15 October 2019

News Flash

‘अस्त्र’ क्षेपणास्त्र

आधुनिक युद्धात पहिले हल्ले-प्रतिहल्ले क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमानांनी होतील.

आधुनिक युद्धात पहिले हल्ले-प्रतिहल्ले क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमानांनी होतील. जमिनीवरील लढाई त्यानंतर सुरू होईल. त्यामुळे युद्धाचा निर्णय आपल्या बाजूने वळवण्यासाठी शत्रूवर हवाई प्रभुत्व संपादन करणे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्या कामी हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे (एअर टू एअर मिसाइल – एएएम) उपयोगी ठरतात. लढाऊ विमानांचा वेग, स्टेल्थ तंत्रज्ञान, रडारची शोधक क्षमता आणि वाढलेला पल्ला आदी बाबींमुळे ही क्षेपणास्त्रे नुसती कमी अंतरावर मारा करणारी असून भागत नाही. शत्रूने आपले विमान रडारवर किंवा प्रत्यक्ष पाहण्यापूर्वीच आपण त्याला रडारवर शोधलेले असून पुरेशा अंतरावर नष्ट करणे गरजेचे आहे. म्हणजेच यापुढील हवाई लढती वैमानिकाच्या दृष्य क्षमतेच्या पलीकडील (बियाँड व्हिज्युअल रेंज-बीव्हीआर) असतील. अस्त्र हे भारताने तयार केलेले असेच दृष्य मर्यादेपलीकडे, हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र (बीव्हीआर-एएएम) आहे.

अस्त्र क्षेपणास्त्राच्या विकासाला १९९० च्या दशकात सुरुवात झाली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ), हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. (एचएएल), इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. आदी संस्थांच्या सहकार्यातून त्याचा विकास करण्यात आला आणि भारत डायनॅमिक्स लि. (बीडीएल) कडून त्याचे उत्पादन होत आहे. अस्त्रची लांबी ११.७ फूट, व्यास ७ इंच आणि वजन साधारण १५० किलो आहे. त्याचा पल्ला ८० ते ११० किमी आहे. त्यातील घनरूप प्रणोदक (प्रोपेलंट) वापरला असून तो पुण्यातील संरक्षण प्रयोगशाळेत तयार केला आहे. हे घनरूप इंधन धूरविरहित (स्मोकलेस) आहे. त्यामुळे क्षेपणास्त्र डागल्यानंतर त्याच्या मागे धुराचा लोट न दिसता स्वच्छ ज्वाळा दिसते. त्याने शत्रूला क्षेपणास्त्र कोठून डागले गेले हे सहज शोधता येत नाही आणि क्षेपणास्त्र डागणाऱ्या विमानावर प्रतिहल्ला होण्याची शक्यता कमी होते. तसेच हे इंधन अस्त्रला काही सेकंदांत ध्वनीच्या ४.५ पट वेग (ताशी साधारण ४००० किमी) प्रदान करते. अस्त्रला दिशादर्शन आणि मार्गदर्शन करण्यासाठी इनर्शिअल गायडन्स आणि अ‍ॅक्टिव्ह रडार होमिंग प्रणालींचा वापर केला आहे. तसेच अंतिम टप्प्यात लक्ष्यवेध करण्यासाठी अत्याधुनिक सीकर यंत्रणा बसवली आहे. लक्ष्याच्या जवळ गेल्यानंतर अस्त्रमधील अतिज्वालाग्राही स्फोटकाचा (हाय एक्स्प्लोझिव्ह, प्री-फ्रॅगमेंटेड वॉरहेड) स्फोट होऊन लक्ष्य नष्ट होते.

अस्त्र क्षेपणास्त्र डागण्यासाठी हवाईदलाच्या विमानांवरील रशियन व्हिम्पेल मिसाइल लाँचरचा वापर केला आहे. सध्या हवाईदलातील सुखोई-३० एमकेआय विमानांवरून अस्त्रच्या चाचण्या घेतल्या असून लवकरच सुखोईसह मिराज-२०००, मिग-२९ आणि स्वदेशी तेजस विमानांवर अस्त्र क्षेपणास्त्रे बसवली जातील. अस्त्रची सुधारित मार्क-२ ही आवृत्ती विकसित केली जात असून त्याचा पल्ला १०० किमी हून अधिक असेल. तसेच त्यावर अत्याधुनिक रॅमजेट इंजिनाचे तंत्रज्ञान आणि हवेत प्रवासादरम्यान मार्ग बदलण्याची क्षमता (मनुव्हरेबिलिटी किंवा थ्रॉटलिंग अ‍ॅबिलिटी) वापरण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अस्त्र क्षेपणास्त्र अमेरिकेच्या एआयएम-१२०, फ्रान्सच्या मायका किंवा रशियन आर-७७ क्षेपणास्त्रांच्या तोडीचे असल्याचा दावा केला जातो.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com

First Published on December 15, 2018 12:48 am

Web Title: air to air missile