FIFA World Cup 2018 : फिफा विश्वचषक स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात गतविजेत्या जर्मनीला साखळी फेरीतच स्पर्धेबाहेर व्हावे लागले. तुलनेने दुबळ्या असलेल्या कोरियाच्या संघाने जर्मनीला २-०ने पराभूत केले आणि स्पर्धेचा शेवट गोड केला. संपूर्ण सामन्याच्या नियमित वेळेत दोनही संघाला एकही गोल करता आला नाही. मात्र, त्यानंतर देण्यात आलेल्या ६ मिनिटाच्या अतिरिक्त वेळेत कोरियाने २ गोल करत सामना जिंकला आणि जर्मनीला स्पर्धेबाहेर फेकले.

या पराभवानंतर जर्मनीचे चाहते प्रचंड नाराज झाले. संघातील खेळाडूंवर प्रचंड टीका करण्यात आली. हे लोण सोशल मीडियावरही पसरलेले दिसून आले. फेसबुक ट्विटर सर्वत्र जर्मनीच्या खेळाडूंना शिव्यांची लाखोली व्हायली. पण या सर्व टिपणीदरम्यान क्रिकेट जर्मनीने केलेले ट्विट हे चर्चेचा विषय ठरले. क्रिकेट जर्मनीच्या ट्विटर हॅण्डलवरून फिफाकडे एक अजब मागणी करण्यात आली. ‘पुढील वेळेपासून फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी क्रमवारीतील पहिल्या १० संघांनाच संधी मिळाली आणि त्यांच्यातच स्पर्धा खेळवली जावी’, अशी अजब मागणी क्रिकेट जर्मनीने केली.

२०१९च्या वन-डे विश्वचषक स्पर्धेसाठी जागतिक क्रमवारीतील पहिल्या १० संघांनाच सहभागी होता येणार आहे. ‘आयसीसी’नेच ही घोषणा केली आहे. मात्र या निर्णयावर विविध स्तरांतून टीका करण्यात येत आहे. या निर्णयामुळे संलग्न (असोसिएट) संघांना पुरेशी संधी उपलब्ध होऊ शकणार नाही, अशी चर्चा क्रिकेटवर्तुळात रंगली आहे. त्यामुळे ‘क्रिकेट जर्मनी’ने ‘त्या’ ट्विटच्या माध्यमातून आयसीसीलाही चिमटा काढला असल्याचे दिसत आहे. तसेच, युझर्सनेही या ट्विटवर आयसीसीला ट्रोल केले आहे.

कालच्या पूर्ण सामन्यात नियमित वेळेत एकही गोल झाला नाही. पण ६ मिनिटाच्या अतिरिक्त वेळेत कीम यंग-ग्वानने दुसऱ्या मिनिटाला गोल केला आणि कोरियाला १-० ने आघाडी मिळवून दिली. जर्मनीने या गोल विरुद्ध VAR मार्फत दाद मागितली होती, पण जर्मनीचे हे अपील फेटाळून लावण्यात आले. त्यानंतर जर्मनीने सामना जिंकण्याच्या आशा सोडून दिल्या होत्या. या दरम्यान कोरियाकडून ह्यूंग मीन याने शेवटच्या मिनिटाला गोल करत जर्मनीच्या जखमेवर मीठ चोळले आणि सामना २-०ने जिंकला.