08 March 2021

News Flash

वाइन अॅण्ड डाइन

पाश्चिमात्य संस्कृतीत काही धार्मिक विधींसाठीही वाइनचे सेवन होते.

पाश्चिमात्य फाइन डाइनमधले विविध कोर्स पाहिल्यानंतर आता पेयांबद्दल जाणून घेऊ. फाइन डाइनमध्ये अल्कोहोलिक पेयांपैकी सर्वात महत्त्वाची असते वाइन. वाइनचं महत्त्व का आणि दर्जेदार वाइन कुठली याबद्दल थोडंसं..

‘वाइनिंग अ‍ॅण्ड डायनिंग’ असं बरेचदा ऐकण्यात येतं, पण ‘बीयरिंग अ‍ॅण्ड डायनिंग’ असं का नसतं? किंवा ‘व्हिस्कीइंग अ‍ॅण्ड डायनिंग’ असंही नसतं कधी. का? तर याचं उत्तर आहे वाइन या पेयाच्या ‘स्टेटस’मध्ये! मागच्या सदरात वाइन हे फरमेंटेड प्रकारचे अ‍ॅल्कोहोलिक पेय आहे, असा उल्लेख केला होता. या आणि पुढच्या काही लेखांत आपण वाइनबद्दल थोडं जाणून घेऊ या.

खरं तर वाइन बऱ्याचशा फळांच्या रसापासून बनवता येते; उदाहरणार्थ सफरचंदाच्या वाइनला अ‍ॅपल ‘सायडर’, पेरच्या वाइनला ‘पेरी’ म्हणतात. पण जेव्हा नुसतं ‘वाइन’ असा उल्लेख होतो, तेव्हा ती फक्त द्राक्षांच्या रसापासून बनवली जाते, हे गृहीत असतं. वाइन प्राचीन काळापासून बनवली जात आहे. वाइन तयार होणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे. एका विशिष्ट तापमानात आणि वातवरणात जेव्हा फळांचा रस आंबतो, तेव्हा त्याची वाइन होते.

या फळांपासून वाइन बनवण्याच्या तंत्राचा उलगडा कसा झाला याची एक दंतकथा आहे. प्राचीन संस्कृतीतील एका राजाच्या दरबारातल्या महिलेला या पेयाची अनुभूती तशी अचानकच आली! राजाची तिच्यावरची मर्जी उतरल्यामुळे, भावनेच्या भरात ती आत्महत्या करायचं ठरवते आणि त्यासाठी जवळच असलेला, आंबलेल्या द्राक्षांचा रस पिते. जीव जाणं तर दूरच, उलट तो रस पिऊन तिला छान झोप लागते आणि उठल्यावर दु:खाचं मळभही दूर झालं असल्याचं तिला जाणवतं. तिच्या प्रसन्नतेचं श्रेय ती त्या खराब झालेल्या रसाला देते आणि वरून असाही संकल्प सोडते की, रोजच ती अशा आंबलेल्या रसाचं सेवन करणार! ती बहुतेक वाइन बनविण्याची सुरुवात असावी. असो!

पाश्चिमात्य संस्कृतीत काही धार्मिक विधींसाठीही वाइनचे सेवन होते. त्यासाठी, बऱ्याच देशांमध्ये, चर्चच्या आवारातच द्राक्षांच्या वेलींची लागवड केली जायची आणि चर्चचे प्रिस्ट स्वत: वाइन बनवत. आज वाइन हे कमर्शिअल प्रॉडक्ट आहे. भूमध्य समुद्राच्या आसपासच्या भागात – जिथे मातीचा कस, ऊन आणि पाणी अनुकूल असतं, अशा देशांमध्ये दर्जेदार वाइन बनवली जाते. युरोपीय देशांमध्ये फ्रान्स, इटली, स्पेन, पोर्तुगाल मोठय़ा प्रमाणात वाइन बनवतात. अमेरिकेचा कॅलिफोर्नियाचा नापा व्हॅलीचा परिसर, साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलियामध्येपण वाइन बनवली जाते. भारतातही नाशिक आणि बंगलोरच्या परिसरात उत्तम वाइन बनते. द्राक्षांची विभागणी दोन प्रकारात केली जाते – टेबल ग्रेप, म्हणजे खायची द्राक्षं आणि वाइन ग्रेप, म्हणजे वाइन बनवण्याची द्राक्षं. वाइन ग्रेपमध्येही दोन प्रकार असतात ब्लॅक ग्रेप्स (लालपासून काळ्या रंगापर्यंत) आणि व्हाइट ग्रेप्स (हलक्या ते गडद पिवळ्या/ हिरव्या रंगापर्यंत). द्राक्षाच्या वेलीला पण इंग्लिशमध्ये ‘वाइन’च म्हणतात पण स्पेलिंग ५्रल्ली असं असतं. एका वाक्यावर सगळ्या वाइन उत्पादकांचं एकमत होतं. ते हे वाक्य : “Take care of the vine to have good wine”!

वाइनचे मुख्य प्रकार असतात रेड (लाल), व्हाइट (पांढरी) आणि रोझे (गुलाबी). त्याविषयी पुढच्या लेखात..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 1:09 am

Web Title: wine dine culture
Next Stories
1 बेव्हरेजेस
2 आफ्टरनून टी
3 इंग्लिश ब्रेकफस्ट
Just Now!
X