|| मिलिंद ढमढेरे

केवळ ताकदवान शरीरयष्टी असून उपयोग नाही, त्याबरोबरच त्यास कल्पक बुद्धिमत्तेचीही जोड द्यावी लागते तरच अव्वल दर्जाचे यश मिळते. दुर्दैवाने रशियात सुरू असलेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील आफ्रिकन संघांमध्ये त्याचाच अभाव दिसून आला. त्यामुळेच या देशांचे आव्हान साखळी गटातच संपुष्टात येण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली.

आफ्रिकेतील सेनेगल, टय़ुनिशिया, नायजेरिया, मोरोक्को, इजिप्त यांनी रशियातील मुख्य स्पर्धेसाठी पात्रता निश्चित केली होती. तेव्हा त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. या संघांमधील किमान दोन संघ बाद फेरीत स्थान मिळवतील अशी आशा होती. परंतु सातत्यपूर्ण कामगिरीचा अभाव, बेशिस्त व धसमुसळा खेळ, सांघिक वृत्तीपेक्षाही वैयक्तिक कौशल्य दाखवण्याची वृत्ती, नियोजनबद्ध खेळाचा अभाव यामुळे त्यांच्यापैकी एकही संघ उपउपांत्यपूर्व फेरीसाठी पात्रता पूर्ण करू शकला नाही. यापूर्वी १९८२च्या विश्वचषक स्पर्धेत आफ्रिकन संघांवर साखळी गटातच आव्हान संपुष्टात येण्याची नामुष्की ओढवली होती.

यंदा साखळी गटातील तिसरे सामने सुरू होण्यापूर्वीच इजिप्त, मोरोक्को व टय़ुनिशिया यांचे आव्हान संपले होते. आफ्रिकन संघांना १५ सामन्यांपैकी केवळ तीनच सामन्यांमध्ये विजय मिळवता आला. इजिप्त संघास एकही सामना बरोबरीत किंवा जिंकता आला नाही. मोरोक्को संघाने स्पेनसारख्या बलाढय़ व नामांकित खेळाडूंच्या संघाविरुद्ध बरोबरी स्वीकारून एक गुण स्वीकारला. हीच त्यांची एकमेव कमाई होती. या सामन्यात त्यांनी दाखविलेली जिद्द अगोदरच्या सामन्यांमध्ये दाखवली असती तर निश्चितपणे ते बाद फेरीत पोहोचले असते. टय़ुनिशियाने अखेरच्या सामन्यात पोलंडवर मात केली. त्यांच्या या विजयात त्यांच्या खेळाडूंच्या कौशल्यापेक्षाही पोलंडच्या खेळाडूंनी केलेल्या अक्षम्य चुकांचाच मोठा वाटा होता. तसेच हा सामना होईपर्यंत त्यांच्या गटातून बेल्जियम व इंग्लंड यांचा बाद फेरीतील प्रवेश निश्चित झाला होता. साहजिकच पोलंड व टय़ुनिशिया यांच्यातील सामन्यास फारसे महत्त्व राहिलेले नव्हते. पोलंडचे अनेक खेळाडू युरोपियन लीगमध्ये खेळत असले तरीही यंदा त्यांचा संघ खूपच कमकुवत होता. त्यामुळेच त्यांच्याकडून फारशी चमकदार कामगिरी अपेक्षित नव्हती. सेनेगल संघाने पहिल्याच लढतीत पोलंडला पराभवाचा धक्का दिला होता. पण या सामन्यात दाखवलेली जिद्द त्यांना जपान व कोलंबियाविरुद्ध दाखवता आली नाही. जपानने सेनेगल संघाला बरोबरीत रोखले. कोलंबियाने सेनेगलवर मात केली. या दोन्ही सामन्यांमध्ये सेनेगलच्या खेळाडूंनी खूपच दांडगाईचा खेळ केला. या बेशिस्तपणाचाच फटका त्यांना बसला. जेव्हा साखळी गटात जपान व सेनेगल यांचे समान गुण झाले, तेव्हा त्यांच्यापैकी एका संघास बाद फेरीची संधी देताना ज्या संघातील खेळाडूंना कमी पिवळे कार्ड मिळाली अशा संघास म्हणजेच जपानला बाद फेरीची संधी मिळाली.

नायजेरियाने विश्वचषक व ऑलिम्पिक स्पर्धामध्ये अनेक वेळा आश्चर्यजनक विजय नोंदवले आहेत. हे विजय नोंदवताना त्यांनी दाखवलेले कौशल्य यंदा त्यांना दाखवता आले नाही. त्यांच्या खेळाडूंमध्ये विस्कळीतपणा प्रकर्षांने दिसून आला. केवळ ताकद असून उपयोग नाही, सातत्यपूर्ण व नियोजनपूर्वक चाली करण्याबाबत त्यांच्या मर्यादा स्पष्ट दिसून आल्या. त्याचप्रमाणे बचाव फळीतील शिथिलता त्यांना मारक ठरली.

मोहम्मद सलाह व सॅडिओ माने यांना लिओनेल मेसी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यासारखेच वलय लाभले आहे. युरोपातील अनेक लीग स्पर्धामध्ये त्यांचा बोलबाला असतो. त्यांच्याकडून विश्वचषक स्पर्धेत मोठय़ा कामगिरीची अपेक्षा होती, मात्र त्यांना अपेक्षेइतका प्रभाव दाखवता आला नाही. ‘नाव मोठे, लक्षण खोटे’ हेच लक्षण त्यांच्यामध्ये दिसून आले. फुटबॉलमध्ये सर्वोत्तम यश मिळवण्यासाठी आवश्यक असणारी शारीरिक क्षमता आफ्रिकन खेळाडूंमध्ये आहे, मात्र काही वेळा शक्तीपेक्षाही युक्ती श्रेष्ठ असते. यंदाची विश्वचषक स्पर्धा आफ्रिकेसाठी संपलेली असून आता त्यांना पुढच्या विश्वचषक स्पर्धेबाबत विचार करण्याची गरज आहे. यंदा आपण कोठे कमी पडलो याचा बारकाईने अभ्यास करून त्यानुसार सुधारणा करण्यावर त्यांनी भर दिला पाहिजे तरच २०२२च्या विश्वचषक स्पर्धेत त्यांच्यापैकी दोन-तीन संघ बाद फेरीत पोहोचतील अशी आशा आहे.