सिद्धार्थ खांडेकर

क्रोएशियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात खरं म्हणजे फ्रान्सचं पारडं केव्हाही जडच होतं. पण ‘डार्क हॉर्स’ संघाला अशा लढतींमध्ये मिळणारी सहानुभूती ही वैश्विक असते. त्यामुळे क्रोएशियाचा संघ जिंकावा असं अनेकांना वाटत होतं. इव्हान पेरिसिचच्या गोलचा दर्जा आणि सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये दाखवलेली ऊर्जा या भांडवलावर क्रोएशियानं कोणत्याही संघाला खिंडीत पकडलं असतं. मात्र विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी लागणारा अत्यावश्यक घटक म्हणजे चुका टाळणे!

उपांत्य फेरीत क्रोएशियाकडून गोल करणारे मान्झुकिच आणि पेरिसिच यांनी अंतिम सामन्यातही गोल केलेच. मात्र त्यांच्या दोन चुकांमुळे पहिल्या हाफमध्ये फ्रान्सला दोन गोल बोनस मिळाले. इतर कोणत्याही निरुपद्रवी फ्री-किकवर मान्झुकिचनं गरजेपेक्षा अधिक उंच उडी मारली नसती. इतर कोणत्याही कॉर्नर किकवर पेरिसिचनं चेंडूला स्पर्श करण्याचं टाळलं असतं. क्रोएशियाच्या संघातले हे दोन जुनेजाणते भिडू. मोक्याच्या क्षणी त्यांची एकाग्रता भंगली. लक्ष भलतीकडेच राहिलं. या दोन क्षुल्लक चुका टाळल्या असत्या तर सामन्यात आणखी रंगत निर्माण होऊ  शकली असती. पॉल पोग्बा आणि कायलान एम्बापे यांचे गोल झकास होते, पण अनपेक्षित नव्हते. प्रतिहल्ले हे नेहमीच फ्रान्सचं हुकमी हत्यार राहिलेलं आहे. दोन संघांतील भिन्न मानसिकतेतला हा फरक आहे. आपण जिंकू शकू हा आत्मविश्वास क्रोएशियाकडे होता. तर आपण जिंकणार हे फ्रान्सला ठाऊक होतं! त्यामुळेच चेंडूवर ताबा मिळवण्याच्या आणि तो राखण्याच्या फंदात फ्रेंच खेळाडू पडलेच नाहीत. त्यांनी गोलच्या दिशेनं क्रोएशियापेक्षा कमी फटके लगावले, पण हे फटके तुलनेनं अधिक अचूक होते. त्यांचा गोलकीपर कर्णधार ह्युगो लॉरिसच्या हास्यास्पद चुकीतून गोल खाऊनही फ्रेंच संघ गर्भगळीत झाला नाही. एन्गोलो कांटेसारख्या सरावलेल्या मिडफील्डरला परत बोलावताना प्रशिक्षक दिदिए देशाँ जराही विचलित झाले नाहीत. निव्वळ आणि निर्ढावलेल्या आत्मविश्वासातूनच हे साध्य होऊ  शकलं. या आत्मविश्वासासमोर क्रोएशियाचा खेळ विस्कटू लागला. तशात सामन्याच्या ५२व्या मिनिटाला काही वेडगळांनी मैदानावर केलेल्या घुसखोरीमुळे कदाचित प्रतिहल्ल्यांसाठी सज्ज झालेल्या क्रोएट्सचं लक्ष आणखी विचलित झालं असू शकेल. कारण त्यानंतरच सहा मिनिटांत दोन गोल झाले आणि क्रोएशियाचं आव्हान जवळपास संपुष्टात आलं.

अर्जेटिनाचे रेफरी पिटाना यांनी पहिल्या सत्रामध्ये फ्रान्सला व्हिडीओ रेफरींच्या साह्यानं बहाल केलेली पेनल्टी अन्याय्य होती असंही बोललं जातंय. स्वत:च्याच गोलक्षेत्रात एखाद्या खेळाडूचा चेंडूला हस्तस्पर्श झाल्यास रेफरीला दोन मुद्दे विचारात घ्यावे लागतात : हात चेंडूकडे गेलाय (जाणूनबुजून) की चेंडू हाताकडे आलाय (चुकून). याबाबतीत झालेल्या घटनेचा अर्थ लावून निर्णय घेण्याचा सर्वाधिकार मैदानावरील रेफरींना दिला गेलाय. पिटाना यांनी तो वापरला याविषयी कोणाला आक्षेप घेता येणार नाही. ‘व्हीएआर’ ही आधुनिक फुटबॉलची गरज आणि वास्तव असून ते प्रत्येकाला स्वीकारावंच लागणार आहे.

यानिमित्तानं फ्रान्सनं दुसऱ्यांदा जगज्जेतेपद पटकावलं आणि आता हा देश उरुग्वे आणि अर्जेटिना यांच्या पंक्तीत गेला आहे. १९८४मध्ये फ्रान्सनं पहिल्यांदा युरो चषक जिंकला. त्यानंतर प्रत्येक दशकात ते काही ना काही जिंकत आलेत. १९९८मध्ये विश्वचषक, २०००मध्ये युरो आणि आता पुन्हा विश्वचषक. या जोडीला २००६मधील विश्व आणि २०१६मधील युरो उपविजेतेपदं आहेतच. युरोपमध्ये जर्मनी (४ जगज्जेतेपदं आणि ३ युरो जेतेपदं), इटली (४ जगज्जेतेपदं आणि १ युरो जेतेपद) यांच्या मागोमाग आणि स्पेनच्या (१ जगज्जेतेपद आणि ३ युरो जेतेपदं) बरोबरीला ते आले आहेत. इंग्लंड, स्पेन, इटली, जर्मनी यांच्याइतकी समृद्ध फुटबॉल लीग फ्रान्समध्ये नाही. तरीही गेल्या साधारण वीसेक वर्षांमध्ये या देशात निर्माण झालेली गुणवत्ता थक्क करणारी आहे. जर्मनी आणि स्पेन या बाबतीत गेल्या दशकात भाग्यवान ठरले होते. त्यांची जागा आता फ्रान्सनं घेतली आहे. ही स्थिती आणखी किमान सहा वर्ष अशीच राहू शकते. जर्मनी, स्पेन, ब्राझील, उरुग्वे यांच्या नवीन खेळाडूंना परिपक्व होण्यासाठी काही काळ जावा लागेल. अर्जेटिना आणि इटली त्या भानगडीतच पडत नाहीत! त्यामुळे स्पेनप्रमाणेच काही काळ वर्चस्व निर्माण करण्याची संधी फ्रान्सकडे चालून आली आहे.

रशियानं या स्पर्धेचं नेटकं आयोजन केलंच. शिवाय एक संघ म्हणून फार अपेक्षा नसतानाही उत्तम कामगिरी करून दाखवली. या स्पर्धेत अनेक रथी-महारथी संघांना धक्के बसले तरी अखेरीस एक प्रस्थापित संघच विजेता ठरला हे वास्तव पचवणं जड जातंय. क्रोएशियासारख्या छोटय़ा देशांना पुन्हा नव्यानं सुरुवात करावी लागेल. इतका घट्ट अभिजनवाद असूनही हा खेळ आणि ही स्पर्धा नवनवीन चाहते कसे काय जोडत असते हे कोडं सोडवण्याचे प्रयत्न यापुढेही सुरूच राहतील.

siddharth.khandekar@expressindia.com