विश्वचषकाच्या उपउपांत्यपूर्व फेरीत रविवारी स्पेनशी झुंजताना उरुग्वेविरुद्धच्या पराभवाच्या कटू स्मृती यजमान रशियाला मागे टाकाव्या लागणार आहेत. गटसाखळीत मातब्बर प्रतिस्पध्र्याशी झगडून बाद फेरी गाठणाऱ्या २०१०मधील विश्वविजेत्या स्पेनचे कडवे आव्हान त्यांच्यापुढे असेल.

सोव्हिएट संघराज्याचे विघटन झाल्यानंतर रशियाने प्रथमच विश्वचषकाची बाद फेरी गाठली आहे. विश्वचषक सुरू होण्याआधी रशियाकडून अतिशय माफक अपेक्षा केल्या जात होत्या. कारण गेल्या आठ महिन्यांत रशियाला विजयाचे दर्शन कधीच झाले नव्हते. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये स्पेनशी झालेली ३-३ बरोबरी, हा त्यापैकी एक आशादायी निकाल. मात्र विश्वचषकात सौदी अरेबिया आणि इजिप्त यांच्याविरुद्ध दमदार विजयांची त्यांनी नोंद केली. मग अ-गटातील अखेरच्या लढतीत रशियाला उरुग्वेकडून ३-० असा पराभव पत्करावा लागला होता. पण एकंदर कामगिरीच्या बळावर स्टॅनिस्लाव्ह चेर्चेसॉव्ह यांच्या मार्गदर्शनाखालील रशियाच्या संघाने अपेक्षा उंचावल्या आहेत.

विश्वचषकाची सलामी ज्या लुझनिकी स्टेडियमवर झाली होती, त्याच ठिकाणी रशियाचा हा महत्त्वाचा सामना होणार आहे. त्यामुळे ८० हजार प्रेक्षकांचे पाठबळ त्यांच्याकडे असेल. मध्यरक्षक अ‍ॅलन डागोएव्ह दुखापतीतून सावरला आहे. परंतु उरुग्वेविरुद्धच्या लढतीत लाल कार्ड दाखवल्यामुळे इगोर स्मोलनिकोव्ह स्पेनविरुद्धच्या लढतीला मुकणार आहे.

युरो २०१६पासून स्पेनने एकही सामना गमावलेला नाही. मात्र पहिल्या सामन्याआधी प्रशिक्षक ज्युलेन लोपेटेगुई यांची हकालपट्टी झाल्यामुळे स्पेनचा संघ कठीण परिस्थितीतून जात आहे. अखेरच्या साखळी लढतीत इयागो अ‍ॅसपासने भरपाई वेळेत केलेल्या गोलमुळे स्पेनने मारोक्कोला २-२ असे बरोबरीत रोखले आणि ब-गटात पोर्तुगालचे अव्वल स्थान हिसकावले.

सर्गिओ रामोस आणि गेरार्ड पिक्यू यांच्यासारखे दर्जेदार ‘सेंटर-बॅक’ असतानाही स्पेनविरुद्ध प्रतिस्पर्धी संघांनी तीन सामन्यांत ५ गोल नोंदवले आहेत. त्यामुळे गोलरक्षक डेव्हिड डी गेआपुढे रशियाच्या आक्रमणाला थोपवण्याचे आव्हान असेल.

सांख्यिकी

  • सोव्हिएट संघराज्याचे विघटन झाल्यापासून रशियाने स्पेनला कधीच हरवले नाही. फक्त नोव्हेंबर २०१७मध्ये झालेल्या मैत्रीपूर्ण सामन्यात ३-३ अशी बरोबरी झाली होती.
  • स्पेनने रशियाविरुद्धच्या मागील ३ सामन्यांत १० गोल नोंदवले आहेत. (युरो २००८मधील दोन सामन्यांत ७ गोल आणि मागील वर्षीच्या सामन्यात ३ गोल)
  • मागील २३ सामन्यांमध्ये स्पेनचा संघ अपराजित राहिला आहे. यात १५ विजयांचा आणि ८ बरोबरींचा समावेश आहे. दोन वर्षांपूर्वी युरोपियन अजिंक्यपद स्पर्धेत इटलीविरुद्ध (जून २०१६) त्यांनी अखेरचा पराभव पत्करला होता.
  • २००६पासून विश्वचषक आणि युरो स्पर्धामधील ३३ सामन्यांपैकी ३२ सामन्यांमध्ये फुटबॉलवरील नियंत्रणात स्पेनचे वर्चस्व राहिले आहे.
  • सोव्हिएट संघराज्याचे विघटन झाल्यानंतर रशियाने प्रथमच विश्वचषक स्पर्धेची बाद फेरी गाठण्याची किमया साधली आहे. २००८मध्ये रशियाने युरो स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. मात्र स्पेनने त्यांचे आव्हान संपुष्टात आणले होते.